कचरा विलगीकरण प्रक्रिया राज्यात राबवावी - एकनाथ शिंदे 

सकाळ न्यूज नेटवर्क 
बुधवार, 15 जानेवारी 2020

घनकचरा व्यवस्थापनावर अधिक लक्ष देतानाच राज्यस्तरीय बृहत प्रकल्प आराखडा तयार करावा. 1 मेपर्यंत संपूर्ण राज्यात कचरा विलगीकरणाची प्रक्रिया अवलंबवावी. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात राज्यस्तरावर नोडल अधिकारी नेमावा.

मुंबई - घनकचरा व्यवस्थापनावर अधिक लक्ष देतानाच राज्यस्तरीय बृहत प्रकल्प आराखडा तयार करावा. 1 मेपर्यंत संपूर्ण राज्यात कचरा विलगीकरणाची प्रक्रिया अवलंबवावी. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात राज्यस्तरावर नोडल अधिकारी नेमावा. राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी स्वच्छता, पाणी, रस्ते, स्वच्छतागृहांसाठी आराखडा तयार करावा, असे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे दिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नगरविकासमंत्र्यांनी मंत्रालयात विभागाचा आढावा घेतला. या वेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित होते. शिंदे म्हणाले, ""राज्याचे नागरीकरण वाढले असून, संपूर्ण महाराष्ट्र हगणदारीमुक्त झाला आहे. राज्यात सुमारे 53 टक्के कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असून, त्याचे उद्दिष्ट 100 टक्के करावे. घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्यस्तरीय बृहतआराखडा तयार करावा आणि घनकचरा व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण करावे. सगळ्याच कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विलगीकरण सक्तीचे करावे. 

शिंदे म्हणाले... 
- सध्या कचरा विलगीकरणाचे प्रमाण 72 टक्के 
-1 मेपर्यंत उद्दिष्ट 100 टक्के करावे 
- सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी 2800 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करावा 
- प्रत्येक शहरामध्ये अमृतवन योजना प्रभावीपणे राबवावी 
- स्मार्ट सिटी योजनांच्या कामांना गती द्यावी 
- स्वच्छता, पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापनावर भर द्यावा 
- विविध महापालिकांच्या पदांसंदर्भातील आकृतिबंधावर तातडीने निर्णय घ्यावा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: waste disposal process should be implemented in the state says eknath shinde