Vidhansabha 2019 : आघाडीच्या मताधिक्‍याची महायुतीला चिंता!

Pune-District-Vidhansabha
Pune-District-Vidhansabha

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दहांपैकी आठ विधानसभा मतदारसंघांत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांच्या मताधिक्‍यात मोठी वाढ झाली. परिणामी, जिल्ह्यात महायुतीच्या चार जागांमध्ये घट होऊन आघाडीच्या तेवढ्याच जागा वाढण्याची शक्‍यता आहे.

गेल्या विधानसभा (२०१४) निवडणुकीत दहापैकी पाच जागा महायुतीने, तर केवळ चार जागा काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने जिंकल्या होत्या. उर्वरित एक जागा (जुन्नर) मनसेने जिंकली. परंतु, लोकसभा निवडणुकीवेळी राज्यात एकमेव मनसे आमदार असलेले शरद सोनवणेही शिवसेनेत गेले.

सद्यःस्थितीत ग्रामीण भागातील दहापैकी सहा विधानसभा मतदारसंघ महायुती, तर चार आघाडीकडे आहेत. महायुतीच्या पाचपैकी शिवसेना- भाजपला प्रत्येकी दोन आणि भाजपचा मित्रपक्ष राष्ट्रीय समाज पक्षाची (रासप) एक जागा आहे. लोकसभा निवडणुकीत मावळचे संजय भेगडे आणि रासपचे ॲड. राहुल कुल या महायुतीच्या आमदारांनी आपापल्या मतदारसंघात मताधिक्‍य राखले. मात्र मताधिक्‍यात घट झाली आहे.

भाजपचे आमदार बाबूराव पाचर्णे, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, खेडचे आमदार सुरेश गोरे मागील विधानसभा निवडणुकीचे मताधिक्‍य टिकवू शकले नाहीत. उलट आघाडीचे मताधिक्‍य वाढले. 

पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरात मोदी लाट राहिली तरी मावळ आणि दौंडचा अपवाद वगळता अन्य कोठेही दिसली नाही, त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत बारामतीतून भाजपच्या, तर शिरूरमधून शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश, पुरंदर विमानतळ, पुणे- नाशिक महामार्ग, बैलगाडा शर्यती, कामगारांचे प्रश्‍न हे स्थानिक मुद्दे असून, ते अद्याप पूर्ण सुटलेले नाहीत. विधानसभेला आघाडी आणि युती होणार हे स्पष्ट नसल्यामुळे चारही पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी आहे. 

बारामतीतून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीकडून एकमेव, तर काँग्रेसचा एकही इच्छुक नाही. भाजपचे बाळासाहेब गावडे आणि वंचित बहुजन विकास आघाडीचे नवनाथ पडळकर हेही इच्छुक आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पवार यांनी गावडेंचा ८९,७९१ मतांनी पराभव केला होता. 

इंदापुरातून राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे पुन्हा इच्छुक आहेत. त्यांच्याशिवाय जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळे, अशोक घोगरे, गणेश झगडे, भाऊसाहेब सपकाळ, वैशाली पाटील आदी इच्छुक आहेत. काँग्रेसतर्फे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे एकमेव, तर भाजपच्यावतीने माउली चौरे इच्छुक आहेत. येथे युतीची फारशी ताकद नाही. 

दौंडमधून रासपचे राहुल कुल पुन्हा रिंगणात उतरू शकतात. राष्ट्रवादीतर्फे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, वैशाली नागवडे, अप्पासाहेब पवार, वीरधवल जगदाळे, महेश भागवत, अनंत थोरात, विकास ताकवणे आणि बादशाह शेख, तर काँग्रेसतर्फे आत्माराम ताकवणे आणि भाजपतर्फे वासुदेव काळे, नामदेव ताकवणे तीव्र इच्छुक आहेत. 

पुरंदरमधून शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे पुन्हा लढतील, असा होरा आहे. भाजपची ताकद नगण्य आहे. राष्ट्रवादीतर्फे दिगंबर दुर्गाडे, सुदाम इंगळे, विराज काकडे, बबन टकले, संभाजी झेंडे आणि काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष संजय जगताप आणि माजी आमदार संभाजी कुंजीर इच्छुक आहेत. 

भोरमधून काँग्रेसचे संग्राम थोपटे यांच्यासह माजी खासदार अशोक मोहोळ यांचे पुत्र संग्राम, डॉ. यशराज पारखी, शिवसेनेतर्फे कुलदीप कोंडे, भाजपचे शरद ढमाले आणि राष्ट्रवादीतर्फे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सविता दगडे, विक्रम खुटवड, रणजित शिवतरे, शांताराम इंगवले, तानाजी मांगडे, शंकर मांडेकर, सुनील चांदेरे, रवींद्र कंधारे आदी इच्छुक आहेत. मावळमधून भाजपचे आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे पुन्हा इच्छुक आहेत. शिवसेनेचे फारसे प्राबल्य नाही. राष्ट्रवादीतर्फे किशोर भेगडे, रूपाली दाभाडे यांच्यासह नऊ जण, तर काँग्रेसतर्फेही चंद्रकांत सातकर यांच्यासह नऊ जण इच्छुक आहेत. 

शिरूरमधून भाजपचे बाबूराव पाचर्णे, राष्ट्रवादीतर्फे अशोक पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, काँग्रेसतर्फे कौस्तुभकुमार गुजर, महेश ढमढेरे, जुन्नरमधून आमदार शरद सोनवणे शिवसेनेतर्फे, राष्ट्रवादीतर्फे अतुल बेनके, काँग्रेसतर्फे सत्यशील शेरकर, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके (अपक्ष), खेडमधून शिवसेनेचे सुरेश गोरे, राष्ट्रवादीतर्फे दिलीप मोहिते आणि काँग्रेसतर्फे अमोल पवार, आंबेगावमधून राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील, शिवसेनेतर्फे अरुण गिरे आणि काँग्रेसतर्फे यशवंत पाचंगे आणि अशोक काळे इच्छुक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com