पश्‍चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यातही टॅंकरने पाणी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा वगळता उर्वरित चार जिल्ह्यांमध्ये 11 लाखांहून अधिक नागरिक आणि साडेचार लाख जनावरांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे.

पुणे - पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा वगळता उर्वरित चार जिल्ह्यांमध्ये 11 लाखांहून अधिक नागरिक आणि साडेचार लाख जनावरांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. या जिल्ह्यांत 587 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, त्यापैकी सर्वाधिक 345 टॅंकर सोलापूर जिल्ह्यात सुरू आहेत. 

पुणे, सातारा जिल्ह्यात काही तालुक्‍यांमध्ये पावसाअभावी टॅंकर सुरू आहेत. सांगली जिल्ह्यात महापूर येऊनही जत, आटपाडी आणि तासगाव तालुक्‍यात पाण्याअभावी नागरिकांचे हाल सुरू आहेत. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्‍यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. येथे सर्वाधिक 97 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर, खटाव तालुक्‍यात तीन आणि फलटण तालुक्‍यात दोन टॅंकर सुरू आहेत. 

सोलापूर जिल्ह्यात उत्तर सोलापूर, बार्शी, दक्षिण सोलापूर, अक्‍कलकोट, माढा, करमाळा, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला आणि माळशिरस तालुक्‍यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. 

पुणे जिल्ह्यातही 41 टॅंकरद्वारे पाणी 
पुणे जिल्ह्यात सध्या 41 टॅंकरद्वारे 40 गावे आणि 324 वाड्यांमधील एक लाख नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बारामती तालुक्‍यात 15, इंदापूर 14, पुरंदर 11 आणि आंबेगाव तालुक्‍यात एका टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water tanker even in the rainy season