21 लाटा, 42 मंडप; महाराष्ट्रातल्या 'तिरुपती बालाजी'चा लळीत उत्सव

21 लाटा, 42 मंडप; महाराष्ट्रातल्या 'तिरुपती बालाजी'चा लळीत उत्सव

- दिपाली सुसर

ऐतिहासिक वारसा लाभलेले, महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले भूवैकुंठ म्हणजे देवालयग्राम म्हणजेच बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा. विदर्भाचे प्रवेशद्वार असणारे देऊळगावराजा हे औरंगाबादपासून 90, तर जालन्यापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे.

देऊळगावराजाला लौकिक असणारे भक्तांचे श्रद्धास्थान म्हणजे साक्षात स्वयंभू श्री बालाजी महाराजांचे मंदिर आहे. तिरुपती बालाजीचे प्रतिरुप असं देऊळगावराजातील बालाजी मंदिराला संबोधलं जातं. या ठिकाणाचा ऐतिहासिक वारसा सांगायचा झाल्यास छत्रपती शिवाजी महाराजांचे मामा आणि मासाहेब जिजाऊ यांचे बंधू राजे लखोजीराव जाधव यांचे हे कुलदैवत आहे. अंगुष्ठमात्र असणारी श्रीलक्ष्मी श्री बालाजी सह श्रीपद्मावती यांची स्वयंभू मूर्ती देऊळगावच्या बालाजी मंदिरात विराजमान आहेत.

भक्तांनी तिरुपती बालाजीला केलेला नवस तिरुपतीला जाऊन फेडणे अशक्य असल्यास तो नवस देऊळगावचा बालाजी महाराजांना येऊन फेडला जातो. परंतु देवालयग्राम म्हणजेच देऊळगावराजा येथील बालाजी महाराजांना केलेला नवस तिरुपतीला जाऊन फेडता येत नाही. या क्षेत्रावर होणारा वार्षिक मुख्य उत्सव हा अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्‍विन वद्य चतुर्थीपर्यंत साजरा केला जातो.

सुमारे 500 वर्षाहून अधिक या उत्सवाला परंपरा आहे.

अठरापगड जाती मिळून येथील उत्सव निर्विवादपणे पार पडतात, हे येथील वैशिष्ट्य आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी श्रींचे रत्नजडित सर्व अलंकार, चांदीची भांडी, इत्यादी गोष्टी उजळून काढून पुढील श्रींचा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठीअनुष्ठान बसवले जाते.त्यानंतर रोज सकाळी 6 वाजता महाकाकड आरती होते.

मंडप कसा तयार करतात?

अश्विन शुद्ध नवमीला लाटा मंडपोत्सव असतो. यासाठी खास मंडप तयार केला जातो. ज्यात 35 फूट उंचीचे 21 सागवानी खांब मंदिरासमोर टाकले जातात. त्यावर दोन नाडे (जाड दोऱ्या) बांधले जातात आणि मग त्यावर 42 नक्षीदार मंडपाची कापडं अथरली जातात. लाटांवर अंथरलेला हा मंडप मंदिरासमोरील पटांगणावर असलेल्या गरुड आणि प्रवेशद्वारजवळ असलेल्या मारुतीच्या मूर्तीला बांधला जातो. अठरापगड जातीची सर्व मंडळी एकत्र येऊन हा मंडप उभारतात.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमीला म्हणजे दसराच्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे काकड आरती, त्यानंतर घटस्थापना, पुजारी यांचे नित्य आन्हिक, भक्तांचे अभिषेक, महाआरती करून संध्याकाळची पुष्प पूजा व शेजारती करून रात्री श्री बालाजी महाराजांचा पालखी उत्सव सुरू होतो. मंदिराचे पुजारी हे स्वयंभू श्रींची मूर्ती अमूल्य रत्नजडित अलंकार सहित पालखीमध्ये बसवतात. बालाजी महाराज पालखीत बसून रात्री अकरा वाजता सीमोल्लंघनासाठी निघतात. गावाच्या दक्षिण दिशेला असलेली 'आमना' नदीमध्ये बैठकीवर जाऊन बालाजी महाराजांची पालखी ठेवली जाते.

