
पूर्वमोसमी’चा पिकांना दणका; फळबागांचे नुकसान, ऊसतोडणी खोळंबणार
पुणे : तळ कोकण, दक्षिण -मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी शुक्रवारीही पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर, सांगलीसह राज्याच्या विविध भागांत काल वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने पिकांना दणका दिला आहे. पावसामुळे केळी, पपई, द्राक्ष, डाळिंब, लिंबू, केळी आदी फळबागांसह उन्हाळी पिके आणि भाजीपाला पिकांना जोरदार फटका बसला आहे. कोल्हापुरातील आजरा येथे सर्वाधिक ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर सोलापूर, सातारा जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली.
वीस तास झोडपले
सांगली : जिल्ह्यात काल सायंकाळी आलेल्या वळीवाने आज दुपारपर्यंत तळ ठोकत तब्बल वीस तास धुवून काढले. त्यामुळे मे महिन्यात ओढे भरून वाहायला लागले. ढालगावजवळ वीज पडून २७ मेंढ्यांचा मृत्यू झाला. हस्त तळ ठोकतो, तशीच अवस्था होती. मे महिन्यात वळवाचा पाऊस अशा पद्धतीने पडलेला पहिल्यांदाच पाहतोय, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठांनी व्यक्त केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात रिपरिप
रत्नागिरीः जिल्ह्यातील अवकाळी पावसाचा फटका अंतिम टप्प्यात असलेल्या आंबा हंगामावर होणार आहे. गुरुवारी (ता. १९) रात्रीपासून पडत असलेला पाऊस आज दिवसभर सुरूच होता. झाडावरील आंबा काढणे अशक्य असल्यामुळे तो गळून जाण्याची भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे. आज सकाळी साडेआठपर्यंत संपलेल्या २४ तासांत सर्वच तालुक्यात पावसाची नोंद झाली. रस्ते निसरडे झाल्याने रत्नागिरी शहरात दहा ते बारा दुचाकीस्वार घसरून पडले. किनारी भागात काही ठिकाणी आंबा गळ झाली आहे.
वादळी वाऱ्यासह पाऊस
औरंगाबाद ः मराठवाड्याच्या काही भागात सलग दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस झाला. परभणी शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह अर्धा तास जोरदार पाऊस झाला. हिंगोली शहरासह परिसरातील भागांत मेघगर्जनेसह हलक्या सरी कोसळल्या. लातूर शहर व परिसरात विजांच्या कडकडाटासह अर्धा तास पाऊस झाला. शहरातील तुंबलेल्या नाल्यांतून पाणी रस्त्यावर आले. उमरगा (जि. उस्मानाबाद) तालुक्यात दुपारी तीन ते सायंकाळी सहापर्यंत जोरदार पाऊस झाला. बाजारपेठेतील काही दुकानांत पाणी शिरले होते. बीडच्या काही भागांतही हलका पाऊस झाला.
साताऱ्यात ऊस तोडणी खोळंबली
सातारा, कऱ्हाड, पाटण, महाबळेश्वर तालुक्यात काल रात्री अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी लावली. तसेच कोरेगाव, वाई, जावळी, माण तालुक्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला आहे. सातारा, कऱ्हाड, पाटण तालुक्याला सर्वाधिक पावसाने झोडपले आहे. सातारा तालुक्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने ऊस तोडणीची कामे ठप्प झाली होती. सध्या शेतात उन्हाळी भुईमुगाची काढणी सुरू आहे.
वऱ्हाडात फळबागांना फटका
वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी फळबागा मोडून पडल्या. बुलडाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यात वीज पडून तीन जनावरे दगावली. अकोला जिल्ह्यात सातपुड्याच्या कुशीत असलेल्या काही गावात गुरुवारी (ता. १९) सायंकाळच्या सुमारास पूर्वमोसमी पाऊस व वादळाने हजेरी लावली.
जोरदार वादळामुळे तेल्हारा तालुक्यातील सुमारे १५० ते २०० एकरांवरील केळी बागांना फटका बसला. पपई, लिंबूची झाडे तुटून पडली तर कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले. चितलवाडी येथे लिंबूची जुनी झाडे उन्मळून पडली. तसेच लोणार तालुक्यातील तांबोळा वीज पडून तीन गाईचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
पंढरपुरात केळी बागांना फटका
पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढ्यात या पावसाने आंबा, केळी, द्राक्ष, डाळिंब या फळपिकांचे, तर काही ठिकाणी काढणीस आलेल्या कांदा आणि भाजीपाल्याचे नुकसान केले. अगोदर उष्णतेमुळ केळीला फटका बसला तर आता पावसानेही फटका बसला आहे. सोलापूर शहरात काल पडलेल्या पावसाने ठिकठिकाणी पाणी साचले होते. सायंकाळपर्यंत ७.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. एकाच पावसात शहर पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. जिल्ह्यातही काल सर्वदूर पडला. ऊस, कडवळ, मका आदी पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरला आहे. मात्र, द्राक्ष बागा उतरविण्याचे काम बाकी असल्याने बागायतदार अडचणीत आले आहेत.