उजनी धरणाचा पाणीसाठा पोचला 110 टक्‍यांवर 

संतोष सिरसट 
Thursday, 3 September 2020

तर पाणी सोडणे वाढू शकते 
धरणात पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागल्यास धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये वाढ केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यात पाऊस किती पडतो यावर सर्वकाही अवलंबून आहे. पाऊस पडला तर भीमा नदीला पूरही येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

सोलापूर ः जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण 110 टक्के भरले आहे. धरणात पुणे जिल्ह्यातून पाणी येत असल्याने नदीसह बोगदा, कालव्यातून पाणी सोडणे सुरु केले आहे. दौंड येथून धरणात अद्यापही सात हजार 58 क्‍सुसेकने पाणी येत आहे. 

पुणे जिल्ह्याच्या पावसावर उजनी धरणाची मदार आहे. त्याठिकाणी पाऊस झाला तरच धरण 100 टक्‍याच्या पुढे भरते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या पावसाऐवजी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यादृष्टीने पुणे जिल्ह्यात पाऊस पडणे महत्वाचे असते. धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये येणाऱ्या तालुक्‍यातील शेतकऱ्यांची ही इच्छा यंदाच्या वर्षी वरुणराजाने पूर्ण केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ढोल-ताशाच्या गजरात या पाण्याचे पूजनही शेतकऱ्यांनी केले आहे. 

धरणात सध्या बंडगार्डन येथून नऊ हजाराच्या पुढे येत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. धरण शंभर टक्‍याच्यावर भरल्यामुळे धरणातून पाणी सोडण्यास लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने सुरवात केली आहे. धरणात सध्या बोगद्याच्या माध्यमातून 900 क्‍सुसेक, सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी 299 क्‍सुसेक, दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी 105, मुख्य कालव्यातून दोन हजार 400, विद्युत निर्मितीसाठी एक हजार 600 तर नदीद्वारे दोन हजार 500 क्‍सुसेकने पाणी सोडले आहे. धरणाता एकूण 41 दरवाजे आहेत. त्यापैकी दोन दरवाज्यातून हे पाणी सोडले जात आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The water storage of Ujani dam has reached 110 percent