विधानसभा 2019 : आचारसंहिता 20 रोजी शक्‍य

संजय मिस्कीन
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

आचारसंहितेच्या धास्तीने राजकीय पक्षांची लगबग सुरू असली, तरी 19 वा 20 सप्टेंबरला आचारसंहिता लागू होण्याचे संकेत आहेत. तर, 15 ते 18 ऑक्‍टोबर दरम्यान मतदान होण्याची शक्‍यता असून 20 ते 22 ऑक्‍टोबर दरम्यान मतमोजणी होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

प्रचारासाठी मिळणार केवळ 20 ते 25 दिवस
मुंबई - आचारसंहितेच्या धास्तीने राजकीय पक्षांची लगबग सुरू असली, तरी 19 वा 20 सप्टेंबरला आचारसंहिता लागू होण्याचे संकेत आहेत. तर, 15 ते 18 ऑक्‍टोबर दरम्यान मतदान होण्याची शक्‍यता असून 20 ते 22 ऑक्‍टोबर दरम्यान मतमोजणी होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

यामुळे प्रचाराचा कालावधी जेमतेम 20 ते 25 दिवसांचा राहणार असल्याने विरोधी पक्षांची दमछाक होणार असल्याचे सांगितले जाते.
गणपती विसर्जनानंतर कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार असल्याची चर्चा राज्यभरात सुरू होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा 13 ते 19 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. 19 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नाशिक येथे समारोप होणार आहे. त्यामुळे यादरम्यान आचारसंहिता लागू होण्याची कोणतीही शक्‍यता नसल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रात 15 ते 16 सप्टेंबर दरम्यान येणार असून, त्यानंतर तीन ते चार दिवसांनी आचारसंहिता लागण्याची शक्‍यता गृहीत धरता 20 सप्टेंबरलाच आचारसंहिता लागू होईल, असा दावा सूत्रांनी केला आहे.
राज्यमंत्रिमंडळाची अखेरची बैठकही 17 सप्टेंबरला होणार असल्याचा दावा सूत्रांनी केला असून, या बैठकीत सरसकट कर्जमाफीचा महत्त्वाकांक्षी निर्णय होऊ शकतो.

पूरग्रस्त भागातील उपाययोजनांसाठी प्रशासन व्यग्र असल्याने या भागातील कर्जाची व शेतकऱ्यांची आकडेवारी सरकारला मिळालेली नव्हती. आता ती मिळवण्याची तयारी सुरू झाली आहे. सरसकट कर्जमाफीच्या निर्णयानंतर राज्यभरात सरकार प्रचाराचा दणका उडवत विधानसभेला सामोरे जाण्याची तयारी करीत असल्याचे संकेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Code of Conduct