आशा, गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे जेलभरो

नवनाथ येवले
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी, मुख्यरस्त्यावर ठिय्या; शेकडो महिला
कर्मचाऱ्यांची अटक व सुटका

नांदेड : आशा स्वयंसेविकांचे मानधन वाढीसह प्रलंबित मागण्यांसाठी
सीटू संघटनेच्या वतिने मंगळवार पासून संप पुकारत जिल्हा परिषदेसमोर चक्री उपोषण सुरु करण्यात आले. रात्रभर आंदोलनकर्त्या महिलांनी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात मुक्काम ठोकून बुधवारी दुपारी जेलभरो आंदोलनाची हाक देत संघटनचे विजय गाभणे, उज्वला पडलवार,गंगाधर गायकवाड, जयश्री मोरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य रस्त्यावर शेकडो अांदोलक महिलांनी ठिय्या मांडला.

दरम्यान आशा, गटप्रवर्तक महिलांच्या रास्ता रोकोमुळे शहरातील रेल्वे स्थानक ते वजिराबाद रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. आशा, गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना तिप्पट मानधनवाढ, शासन सेवेत समाविष्ट करण्याच्या मागण्या केल्या. घोषणाबाजीसह सरकारच्या धोरणांचा निषेध करणाऱ्या आंदोलकांना वजिराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक संदिप शिवले यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी शेकडो आंदोलक महिलांना वजिराबाद पोलिस ठाण्यात हजर केले. प्रतीबंधक कारवाईनुसार आंदोलक महिलांची अटक करुन सुटका करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Volunteers of aasha goes on fasting