Train Accident : वर्धा-बडनेरा रेल्वेमार्गावर अपघात; 20 डबे घसरले, संध्याकाळपर्यंत... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Train Accident

Train Accident : वर्धा-बडनेरा रेल्वेमार्गावर अपघात; 20 डबे घसरले, संध्याकाळपर्यंत...

अमरावती: वर्धा-बडनेरा रेल्वे मार्गावर मालखेड ते टिमटाळा स्थानकादरम्यान मालगाडीचे वीस डबे रुळावरून घसरले आहेत. मध्यरात्री कोळशाची मालगाडी रुळावरून घसरल्याने या रेल्वे मार्गावरील अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

अपघातामुळे या मार्गावरील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या पर्यायी मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. दिवाळीला नागपूर-मुंबई रेल्वे मार्ग बंद असल्याने गावी दिवाळीसाठी येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.

23 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 12 ते 1 च्या दरम्यान मालखेड रेल्वे स्टेशनजवळ या गाडीचे तब्बल २० डब्बे या रुळावरुन घसरले. कोळसा वाहून नेणारी ही मालगाडी होती. यावेळी रेल्वे प्रशासनासोबत जिल्हा प्रशासन, तहसीलदार राजेंद्र इंगळे, नायब तहसिलदार केशव मळसने, मंडळ अधिकारी अमोल देशमुख, तलाठी प्रफुल्ल गेडाम पोलीस पाटील, एमव्ही माहुरे घटनास्थळी पोहचले होते. सदर दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान, वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ७०० पेक्षा अधिक कर्मचारी घटनास्थळी दाखल आहेत. आज संध्याकाळपर्य़ंत वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल, असं रेल्वे प्रशासनाने सांगितलं.

टॅग्स :accidentrailway