ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं निधन

टीम ई-सकाळ
Saturday, 6 March 2021

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं वृद्धापकाळानं निधन झालं, ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळं रंगभूमी, टीव्ही आणि सिनेक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं वृद्धापकाळानं निधन झालं, ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळं रंगभूमी, टीव्ही आणि सिनेक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. मोघे यांनी ५० हून अधिक नाटकं आणि सिनेमांत कामं केली आहेत. सन २०१२ मध्ये सांगली येथे झालेल्या ९२व्या मराठी नाट्यसंमेलनाचे त्यांनी अध्यक्षपदही भूषवले होते.

श्रीकांत मोघे यांचा ६ नोव्हेंबर १९२९ रोजी किर्लोस्करवाडी येथे जन्म झाला होता. त्यांचं दहावीपर्यंत शिक्षण किर्लोस्करवाडीतच झालं. त्यानंतर सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. तर पुढील शिक्षण त्यांनी पुण्यातील स. प . महाविद्यालयातून घेतलं. त्यानंतर मुंबईतून त्यांनी आर्किटेक्चरही पदवीही मिळवली. शालेय जीवनापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती, त्यामुळे उच्च शिक्षण घेतल्यानंतरही ते आपल्या या आवडीच्या क्षेत्रातच रमले. 

'तुझं आहे तुझंपाशी', 'लेकुरे उदंड झाली', 'वाऱ्यावरची वरात', 'अश्रूंची झाली फुले' आदी नाटकं तसेच 'मधुचंद्र', 'सिंहासन', 'गंम्मत-जंम्मत', 'उंबरठा', 'वासुदेव बळवंत फडके' हे चित्रपट गाजले. 

श्रीकांत मोघे यांना मिळालेले पुरस्कार

महाराष्ट्र राज्य सांस्कृतीक पुरस्कार 
काशीनाथ घाणेकर पुरस्कार
केशवराव दाते पुरस्कार
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा पुरस्कार
गदिमा पुरस्कार
प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार
महाराष्ट्र शासनाचा कलागौरव पुरस्कार
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Veteran actor Shrikant Moghe passes away