Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादीच्या सभा गाजवणारे अमोल मिटकरी आहेत तरी कोण? 

Amol Metkari
Amol Metkari

अकोला : सध्या विधानसभा निवडणुकीत किंबहुना लोकसभा निवडणुकीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभा गाजवण्यात आघाडीवर असलेल्या अमोल मिटकरी यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आहेत. सध्या त्यांच्या आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्या सभांना महाराष्ट्रातून सर्वाधिक मागणी आहे. यू-ट्यूबवर त्यांच्या व्हिडिओंवर अक्षरशः उड्या पडत आहेत. लाखो व्हूज मिळवणारे हे व्हिडिओ तितकेच शेअरही केले जात आहेत. आता हे अमोल मिटकरी कोण? भाषणांमध्ये शायरीपासून श्लोक म्हणून दाखवणारे, रामायण-महाभारताचे अभ्यासपूर्ण दाखले देणाऱ्या मिटकरी यांची पार्श्वभूमी काय? असा प्रश्न बहुतांश जणांना पडला आहे.

अकोला जिल्ह्यातील अमरावती जिल्हा सीमेलगत असलेले खारपाणपट्ट्याचे गाव कुटासा. राज्यभरात आपल्या वक्तृत्वशैलीची छाप पाडणाऱ्या अमोल मिटकरी यांचे हे गाव. त्यांच्या परिवारावर कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा मोठा प्रभाव. जेमतेम दोन एकर शेती सांभाळून किराणा दुकान चालविणाऱ्या त्यांच्या वडीलांनी समाजसेवेची ज्योत त्यांच्यात जागती ठेवली असल्याने प्रबोधनासह पुरोगामी विचारांच्या प्रचार प्रसाराचे काम ते मोठ्या जोमाने करीत आहेत. विचार व्यक्त करण्याची शक्ती निसर्गाने सर्वांनाच दिलेली आहे. मात्र, त्याचा प्रभावी वापर करून कुटासासारख्या छोट्याशा गावातून थेट देशपातळीवरील आघाडीचा वक्ता होण्याची ख्याती अमोल मिटकरी यांनी प्राप्त केली आहे. 

राष्ट्रसंतांच्या भजनांची आवड आणि विचारांचा प्रभाव असणाऱ्या अमोल मिटकरी यांनी लहानपणापासून गुरुदेव भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रसंतांचे विचार गावागावात पोहचविण्याचे काम केले. आपल्या वक्तृत्व कलेची साधना आणि उपासनेतून त्यांनी श्रोत्यांवर लहानपणापासूनच प्रभाव पाडला. त्यांनी राज्यघटनेचा सखोल अभ्यास केला. राज्यघटनेतील बारकावे अभ्यासताना महात्मा ज्योतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारही त्यांनी जाणून घेतले. गणेशोत्सव, दुर्गोत्सव किंवा आणखी कोणताही कार्यक्रम असो आपले विचार मांडण्याची त्यांना प्रभावी वक्तृत्वशैलीमुळे सातत्याने संधी मिळत गेली. सर्वप्रश्नांची उत्तरे राज्यघटनेत असल्याचे ठाम मत ते आपल्या सभांमधून वारंवार व्यक्त करतात.   

कोठे सुरू झाली भाषणांची सुरुवात?
१२ जानेवारी २०१२ ला मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे ऐनवेळी केलेले त्यांचे भाषण गाजले. तेथेच त्यांना नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे एका सभेत बोलण्यासाठी पाचारण करण्यात आले. सावरकरांचे जन्मगाव असेल्या भगूर येथे केलेल्या परखड भाषणातून प्रतिगाम्यांचा त्यांनी समाचार घेतला. विचारपीठवरून उतरतानाच श्रोत्यांनी अक्षरशः त्यांना डोक्यावर घेतले होते. अमोल मिटकरी यांनी समाजातील अनिष्ट चालीरिती यासह सामाजिक भेदावर कडाडून प्रहार केला. भांडारकर प्रकरण असो की, वाघ्या कुत्र्याचे प्रकरण त्यांनी प्रत्येकवेळी आपली भूमिका स्पष्ट करीत अग्रेसर राहीले. बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचाही त्यांनी विरोध केला होता. भीमा कोरेगाव प्रश्नाबाबत जातीय तणाव निर्माण झाला असताना खेड्यापाड्यापर्यंत जाऊन लोकांना आपला प्रेरणादायी इतिहास सांगत देशात शांतता व सर्व धर्म समान नांदावा यादृष्टीने केलेले त्यांचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. 

अजित पवारांनी दिली संधी
जातीय ताण कमी करण्याच्या त्यांच्या प्रयत्नातून बारामती येथे शारदा व्याख्यानमालेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या वक्तृत्वशैलीचे कौतुक करीत सोबत काम करण्याची संधी दिली. प्रभावी वक्तृत्वशैलीचा वापर करून कुटासासारख्या छोट्याशा गावातून थेट देशपातळीवरील आघाडीचा वक्ता होण्याची ख्याती अमोल मिटकरी यांनी प्राप्त केली आहे. 

वक्तृत्व प्रशिक्षण केंद्र
१ ऑगस्ट २०१७ पासून अकोला शहरात अमोल मिटकरी यांनी विशाल बोरे, जीवन गावंडे यांच्यासोबत प्रत्येकाला ओजस्वी भाषण कला शिकता यावी व आपल्या व्याख्यानांच्या माध्यमातून व्यक्त करावे या उद्देशाने कॉग्निझंट म्हणजेच जाणीव असलेला वक्ता या नावाने वक्तृत्व प्रशिक्षण केंद्र सुरू केले होते. ज्या माध्यमातून जिल्हा व राज्यातील अनेक विद्यार्थी व नागरिकांनी वक्तृत्व कला शिकवून समाजात प्रेरणादायी विचार करण्याचे काम सुरू केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com