esakal | Wari 2019 : गोपाळकाल्याने आषाढवारीची सांगता
sakal

बोलून बातमी शोधा

पंढरपूर - विठ्ठल मंदिरात संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुकांना विठ्ठलाची भेट घडविताना घेतलेले छायाचित्र.

गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड गेला म्हणत गोपाळकाल्याचा प्रसाद घेऊन आषाढीवारीसाठी आलेल्या वारकऱ्यांनी आज जड अंतःकरणाने पंढरीनाथाचा निरोप घेतला. काल्याच्या निमित्ताने गोपाळपूरनगरी विठुनामाच्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगांच्या गजराने दुमदुमून गेली होती. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या साधू-संतांच्या दिंड्या आणि पालख्यांनीही परतीच्या वाटेवर प्रस्थान ठेवले.

Wari 2019 : गोपाळकाल्याने आषाढवारीची सांगता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर - गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड गेला म्हणत गोपाळकाल्याचा प्रसाद घेऊन आषाढीवारीसाठी आलेल्या वारकऱ्यांनी आज जड अंतःकरणाने पंढरीनाथाचा निरोप घेतला. काल्याच्या निमित्ताने गोपाळपूरनगरी विठुनामाच्या जयघोषाने आणि
टाळ-मृदंगांच्या गजराने दुमदुमून गेली होती. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या साधू-संतांच्या दिंड्या आणि पालख्यांनीही परतीच्या वाटेवर प्रस्थान ठेवले.

गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिरात आषाढी गोपाळकाल्याचा हा उत्सव भक्तिभाव आणि आनंदात आज सकाळी पार पडला. या उत्सावासाठी सुमारे तीन लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली होती.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज पहाटे अडीच वाजता मंदिरातील श्रीकृष्ण मूर्तीला पंचामृताचा अभिषेक झाला. पहाटे चार वाजता संत गजनान महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. त्यानंतर पहाटे पाच वाजता मानाची दहीहंडी फोडण्यात आली. मंदिरात प्रसाद महाराज अंमळनेकर यांचे परंपरागत काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर काल्याचा प्रसाद वाटप करण्यात आला.

काल्याच्या प्रसादासाठी यंदा मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने 11 पोती लाह्या आणि त्यासाठी लागणाऱ्या दह्याचा वापर केला होता. सकाळी आठ वाजता संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखीचे मंदिरात आगमन झाले.

या वेळी ग्रामस्थांच्या वतीने मंदिराचे विश्‍वस्त दिलीप गुरव यांच्या हस्ते पादुका पूजन करण्यात आले. संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन विठ्ठल आसबे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सातही मानाच्या पालख्यांसह अनेक दिंड्या आणि पालख्यांनी गोपाळकृष्णाचे दर्शन घेतले.

संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या प्रमुख सातही संतांच्या पादुका विठ्ठल चरणी ठेवून दर्शन सोहळा पार पाडला. या वेळी मंदिर समितीच्या वतीने सर्व पालखीप्रमुखांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पालखी सोहळ्यांनी परतीच्या प्रवासासाठी प्रस्थान ठेवले. चंद्रग्रहण असल्यामुळे संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान उद्या (ता. 17) होणार आहे.

संत आणि विठ्ठल भेटीचा रंगला सोहळा
गुरुपौर्णिमेच्या गोपाळकाल्यानंतर आज दुपारी विविध साधू-संत आणि भगवंत विठ्ठल यांच्यातील भेटीचा अनुपम्य असा भेटीचा सोहळा मंदिरात रंगला. आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत मुक्ताबाई, संत सोपानकाका यांसह अनेक दिंड्या आणि पालख्या पंढरीत येतात. पौर्णिमेनंतर सर्व पालख्या परतीच्या प्रवासाला लागतात. आजही गोपाळपूर येथील गोपाळकाल्याचा प्रसाद घेऊन प्रमुख मानाच्या सात पालख्यांनी विठुरायाचे दर्शन घेऊन पंढरीचा निरोप घेतला.

loading image