Vinod Tawde | विनोद तावडेंचं पुनर्वसन, राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vinod-Tawde

विनोद तावडेंचं पुनर्वसन, राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी

भाजपच्या नव्या राष्ट्रीय समितीची घोषणा झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून माजी शिक्षण मंत्री विनोद तावडेंची वर्णी लागली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी परिपत्रक काढून यासंदर्भात घोषणा केली आहे. त्यामुळे तावडेंकडे राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

नुकतेच भाजपने विधानपरिषदेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यंदा चित्रा वाघ आणि विनोद तावडे यांना संधी मिळण्याची शक्यता होती. मात्र, त्यांचा पत्ता कट झाला. आता विनोद तावडे यांना थेट राष्ट्रीय समितीवर घेण्यात आलं आहे. तावडे फडणवीस सरकारमध्ये विधानपरिषदेवर निवडून गेले होते. त्यानंतर शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती. आता तावडेंना राष्ट्रीय राजकारणात स्थान देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे.

तावडेंने या आधी महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम केलं आहे. तावडे यांनी याआधी पक्षाच्या महाराष्ट्र युनिटचे सरचिटणीस, मुंबईचे अध्यक्ष,अखिल भारतीय राष्ट्रीय कार्यकारी परिषदेचे सदस्य आणि 12व्या आणि 13व्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या समन्वय समितीचे प्रमुख सदस्यपद भूषवलं आहे.

विधान परिषदेला तावडे आणि चित्रा वाघ यांचा पत्ता कट

येणाऱ्या काळात विधानपरिषदेसाठी पार पडणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपने माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्याचं ठरवलं आहे. त्यांच्यासोबत कोल्हापुरातून अमल महाडीक यांची नावं जाहीर झाली आहेत. अमल महाडिकांना टक्कर देण्यासाठी सतेज पाटील असणार आहेत.

अनेक दिवसांपासून विधानपरिषदेसाठी मुंबईतून चित्रा वाघ यांच्या नावाची चर्चा होती. वाघ यांना यंदा परिषदेसाठी संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण त्यांचा पत्ता कट झाला आहे. मुंबईतून राजहंस सिंह यांना संधी देण्यात आली आहे. तर विदर्भात भाजपने बानवकुळेंचं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केलाय. तावडे यांनाही संधी मिळणार का, अशी चर्चा होती. पण त्यांना संधी नाकारण्यात आली. आता भाजपने त्यांना केंद्रीय कार्यकारणीत स्थान दिलं आहे.

loading image
go to top