केंद्राच्या 'या' दोन योजनांमुळे पाटबंधारे प्रकल्पांची कामे सुरु : जयंत पाटील

उमेश बांबरे
Saturday, 11 July 2020

त्या दिवशी रात्री उशिरा बैठकीसाठी आल्यामुळे सातारा मेडिकल कॉलेजला कोणती जागा दिली आणि त्याबदल्यात पाटबंधारे विभागाला महसूल विभागाकडून खावलीची कोणती जागा मिळणार होती. याची पाहणी करण्याचे राहिले होते. त्यामुळे आज आम्ही या दोन्ही जागांची पाहणी केली असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

सातारा : साताऱ्यातील मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रश्‍न मिटला असून, त्या जागेच्या बदल्यात खावलीची जागा पाटबंधारेला परत घेणार असून, त्यावर पाटबंधारे विभागाची कार्यालये स्थलांतरित केली जातील, असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. 
 
कृष्णा खोऱ्याची साताऱ्यातील जमीन मेडिकल कॉलेजला दिलेल्या जमिनीच्या बदल्यात खावली येथील महसूल विभागाची जमीन कृष्णा खोऱ्याकडे हस्तांतरित केली जाणार आहे. या जमिनीची पाहणी, जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जलसंपदामंत्री पाटील आज (शनिवार) इस्लामपूरकडे जाताना काही काळ साताऱ्यात थांबले. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना गाठले आणि काही वेळ संवाद साधला.

श्री. पाटील म्हणाले, सातारा मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रश्‍न मिटला आहे. त्यामुळे सध्या दिलेल्या 70 एकर जागेच्या बदल्यात खावली येथील महसूल विभागाची जागा पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरित केली जाणार आहे. या दोन्ही जागांची मी आज पाहणी केली. मेडिकल कॉलेजसाठी दिलेल्या जागेवर पाटबंधारे विभाग, लघुपाटबंधारे व कार्यशाळा ही जलसंपदा विभागाची कार्यालये आहेत. ही कार्यालये आता खावली येथील जागेत स्थलांतरित करावी लागणार आहेत. या कार्यालयांच्या इमारतींचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्याची माहिती घेतल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

दरम्यान कोरोनामुळे जलसंपदाच्या निधीस कात्री लागली असली, तरी केंद्राच्या पंतप्रधान कृषी सिंचन योजना आणि बळीराजा जलसंजीवनी या दोन योजनांतून निधी उपलब्ध होत आहे. यामुळे पाटबंधारे प्रकल्पांची कामे मार्गी लागणार आहेत. यासाठी कोणतेही कर्ज काढण्याची आवश्‍यकता नाही असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. 

संपादन - सिद्धार्थ लाटकर 

जाणून घ्या महावितरणचा व्हॉट्‌सऍप क्रमांक; घरुनच नोंदवा विजेबाबतच्या तक्रारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water And Resources Minister Jayant Patil Visited Satara District