विदर्भावरील भाजपची पकड मजबूत

विदर्भात भाजपचे रोपटे वाढविणारे तीन खंदे शिलेदार - केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार एका कार्यक्रमानिमित्ताने एकत्र आले असताना.
विदर्भात भाजपचे रोपटे वाढविणारे तीन खंदे शिलेदार - केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार एका कार्यक्रमानिमित्ताने एकत्र आले असताना.

विदर्भ खरे तर काँग्रेसचा बालेकिल्ला. सर्वाधिक जागा मिळायच्या. मात्र, आघाडी, युतीच्या राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रभाव दाखवला; पण गेल्या पाच-सहा वर्षांपासून या वर्चस्वाला शह बसत गेला. भाजपचा प्रभाव वाढत गेला, स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते थेट विधानसभा, लोकसभेपर्यंत भाजपच्या जागा वाढत गेल्या आणि काँग्रेसच्या घटत गेल्या. ही घसरण थांबणार की आणखी वाढणार, हे विधानसभेच्या निवडणुकीत आणखी स्पष्ट होईल.

भारतीय जनता पक्षाची वैचारिक मातृसंघटना समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (रा. स्व. संघ) स्थापना नागपूरमध्ये झाली. त्यादृष्टीने भाजपसाठी खरं तर नागपूर आणि विदर्भ ‘होमपिच’ असायला हवे होते; पण १९९५ मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार राज्यात येईस्तोवर तरी तसे चित्र नव्हते. पूर्ण विदर्भ हा काँग्रेसचाच बालेकिल्ला मानला जायचा. तसा तो होताही. त्यामुळे येथे काँग्रेसने दगड जरी उभा केला तरी डोळे मिटून तो निवडून येईल, असे गमतीने म्हटले जायचे. काही प्रमाणात ती वास्तविकताही होती. १९९२ मधील रामजन्मभूमी आंदोलनानंतर भाजपने उडी घेतली आणि त्यानंतर भाजपचा विदर्भातील वाटचालीचा आलेख चढताच राहिला.

रामजन्मभूमी आंदोलनाचा सर्वाधिक राजकीय फायदा भाजपला होईल, हे अपेक्षित होतेच. सोबत शिवसेनेनेही हिंदुत्वाचा आवाज बुलंद केला. त्याचा फायदा भाजप-शिवसेना युतीला १९९४ च्या निवडणुकीत झाला. यात काँग्रेस ८० जागा जिंकून विधानसभेतील सर्वांत मोठा पक्ष झाला तरी शिवसेनेचे ७३ आणि भाजपचे ६५ असे १३८ जागांचे पाठबळ युतीला होते. त्यामुळे राज्यात प्रथमच भगवी क्रांती होऊन युतीचे सरकार स्थापन झाले. विदर्भातदेखील त्याचे पडसाद उमटले. १९९९ च्या निवडणुकीत युतीला सरकार टिकवता आले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीला परत सत्ता मिळाली. इतकेच नाही तर त्यानंतरही लागोपाठ दोन वेळाही भाजप-शिवसेनेला सत्तेत परत येता आले नाही. असे असले तरी भाजपने १९९४ मध्ये विदर्भावर बसवलेली पकड ढिली होऊ दिली नाही. उलट ती जास्त मजबूत केली. हे नंतरच्या निवडणुकीतून दिसूनही आले.

१९९९ च्या निवडणुकीत भाजपने २२ जागा जिंकल्या; तर, शिवसेनेने ७ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला मात्र २१ आमदारच निवडून आणता आले. त्याचा मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने ५ आमदार निवडून आणले. २००४ च्या निवडणुकीतही स्थिती काहीशी अशीच होती. तेव्हा भाजपने २१ आणि शिवसेनेने ८ जागा जिंकल्या, तर काँग्रेसने १९ आणि राष्ट्रवादीने ८ जागा जिंकल्या. या निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगलाच फायदा झाला. त्यांचे तीन आमदार विदर्भात वाढले. त्यानंतर राष्ट्रवादीची घसरण सुरू झाली.

२००९ च्या निवडणुकीत काँग्रेसने आपली स्थिती मजबूत केली; पण राष्ट्रवादीने अर्ध्या जागा विदर्भात गमावल्या. या निवडणुकीत काँग्रेसला २४ जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादी ४ वर पोचली. ही निवडणूक भाजपसाठी मात्र निराशाजनक ठरली. २१-२२ मध्ये खेळणाऱ्या भाजपला या वेळी दोन-तीन जागांचा फटका बसून फक्त १९ जागाच मिळाल्या. शिवसेनेने २००४ मधील आठचा आकडा कायम ठेवला.

२०१४ ची निवडणूक भाजपला ‘बूस्ट’ देणारी होती. अहमदाबादवरून निघालेले नरेंद्र मोदी नावाचे वादळ साऱ्या देशभर घोंघावत होते. विदर्भही त्याला अपवाद नव्हता. याच वर्षाच्या प्रारंभी झालेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातल्या सर्व दहाही जागा भाजप-शिवसेना युतीने जिंकल्या होत्या. त्या वादळाचा परिणाम आजही कायम आहे. त्याचे परिणाम काही महिन्यांत होणाऱ्या राज्य विधानसभा निवडणुकीत होणे अपेक्षित होतेच आणि झालेही तसेच.

मात्र, या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली. लोकसभेत असलेली भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यात ‘ब्रेकअप’ झाला. परिणामी, हे चारही प्रमुख पक्ष राज्यात वेगवेगळे लढले. त्यामुळे त्यांना आपली ताकदही कळली आणि या निवडणुकीने विदर्भातील भाजपचे मजबूत स्थानही दाखवून दिले. एकट्या लढल्याचा सर्वाधिक तोटा शिवसेना आणि राष्ट्रवादीला झाला. शिवसेना आठवरून अर्ध्यावर (४) आली, तर राष्ट्रवादीची दुर्दशा होत, तिला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. काँग्रेसचीही स्थिती उत्साहवर्धक नव्हतीच.

१९९४ पासून विदर्भात वीसच्या घरात खेळणाऱ्या काँग्रेसला या निवडणुकीत केवळ १० आमदार निवडून आणता आले. भाजपने मात्र हनुमानउडीच घेतली. एकट्याने लढूनदेखील भाजपने तब्बल ४४ आमदार निवडून आणले.

कधी काळच्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात त्याच पक्षाची स्थिती अशी दयनीय होत असताना भाजप मात्र मजबूत होत राहिली. त्याचे परिणाम गाव आणि जिल्हा पातळीवरील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही दिसायला लागले आहेत. तेथेही आज अनेक ठिकाणी भाजपची सत्ता आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांसारखी राज्य सरकारमधील महत्त्वाची पदे आज विदर्भाकडे आहेत. शिवाय, नितीन गडकरी यांनी भाजपचे नेतृत्व केले आहे आणि आजही ते मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. भाजपने विदर्भावरील पकड मजबूत करीत विदर्भाचे राज्याच्या राजकारणातील स्थानही अधिक मजबूत केले, हे नाकारता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com