esakal | गडचिरोली पोलिसांची धाडसी मोहीम; गृहमंत्र्यांकडून कौतुक
sakal

बोलून बातमी शोधा

anil deshmukh

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात अतिदुर्गम अबुझमाड जंगल परिसरात आज पोलिसांनी नक्षलवाद्यांचा शस्त्रास्त्रे तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला.

गडचिरोली पोलिसांची धाडसी मोहीम; गृहमंत्र्यांकडून कौतुक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात अतिदुर्गम अबुझमाड जंगल परिसरात आज पोलिसांनी नक्षलवाद्यांचा शस्त्रास्त्रे तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला. ४८ तासांहून अधिक काळ ही मोहीम सुरू होती. या मोहिमेत एक पोलिस जवान जखमी झाला.

विशेष अभियान पथकाचे (सी-६०) जवान महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील मुरुमभुशी गावाजवळील जंगलात गुरुवारी नक्षलविरोधी अभियान राबवत होते. त्यावेळी त्यांना या भागात काही संशयास्पद कारवाया दिसून आल्या. पोलिसांना पाहताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरु केला. पोलिसांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिल्याने जंगलाचा फायदा घेऊन नक्षलवाद्यांनी पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी या परिसरात शोध मोहीम राबविली असता, त्यांना तेथील एका नक्षली कॅम्पमध्ये शस्त्रास्त्रे तयार करण्याचा कारखाना आढळून आला.

महाराष्ट्रातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पोलिसांनी ही सारी यंत्रसामग्री उद्ध्वस्त केली. तेथून परतताना नक्षलवाद्यांनी पुन्हा पोलिस पथकावर गोळीबार केला. त्यालाही पोलिसांनी चोख उत्तर दिले. या परिसरात शस्त्रांचा कारखानाच आढळून आल्याने या भागात आणखी नक्षली दबा धरून बसले असल्याचा संशय बळावला होता. त्यामुळे आज परिसरात परत शोध घेण्यासाठी सी-६०चे जवान पाठविण्यात आले. त्यांच्यावर परत नक्षलवाद्यांनी हल्ला केला. परंतु पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर देत नक्षलवाद्यांचे मोठे नुकसान केले व हल्ला परतवून लागला. 

नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जवानाच्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरने रवाना करण्यात आले. शस्त्र कारखाना उद्ध्वस्त करण्यात यश मिळवल्याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.