पावसाळा यंदा सर्वसाधारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

weather update jalgaon rains are normal and disease will less this year

पावसाळा यंदा सर्वसाधारण

जळगाव : जळगाव (जामोद) तालुक्यातील भेंडवळ येथे सुमारे तीनशे वर्षांपूर्वी चंद्रभान महाराज यांनी पीक-पाणी व पाऊस अंदाज वर्तविण्यासाठी सुरू केलेल्या घटमांडणीचे भाकीत बुधवारी पहाटे पाच वाजता जाहीर करण्यात आले. या भाकितानुसार या वर्षी पावसाळा सर्वसाधारण स्वरूपाचा राहणार असून, खरिपातील तूर, कपाशी व रब्बीतील गहू, हरभरा ही पिके सर्वोत्तम राहतील, पण पशुपालकांना चारा टंचाईचा सामना करावा लागणार आहे. देशाचा राजा हा कायम असला तरी परकीय संकटाची भीती मात्र राहणार आहे. देशाची आर्थिक स्थिती सुद्धा कमकुवत असल्याचे भाकीत या मांडणीतून जाहीर करण्यात आले.अक्षय्यतृतीयेला मंगळवारी (ता.३) सायंकाळी गावाबाहेरील शेतामध्ये घटमांडणी करण्यात आली. ंपुंजाजी महाराज व सारंगधर महाराज यांनी आज घटाचे अवलोकन केले.

पावसाचा अंदाज

घटामध्ये घागरखाली असलेल्या मातीची ढेकळे पूर्णपणे ओली झाली होती. त्यावरून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला. पहिल्या जून महिन्यामध्ये पाऊस हा सर्वसाधारण स्वरूपाचा, जुलैमध्ये त्यापेक्षा कमी, ऑगस्टमध्ये एकदम चांगला, तर सप्टेंबर महिन्यात अधिक असेल. या महिन्यांत काही ठिकाणी पूर परिस्थिती संभवते. यावर्षी अवकाळी पाऊस जास्त प्रमाणात पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

नैसर्गिक संकट

घटामधील पुरी गायब असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी पुराचे संकट उद्‍भवण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. जिथे कमी स्वरूपाचा पाऊस पडेल तिथे दुष्काळी परिस्थिती उद्भवू शकते. पशुपालकांना चाराटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

राजकीय

‘राजा’ हा कायम असणार म्हणजे देशात सत्तांतर होणार नाही. परकीय संकट येईल व राज्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची राहणार आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्थाही कमकुवत होण्याचा अंदाज आहे.

आरोग्य

भादली हे पीक रोगराईचे प्रतीक आहे. भादली हे घटाच्या आत-बाहेर फेकले गेले आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात रोगराई येणार आहे, पण गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी राहणार आहे.

अशी असते घटमांडणी

घटमांडणीत मध्यभागी एक खड्डा करून त्यात मातीच्या ढेकळांवर पाण्याची घागर ठेवण्यात येते. त्या घागरीवर कुरडईचा नैवेद्य ठेवण्यात येतो. खड्ड्याभोवती गोलाकार घटांमध्ये अंबाडी, सरकी (कपाशी), ज्वारी, तूर, मूग, उडीद, तीळ, भादली, बाजरी, हिवाळी मूग, साळी (भात), जवस, लाख, वाटाणा, गहू, हरभरा, करडी, मसूर ही १८ धान्ये असतात.

Web Title: Weather Update Jalgaon Rains Are Normal And Disease Will Less This Year

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top