Water issue : पाण्यासाठी दाही दिशा...; दुष्काळात राज्यातील नागरिकांची होरपळ

राज्यात लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढत असतानाच दुष्काळाचा दाहही वाढतो आहे.
maharashtra drought
maharashtra droughtsakal

मुंबई - राज्यात लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढत असतानाच दुष्काळाचा दाहही वाढतो आहे. राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला असून, अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. धरणे, तलाव आटल्याने टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असला तरीही कडाक्याच्या उन्हात नागरिकांना पाण्यासाठी ‘दाही दिशा’ वणवण करण्याची वेळ आली आहे.

मराठवाडा - धरणे आटली, पाणीसाठा घटला, टॅंकर वाढले

गेल्यावर्षी पुरेसा पाऊस पडला नसल्यामुळे मराठवाडा विभागातील दहा तालुक्यांसह १८० महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे तर अनेक महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती आहे. अजून कडकडीत उन्हाचे दोन महिने आहेत. तर दुसरीकडे मराठवाड्यातील मोठ्या, मध्यम, लघु प्रकल्प आणि बंधाऱ्यांमध्ये केवळ २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे राहणार आहे. मराठवाड्यात ११ मोठे प्रकल्प आहेत. त्यामध्ये केवळ २७ टक्के पाणीसाठा आहे. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी चार प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत तर २६ मध्यम प्रकल्पातील पाणी जोत्याच्या खाली गेले आहे. ७५० लघु प्रकल्पांपैकी १०८ प्रकल्प कोरडे पडले आहेत तर २८२ लघु प्रकल्पांचे पाणी जोत्याच्या खाली गेले आहे.

सातशेवर टॅंकर सुरु

मार्चअखेरीस मराठवाड्यातील आठपैकी पाच जिल्ह्यांतील ४९७ गावे आणि १५० वाड्या अशा तब्बल ६४७ गावांना ७६३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक टॅंकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३८५ व जालना जिल्ह्यात २३५ टॅंकर धावत आहेत. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २४० गावे आणि ४५ वाड्यांना टॅंकरवर अवलंबून राहावे लागत आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी विभागात १ हजार १०९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. खरिपात शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

रब्बीवर थोड्याफार अपेक्षा होत्या मात्र पुरेसा पाऊस नसल्याने रब्बीचेही पीक हातचे गेले आहे. चारा पिकांची लागवड करणे, जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करणे या बाबीचा लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत विसर पडू न देणे गरजेचे आहे.

विदर्भ - काही भागांत टंचाईच्या झळा

मार्च महिन्यापासून तापमान वाढत चालले आहे. त्यामुळे परिणाम विदर्भातील नदी, नाले, धरणांतील पाणीसाठा हळूहळू कमी होऊ लागला आहे. विदर्भात अद्याप तरी तीव्र दुष्काळ जाणवत नसला तरी आगामी काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. विशेषतः वर्धा, चंद्रपूर, अमरावती,भंडारा या जिल्ह्यांतील काही भागांत दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत.

वर्धा जिल्ह्यात पाणी पुरवठा विभागाच्या अहवालात १५९ गावांना पाणीटंचाईच्या झळा बसणार असल्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या गावांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, याची दखल घेत कोट्यवधी रुपये खर्च करून २९४ उपाययोजना राबविण्यात येणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील नदी, नाले, धरणांतील पाणीसाठा हळूहळू कमी होऊ लागला आहे. जिल्ह्यात ११ मध्यम प्रकल्पांत सध्या २६.४९ टक्केच जलसाठा आहे. अमरावती जिल्ह्यात सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्के पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मिमी पेक्षा कमी झाले आहे, अशा महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातील १३४ गावांमध्ये जलसंकट निर्माण झाले आहे. यात भंडारा तालुक्यातील २५ गावे, साकोली २६, लाखनी १४, मोहाडी २०, तुमसर २६, पवनी १४, लाखांदूर ९ अशा तालुकानिहाय गावांचा समावेश आहे.

कोकण - योजनांचा सुकाळ अन् पाण्याचा दुष्काळ

राज्याच्या इतर भागापेक्षा अधिक पाऊस पडणाऱ्या कोकण विभागालाही यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शासनाने जलयुक्त शिवारसारख्या योजना राबवून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यात फारसे यश मिळाल्याचे दिसत नाही. धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या ठाण्यात मार्च महिना उजाडताच पाणीटंचाईने डोके वर काढले. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांत ११६ हून अधिक गाव-पाड्यांना तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.

रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण व पनवेल या तीन तालुक्यांतील ५३ ठिकाणी १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात १० गावे व ४३ वाड्यांचा समावेश आहे. साधारण २० हजार नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

पालघर जिल्ह्यातील वाडा, जव्हार, मोखाडा व वसई या ४ तालुक्यांत पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. मोखाड्यातील ७ गावे ३५ पाड्यात, जव्हारमध्ये एक गाव ८ पाड्यात, तर वाडा येथे २ गावे व ३५ पाड्यांना ४८७ टँकरच्या फेऱ्या सुरू आहेत.

प. महाराष्ट्र - तापमान वाढले; गावे तहानली

पश्चिम महाराष्ट्रातही पुणे, नगर, सोलापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांत दुष्काळ व पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. नगर जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात टंचाईच्या झळा तीव्र झालेल्या आहेत. जिल्ह्यातील १११ गावे व ५४५ वाड्यावस्तींवर १०६ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टॅंकरची संख्या अवघी २४ होती.

सांगलीत ७६ गावांत टँकर

संपूर्ण जिल्हा मध्यम दुष्काळी जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ७६ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.

नगरमधील स्थिती

  • १०६ - मंजूर टॅंकर

  • १११ - टंचाईग्रस्त गावे

  • २७६ - मंजूर खेपा

  • ५४५ - टंचाईग्रस्त वाड्या

सव्वालाख जणांच्या घशाला पुणे जिल्ह्यात कोरड

पुणे जिल्ह्यातील ७० गावे आणि ४७९ वाड्या-वस्त्यांना ९३ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. ही गावे आणि वाड्या-वस्त्यांमधील मिळून एकूण १ लाख ३२ हजार ८५३ लोकसंख्या तहानलेली असून, या लोकसंख्येची तहान टँकरच्या पाण्याद्वारे भागविण्यात येत आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक ५० टँकर पुरंदर तालुक्यात सुरु असून, या तालुक्यातील सर्वाधिक ३३ गावे २३२ वाड्या-वस्त्यांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. पुरंदरपाठोपाठ बारामती तालुक्यातील टंचाईग्रस्त १६ गावे आणि १२३ वाड्या-वस्त्यांसाठी १८ टँकर सुरू आहेत.

सातारा जिल्ह्यात विहिरी, बोअरवेलची पातळी खालावली

सातारा जिल्ह्यात माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक तलावांसह विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी खालावल्याने पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. जिल्ह्यात १५६ गावे व ५६० वाड्यांना १५७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. माण तालुक्यात सर्वाधिक ४३० ठिकाणी ७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आणखी दोन ते अडीच महिने भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने युद्ध पातळीवर उपाययोजना सुरु केल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यात ३६ गावे टँकरग्रस्त

सोलापूर जिल्ह्यात मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यापासूनच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्यातील ३६ गावांना सध्या ४० टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मे व जूनपर्यंत टँकरची संख्या जवळपास ३०० च्या घरात जाईल, अशी शक्यता आहे. सोलापूरच्या तापमानाचा पारा सध्या ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे असून उन्हाचा चटका आणि दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

सोलापूर शहरासह जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुके व तालुक्यातील मोठ्या गावांचा पाणीपुरवठा उजनी धरणावर अवलंबून आहे. सध्या उजनी धरण उणे ३७ टक्के आहे. जिल्ह्यात जुलै-ऑगस्टपासून पावसाला सुरुवात होते. तोपर्यंत उजनी धरणातील पाणी जपून वापरण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. जानेवारीपासून शेतकऱ्यांना चारा बियाणे वाटप करण्यात आले आहे.

उ. महाराष्ट्र - दुष्काळाच्या दाहकतेत वाढ

सध्या उन्हामुळे महाराष्ट्र तापत असताना उत्तर महाराष्ट्र विभागात येणाऱ्या नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांत शासनाने ३६३ टँकर सुरू केले आहेत. यात काही ठिकाणी खासगी टँकर पोहोचत असून, काही ठिकाणी शासकीय टँकर पिण्याच्या पाण्याची सोय भागवीत आहेत.

सध्या उन्हामुळे महाराष्ट्र तापत असताना नाशिक विभागात येणाऱ्या नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांत शासनाने ३६३ टँकर सुरू केले आहेत. यात काही ठिकाणी खासगी टँकर पोहोचत असून, काही ठिकाणी शासकीय टँकर पिण्याच्या पाण्याची सोय भागवत आहे.

नाशिक जिल्ह्यात २०७ टँकर असून, नांदगाव, चांदवड आणि येवला या तीन तालुक्यांत टँकरची संख्या जास्त आहे. धुळे जिल्ह्यात पाच टँकर आहेत. यात शिंदखेड्याला तीन आणि धुळ्यात दोन टँकर सुरू आहेत. नंदुरबार जिल्ह्यात एकही टँकर नाही; तर जळगाव जिल्ह्यात ५१ टँकर आहेत. चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक टँकर पोहोचत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात १०० टँकर आहेत. यात पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक टँकरची संख्या आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com