Shiv Sena : ठाकरे गटाकडून प्रतोद म्हणून विलास पोतनीस यांचं नाव; विधान परिषदेत शिंदे गटाचं बळ अपुरं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde vs Uddhav Thackeray

Shiv Sena : ठाकरे गटाकडून प्रतोद म्हणून विलास पोतनीस यांचं नाव; विधान परिषदेत शिंदे गटाचं बळ अपुरं

मुंबईः विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. शिंदे गटाने काढलेल्या व्हिपनंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मात्र आज विधान परिषदेत प्रतोद पदावरून घमासान होणार, हे मात्र निश्चित.

विधान परिषदेतील प्रतोद पदासाठी ठाकरे गटाकडून विलास पोतनीस यांचं नाव उपसभापतींना पाठवण्यात आलेलं आहे. विरोधी पक्षाच्या बैठकीमध्ये विलास पोतनीस यांच्या नावाचा ठराव झाल्याची माहिती असून उपनेते पदासाठी सचिन अहिर यांचं नाव उपसभापतींकडे देण्यात आलेलं आहे.

तर दुसरीकडे शिंदे गटाने विधान परिषद प्रतोद पदासाठी विप्लव बदोरिया यांचं नाव उपसभापतींना सुचवलं आहे. विधान परिषदेमध्ये ठाकरे गटाचं संख्याबळ जास्त आहे, त्यामुळे उपसभापती शिवसेना म्हणून कोणात्या गटाला प्रतोद देणार, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. ज्या गटाचा प्रतोद होईल, त्यांचा व्हिप शिवसेनेच्या आमदारांना पाळावा लागेल.

मुख्यमंत्र्यांवर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी महाविकास आघाडीकडून सुरु करण्यात आली आहे. यासाठी ठाकरे गट पुढाकार घेणार आहे. विधानपरिषदेत मविआचं संख्याबळ अधिक आहे, त्यामुळं शिंदेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना त्यांचा संबंध देशद्रोह्यांशी असल्याचा उल्लेख केला होता. विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सध्या तुरुंगात असलेले नेते नवाब मलिक यांचा संबंध जोडत शिंदेंही ही जहरी टीका केली होती.