
विदर्भात चटका वाढणार चंद्रपुरातील पारा ४५ अंशांवर
पुणे : विदर्भात पुन्हा उन्हाचा चटका वाढला आहे. चंद्रपूर येथे उष्णतेची लाट आली असून, शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज विदर्भात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला असून, उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे. राज्यात उन्हाचा चटका असह्य होत असून, दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे अशक्य होत आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने रात्रीच्या वेळी उकाडाही जाणवत आहे. चंद्रपूरसह वर्धा, यवतमाळ, ब्रह्मपुरी येथील तापमान ४४ अंशांच्या पुढे गेले आहे. राज्यात मुख्यतः उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज असून, उन्हाचा चटका कायम राहणार आहे.
विदर्भात उन्हाचा ताप वाढत असल्याने आज बहुतांशी भागात उष्ण लाटेचा इशाराही देण्यात आला आहे. यातच विदर्भ आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. मध्यप्रदेश, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात ढगाळ हवामान निर्माण होण्याची शक्यता आहे.
सौर प्रकोप
चंद्रपूर ४५.२
वर्धा ४४.४
यवतमाळ ४४.२
ब्रह्मपुरी ४४.
येलो अलर्ट
अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर.