मुंबई - ‘मातीशी नाळ जोडलेल्या सामान्य कार्यकर्त्याची महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड होणे हे भारतीय राज्यघटनेने दिलेल्या संधीच्या समानतेचे उत्तम उदाहरण आहे. राज्याच्या विधिमंडळाला मोठी गौरवशाली परंपरा आहे. या परंपरेला पुढे नेण्याची जबाबदारी सर्वांची आहे.
अण्णा बनसोडे उपाध्यक्ष झाले, हा केवळ त्यांचा गौरव नसून राज्यातील १३ कोटी जनतेचा अभिमान आहे. घटनेने दिलेल्या समानतेच्या हक्कामुळेच आज सामान्य माणूसही उच्चपदावर पोहोचू शकतो,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले.
विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची आज एकमताने निवड करण्यात आली. या निवडीबद्दल फडणवीस यांनी अभिनंदनपर प्रस्ताव मांडला, त्यावेळी ते बोलत होते. बनसोडे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करताना त्यांचा राजकीय प्रवास आणि अनुभव यांची प्रशंसा मुख्यमंत्र्यांनी केली. ‘महाराष्ट्र विधिमंडळ देशातील सर्वाधिक काळ चालणाऱ्या सभागृहांपैकी एक आहे.
या सभागृहाच्या परंपरेला पुढे नेण्यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी समन्वयाने काम करून या सभागृहाचा लौकिक अधिक वाढवला पाहिजे. उपाध्यक्षपद हे महाराष्ट्र विधानसभेतील सन्मानाचे पद आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी या पदाचा गौरव वाढविला आहे. बनसोडे यांची या पदासाठी निवड त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आहे,’ असे फडणवीस म्हणाले.
अध्यक्ष व उपाध्यक्षांचा समन्वय
अध्यक्षपदी विधीतज्ज्ञ राहुल नार्वेकर आणि त्यांच्याबरोबर सामाजिक व राजकीय प्रश्नांची जाण असलेला सदस्य उपाध्यक्ष म्हणून काम करणार आहेत. या अनुभवातून विधिमंडळाचा बहुमान उंचावेल. अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोघांच्या समन्वयातून या सभागृहाला निश्चितपणे न्याय मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
एक सामान्य कार्यकर्ता विधानसभेच्या उपाध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर विराजमान होतो हे आपल्या राज्यघटनेचे सामर्थ्य आहे, असे स्पष्ट करत विधानसभेच्या उपाध्यक्षपदी सदस्य अण्णा बनसोडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले. विरोधी पक्षातील नेत्यांनीही सकारात्मक भूमिका घेत बनसोडे यांच्या निवडीला पाठिंबा दर्शवला, याबद्दल शिंदे यांनी विरोधी पक्षातील नेत्यांचेही आभार मानले.
विरोधी पक्षाची नाराजी
उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे अभिनंदन करताना विरोधी पक्षाला या निवडीबाबत विचारात न घेतल्याबद्दल शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली.
बनसोडे निःपक्षपातीपणे काम करतील - पवार
‘ज्येष्ठ सदस्य अण्णा बनसोडे यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर विधानसभेच्या उपाध्यक्षपदापर्यंत मजल मारली आहे. त्यांचा राजकीय प्रवास राजकारण व समाजकारणात कार्यरत असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे.
मेहनत, संघर्ष आणि लोकसेवा या तीन गोष्टींवर श्रद्धा ठेवून वाटचाल करणाऱ्या अण्णा बनसोडे यांनी आज विधानसभा उपाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी स्वीकारली आहे. प्रत्येक सदस्याच्या हक्कांचे रक्षण करणे, सर्वांना समान न्याय आणि संधी मिळवून देणे, ही जबाबदारी ते निःपक्षपातीपणे पार पाडतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.