मुख्यमंत्रिपदापासून वंचित नेत्यांचा खानदेश

Politics
Politics

प्रादेशिक अस्मिता टोकदार करत कधीही उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांनी सवता सुभा मांडण्याचा प्रयत्न केला नाही. तथापि, राज्याच्या राजकारणात त्यांनी सातत्याने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. मात्र, मुख्यमंत्रिपद कधीही या भागाच्या वाट्याला आले नाही. हातातोंडाशी आलेला या पदाचा घास सातत्याने हुलकावणीच देत राहिला आहे.

चांदवडच्या राहूडबारीच्या पश्‍चिमेकडचा, नाशिक शहराभोवतीचा भाग वगळला, तर खानदेशाने भाषा, कला, खाद्यसंस्कृती, समाजकारण अशा अनेक बाबतीत प्रादेशिक अस्मिता जोपासलेली आहे. कधी स्वतंत्र राज्याची मागणी केली नसली तरी राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना समसमान न्याय देतानाच आपल्या नेत्यांमागे ताकदीने उभे राहण्याची परंपराही या प्रदेशात आहे. राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर (स्व.) उत्तमराव पाटील यांनी १९८९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या विनंतीला मान देऊन लढविलेली, जिंकलेली एरंडोल लोकसभा मतदारसंघाची निवडणूक हे त्या परंपरेचे ठळक उदाहरण. ते पहिल्यांदा खासदार बनले होते १९५७ मध्ये. म्हणजे तब्बल २७ वर्षांच्या खंडानंतर लोकांनी त्यांच्यावर तितकेच प्रेम केले. हा टापू सतत राष्ट्रीय प्रवाहात राहिला. राज्याच्या राजकारणाने मात्र उत्तर महाराष्ट्राला न्याय दिलेला नाही. 

महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या राजकारणात हा एकमेव प्रदेश आहे, की ज्याच्या वाट्याला मुख्यमंत्रिपद आलेले नाही. विकासाच्या प्रादेशिक असमतोलाचा विचार करता विदर्भ आणि मराठवाड्याबाहेरच्या उर्वरित महाराष्ट्राचा घटक असलेल्या या भागाची वेदना विजय केळकर समितीच्या अहवालात उमटली आहे. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे कार्यालय नाशिकला हलविण्याची शिफारस करण्यात आली. राजकीय धबडग्यात तिची आज कुणाला आठवण नाही, ही बाब अलहिदा. 

पूर्वेकडील केळीपासून पश्‍चिमेकडील कांदा-द्राक्षापर्यंत अंगोपांगी विविधता ल्यालेल्या खानदेशच्या मातीमधील साहित्य, समाजसेवा क्षेत्राचा आढावा हा स्वतंत्र विषय आहे. महत्त्वाचे हे, की पश्‍चिमेकडे सह्याद्री आणि उत्तर, पूर्वेकडे सातपुडा अशा दोन पर्वतांच्या खोबणीत, गोदावरी आणि तापी नद्यांच्या खोऱ्यातल्या खानदेशाने पर्वतांएवढेच उंच, उत्तुंग असे अनेक नेते दिले खरे; पण राजकीय प्रवाहाने त्यांना न्याय दिलाच असे नाही. यशवंतराव चव्हाण यांच्याऐवजी भाऊसाहेब हिरे यांना मुख्यमंत्रिपद मिळायला हवे होते असे मानणारे आजही भेटतात. भाऊसाहेबांच्या निधनानंतर नाशिकने यशवंतराव चव्हाण यांना लोकसभेवर बिनविरोध निवडून दिले.

त्यांच्याशिवाय जनसंघाचे राज्यातील पहिले आमदार व अनेक वर्षांचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते उत्तमराव पाटील, तरुण वयात मंत्री व नंतर विधानसभेच्या अध्यक्षपदापर्यंत पोचलेले मधुकरराव चौधरी, पी. के. अण्णा पाटील यांच्यापासून ते अलीकडचे छगन भुजबळ, एकनाथ खडसे, रोहिदास (दाजी) पाटील, अरुण गुजराथी अशी उत्तुंग नेत्यांची मांदियाळी खानदेशला लाभली आहे. परवा ज्यांना घरकुल घोटाळ्यात शिक्षा झाली ते सुरेश जैन यांनीही राज्याच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण केला होता. पुरोगामी लोकशाही दलाच्या म्हणजेच ‘पुलोद’च्या प्रयोगात समाजवादी विचारसरणीचे निहाल अहमद हेही आघाडीवर राहिलेले नेते होते. 

या प्रत्येकाच्या नावाची राज्याच्या मुख्यमंत्रिदासाठी वेळोवेळी चर्चा झाली. देशाच्या पहिल्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीचा पूर्वार्धही खानदेशचा. पुलोद सरकारच्या काळात त्या विरोधी पक्षनेत्या होत्या. त्यांची राष्ट्रीय राजकारणातील प्रगती मात्र विदर्भातून, अमरावतीच्या खासदार बनल्यानंतर. खानदेशातील नेत्यांमधील एका वेगळ्या साम्यस्थळाचा आवर्जून उल्लेख करायला हवा. भाऊसाहेब हिरे, उत्तमराव पाटील, पी. के. अण्णा पाटील यांचे महाविद्यालयीन शिक्षण बडोद्याला झाले. तिथल्या सामाजिक आणि परिवर्तनवादी संस्कारांचा प्रभाव त्यांच्या राजकारणावर अखेरपर्यंत राहिला. 

राजकीयदृष्ट्या नगर जिल्हा उत्तर महाराष्ट्रात किंवा खानदेशात गणला जात नाही, तो पश्‍चिम महाराष्ट्रात असतो. प्रशासकीयदृष्ट्या मात्र तो नाशिक विभागात आहे. अर्थात, नगरचीही राजकीय स्थिती खानदेशसारखीच आहे. पद्मश्री विखे पाटील, भाऊसाहेब थोरात, अण्णासाहेब शिंदे, दत्ता देशमुख अशा दिग्गज नेत्यांच्या नगर जिल्ह्याला मुख्यमंत्रिपदाने हुलकावणीच दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर, भारतीय जनता पक्षाला यंदाही उत्तर महाराष्ट्रात अधिक संधी आहे. गेल्या वेळी नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबारमधील ३५ जागांपैकी सर्वाधिक १४ जागा भाजपने जिंकल्या. धुळे, नंदुरबारमधील यशामुळे काँग्रेसने शिवसेनेइतक्‍याच प्रत्येकी आठ जागा जिंकल्या. नाशिक व जळगावमध्ये प्रभाव असलेल्या राष्ट्रवादीची पाटी धुळे, नंदुरबारमध्ये कोरी राहिली. प्रदेशात पाचच आमदार निवडून आले. त्यांपैकी चार नाशिक जिल्ह्यात. जळगावमधील पीछेहाट राष्ट्रवादीसाठी धक्‍कादायक होती, तर नंदुरबारमध्ये डॉ. विजयकुमार गावित यांचे कुटुंब २०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधीच भाजपवासी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com