
राज्यातील महावितरणच्या चारही प्रादेशिक विभागात महावितरणच्या कृषी धोरणाचा सर्वांत जास्त माफीचा लाभ हा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी घेतला आहे. या धोरणांतर्गत पुणे विभागात १ लाख ३० हजार ८४३ ग्राहकांकडून २२६ कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला आहे.
‘महाकृषी ऊर्जे’चा सर्वाधिक लाभ पश्चिम महाराष्ट्राला; विदर्भातील शेतकरी सवलतीचा लाभ घेण्यात मागेच
अमरावती : महावितरणच्या महाकृषी ऊर्जा धोरणांचा सर्वाधिक लाभ पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्याखालोखाल कोकण परिमंडळाने बाजी मारली असून त्यानंतर औरंगाबादचा क्रमांक आहे. विदर्भात मात्र अजूनही वीजबिल भरण्यात व सवलतींचा लाभ घेण्याचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे महावितरणने जाहीर केलेल्या आकडेवारीतून दिसून येते.
कृषिपंपधारकांकडील थकीत देयकांच्या वसुलीसाठी महावितरणने लागू केलेल्या महाकृषी धोरणांतर्गत व्याज व विलंब आकाराच्या शंभर टक्के माफीसह सुधारित थकबाकीतही ५० टक्के माफी जाहीर केली आहे. या सवलतीचा लाभ अधिकाधिक कृषिपंपधारक शेतकऱ्यांनी घ्यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र या सवलतीचा लाभ घेण्यात विदर्भातील शेतकरी पुन्हा मागे पडला आहे.
नागपूर परिमंडळातील ६७ हजार ६१८ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून ५३ कोटी रुपयांचा भरणा केला आहे. तर अमरावती परिमंडळात एकूण आतापर्यंत ८ हजार ४०५ ग्राहक या धोरणात सहभागी झाले आहेत. त्यांनी या धोरणानुसार व्याज व विलंब आकार सोडून फक्त आपल्या मूळ थकबाकीपैकी ५० टक्के म्हणजे ५ कोटी ३६ लाख रुपये भरल्याने त्यांना तत्काळ ५ कोटी ३६ लाख रुपयांची माफी देण्यात आली आहे. शिवाय या धोरणांतर्गत चालू वीजबिल भरणे बंधनकारक असल्याने या थकबाकीदार ग्राहकांनी २ कोटी ९२ लाख रुपयांचे कृषिपंपाचे चालू देयके भरून वीजबिल कोरे करून घेतले आहे.
राज्यातील महावितरणच्या चारही प्रादेशिक विभागात महावितरणच्या कृषी धोरणाचा सर्वांत जास्त माफीचा लाभ हा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी घेतला आहे. या धोरणांतर्गत पुणे विभागात १ लाख ३० हजार ८४३ ग्राहकांकडून २२६ कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. दुसरे सर्वांत जास्त लाभ घेणारे कोकण विभाग आहे. या विभागातून २ लाख ४६ हजार ६३९ ग्राहकांकडून १५८ कोटी रुपये भरण्यात आले आहे. त्यानंतर ९३ कोटी रुपयाचा भरणा औरंगाबाद विभागातील १ लाख ८२ हजार ग्राहकांकडून करण्यात आला आहे.