Vidhansabha 2019 : ‘भाजप’चे लक्ष्य २२० जागांचे

BJP
BJP

मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीत स्वबळावर २२० जागा जिंकण्याचे लक्ष्य भारतीय जनता पक्षाने आखले असून, यासाठी प्रत्येक मतदारसंघात विजयी उमेदवारावर लक्ष केंद्रित करण्याची रणनीती भाजपने आखली आहे. भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी युतीबाबत कार्यकर्त्यांनी चिंता करू नये. बूथपातळीपासून भाजपला ताकदवान बनवा, त्यादृष्टीने तयारीला लागा, असे स्पष्ट केले. प्रदेश भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही  कार्यकर्त्यांनी लक्ष्यपूर्तीसाठी तयारीला लागावे, असा संदेश दिला.

गोरेगाव येथील नेस्को संकुलात रविवारी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. याला  भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा  उपस्थित होते. अधिवेश सुरू होण्यापूर्यर्वी नड्डा यांनी चैत्यभूमी, स्वा. सावरकार स्मारक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकास भेट दिली व अभिवादन केले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती तुटली होती. ‘तीन पायांची शर्यत नको,’ अशी टिप्पणी करीत भाजपचे माजी आमदार मधू चव्हाण यांनी युती तोडून स्वबळावर लढण्याचे आवाहन त्या वेळच्या कार्यकारिणीत केले होते. त्यानंतर शिवसेना-भाजपमध्ये जागा वाटपावरून घोडे अडून युती तुटली आणि भाजपने स्वबळावर १२३ जागा जिंकून सरकार स्थापन केले. तर, शिवसेनेला ६३ जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाली. तर, २०१९ च्या लोकसभेला भाजपने शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढत युती केली. मात्र, विधानसभेला स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.

शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपाइं, शिवसंग्राम आणि रयत क्रांती शेतकरी संघटना, अशा महायुतीने विधानसभा निवडणूक लढविणार, असे भाजपचे नेते जाहीरपणे बोलत असले; तरीही स्वबळावर निवडणूक लढल्यास आपली एकहाती सत्ता येईल, असे भाजपमधील काही नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री भाजपचाच झाला पाहिजे, यावर हे नेते ठाम आहेत. कार्यकारिणीच्या भाषणात देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीच पुन्हा मुख्यमंत्री होणार, अशी ग्वाही कार्यकर्ते, पदाधिकारी यांना दिली आहे. कार्यकारिणीच्या बैठकीच्या ठिकाणी ‘मी परत येईन’ अशा आशयाचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे फलक लागले आहेत. तर, भाजपच्या राज्य प्रभारी सरोज पांडे यांनी कार्यकर्त्यांनी २८८ जागांवर भाजपचे उमेदवार आहेत, असे समजून कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. तर, भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील २८८ जागांवर भाजपच लढत आहे, असे समजून भाजपचे पदाधिकारी यांनी काम करावे, असे स्पष्ट म्हटले आहे. 

युतीबाबत चिंता नको
भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी युतीबाबत कार्यकर्त्यांनी चिंता करू नये. बूथपातळीपासून भाजपला ताकदवान बनवा, असा संदेश दिला आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे भाजपमध्ये येण्यासाठी रांगेत असलेले आयाराम सुखावले असल्याचे चित्र आहे.

गडकरींची दांडी
राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या महत्त्वाच्या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित नव्हते. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे गडकरी उपस्थित राहू शकले नाहीत, असे सांगितले गेले; तरीही गडकरी यांचे नाव कार्यक्रमपत्रिकेत होते. तसेच, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या देखील उपस्थित नव्हत्या. त्या नियोजित कार्यक्रमामुळे परदेशात गेल्या आहेत, तसेच तब्येत ठीक नसल्यामुळे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार या बैठकीला उशिरा पोचले, असा खुलासा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

भाजप कोणत्याही परिस्थितीत २८८ जागा जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री भाजपचाच होणार आहे. युतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री अमित शहा निर्णय घेतील.
- सरोज पांडे, राज्य प्रभारी

महायुतीलाच २२० जागा - चंद्रकांत पाटील
विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या २२० जागा येतील, असा विश्‍वास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्‍त केला. कार्यकर्त्यांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘भाजप कार्यकर्त्यांनी २८८ जागांवर कामाला लागावे. युतीबाबत चिंता करू नका. युतीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. संघटनात्मक बांधणीत आपण कमी नाही. आपले थेट जनतेशी घट्ट नाते निर्माण झाले आहे. बूथरचना आणि पन्नाप्रमुख या भाजपच्या संघटनात्मक रचनेमुळे लोकसभा निवडणुकीत चमत्कार करून दाखविला आहे. विधानसभा निवडणुकीतही आपण असाच चमत्कार करून दाखवू.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com