पालखीमध्ये समस्त भक्तांचे स्पर्श दर्शन होते. पालखी नदीत गेल्यानंतर गिरीचा बालाजी हे देऊळगावच्या बालाजी महाराजांच्या भेटीसाठी आलेले असतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे. नदीतून पालखी उचलताना पालखीही पहिल्यापेक्षा जड भासते, हा विश्वास पालखीचे खांदेकरी आजही देतात. आणि दुसर्‍या दिवशी संध्याकाळी सातच्या सुमारास पालखी मंदिरात येते. त्यानंतर सुवासिनी श्रींची नजर काढतात आणि नंतर देव पश्चिमाभिमुख होऊन भक्तांच्या दर्शनासाठी मखरामध्ये बसतात.त्यानंतर पुढचे 8 दिवस 8 मानाचे महाअभिषेक होऊन रात्री महापंगत होते.

ललित सोहळा

अश्विन वद्य चतुर्थीला सकाळी 05 वाजून 45 मिनिटांनी उत्सवाला सुरुवात होते. सकाळी 4 वाजता काल्याचे नारदीय कीर्तन त्यानंतर कृष्ण जन्म, गोपाल कृष्णाच्या बाललीला, गोपाळकाला, त्याचबरोबर मंदिरासमोर दहीहंडी हे कार्यक्रम लळीताच्या अगोदर पार पडतात. त्यानंतर ठीक पावणे सहा वाजता दहीहंडी फुटते. त्याचक्षणी 21 लाटा आणि 42 मंडप मंदिराच्या दिशेने पडतात. आतमध्ये असलेले श्रींचे पश्चिमाभिमुख असलेले सिंहासन हे पूर्ववत उत्तराभिमुख होऊन भगवंत पुर्वीच्या जागी विराजमान होतात. हे सगळे कार्यक्रम वेगळ्या ठिकाणी पण एकाच वेळी होतात.

मंदिराच्या समोर असलेले जे लाटा आणि मंडप आहे यांचे एकत्रित विसर्जन होते त्याला 'लळीत' असे म्हणतात.मंदिराच्या समोर हजारोंच्या संख्येने भाविकांच्या "बोला बालाजी महाराज की जय, लक्ष्मी रमणा गोविंदा"च्या गजरात हा उत्सव संपन्न होतो.

मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि परराज्यातूनही आलेले भाविक तसेच वारकरी, हरिदासी, रामदासी हा नेत्रदीपक सोहळा बघण्यासाठी बालाजी महाराज मंदिरासमोर हजेरी लावतात, असा भाविकांचा दावा आहे.

विशेषता हा ललित सोहळा होताना 35 फूट उंचीचे खांब मंदिरावर पडताना एकही भक्ताला आजतागायत किरकोळही दुखापत झालेली नाहीये.आलेल्या प्रत्येक भाविकाला गरीब-श्रीमंत, लहान-मोठा हा भेद न करता श्री बालाजी महाराज संस्थान हे बुंदीच्या लाडवाचा प्रसाद मोठ्या भक्तीने वाटप करतात. भाविकही मोठ्या श्रध्देने देवाला काणगी अर्पण करतात

काणगी म्हणजे देवाच्या हुंडीत टाकलेली देणगी.

त्या देणगीचा रीतसर प्रसाद व पावती देणगी टाकणाऱ्या भाविकाला संस्थानाकडून दिली जाते. अशा लळीत महोत्सवाने या उत्सवाची सांगता होते.

(देऊळगाव राजा येथील श्री बालाजी मंदिरांचे पारंपरिक पुजारी वे. मू. श्रीपाद सतीशराव पुजारी यांनी दिलेल्या माहितीवर हा लेख आधारित आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com