esakal | शिवसेना खासदार गवळीप्रकरणात सीएंच्या तक्रारीवर काय कारवाई केली?
sakal

बोलून बातमी शोधा

bhavna-gawli

शिवसेना खासदार गवळीप्रकरणात सीएंच्या तक्रारीवर काय कारवाई केली?

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : वाशीमच्या (Washim) शिवसेना खासदार भावना गवळी (MP Bhawana Gawali) यांच्यावर सहकारी कारखाना विक्रीमध्ये कोट्यवधीचा आर्थिक घोटाळ्याप्रकरणी आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात सनदी लेखापालांनी गवळी यांच्या बाजूने सकारात्मक अहवाल (ऑडिट रिपोर्ट) तयार करून देण्यासाठी नकार दिल्यानंतर लेखापालांवर दबाव आणून धमकी देत मारहाण झाल्याचा (Aurangabad) प्रकार घडला होता. यासंदर्भात सनदी लेखापाल यांनी संबंधित पोलिस ठाणे, पोलिस आयुक्तांना तक्रार अर्ज देऊनही दखल न घेतल्याने लेखापाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (Bombay High Court's Aurangabad Bench) धाव घेत याचिका दाखल केली. यावर सुनावणीदरम्यान संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना ३० ऑगस्टपर्यंत तक्रार अर्जाच्या अनुषंगाने उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायमूर्ती व्ही. के. जाधव आणि न्यायमूर्ती श्रीकांत डी. कुलकर्णी यांच्या पीठाने दिले.

हेही वाचा: जनते पुढे राजकारणी हारले! आंचल गोयल या जिल्हाधिकारीपदी रुजू

यासंदर्भात सनदी लेखापाल उपेंद्र गुणवंतराव मुळे (रा. मुकुंद हाउसिंग सोसायटी, एन-२) यांनी ॲड. अमोल गांधी यांच्यामार्फत याचिका दाखल केली. त्यानुसार सनदी लेखापाल उपेंद्र यांचे वाशीमच्या शिवसेना खासदार गवळी यांच्याशी २००८ पासून व्यावसायिक संबंध होते. दरम्यान, श्री बालाजी सहकारी पार्टिकल बोर्ड कारखान्याच्या विक्रीत कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शिवसेनेचे माजी उपशहर प्रमुख हरीश सारडा यांनी याचिका दाखल केली होती. याप्रकरणात स्वीय सहायक अशोक गांडोळे यांनी २५ कोटी रुपयांचा अपहार केल्याचे सांगत खासदार गवळी यांनी बेकायदेशीर आणि अवैध कागदपत्रे तयार करण्यासाठी मुळे यांना सप्टेबर २०१९ मध्ये सांगितले होते. मात्र, मुळे यांनी २५ कोटींची रोकड नेमकी आली कोठून, असा सवाल उपस्थित करून अवैध आणि बेकायदेशीर ऑडिट रिपोर्ट तयार करण्यास नकार दिला होता. तरीही खासदार गवळी यांनी मुळे यांच्यावर दबाव टाकून रिपोर्ट बनविण्यास गवळींचे समर्थक सईद खान, गुंडांमार्फत धमक्या आणि मारहाण केल्याचाही प्रकार औरंगाबादेत घडला होता. त्याविरोधात मुळे यांनी ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी मुकुंदवाडी पोलिस ठाणे, पोलिस आयुक्त, औरंगाबाद यांच्याकडे खासदार गवळी यांच्यासह समर्थक, सईद खान व अन्य पाच ते सहा जणांविरुद्ध तक्रार दिली होती. त्यानंतर खासदार गवळी यांनी आपल्या समर्थकांकरवी मुळे यांच्याविरुद्ध अपहाराचे पाच खोटे गुन्हे महाराष्ट्रात विविध ठिकाणी दाखल केले. ज्यापैकी दोन गुन्हे न्यायालयाने रद्द केले आहेत.

हेही वाचा: MPSC: संयुक्त पूर्व परीक्षेची नवी तारीख जाहीर

याशिवाय मुळे यांच्या घरी गुंड येऊन धमक्या देऊ लागल्याने ते घर सोडून हॉटेलात राहू लागले होते, आपणास धोका असल्यामुळे आपणास पोलिस संरक्षण द्यावे अशी विनंती करूनही पोलिस संरक्षण न दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे. मात्र या प्रकरणी पोलिस तक्रार नोंदवून घेत नसल्याने मुळे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करत पोलिस संरक्षण द्यावे, तसेच खासदार गवळींविरोधात गुन्हा दाखल करावा अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. याचिकेवर दोन ऑगस्ट २०२१ रोजी सुनावणी झाली असता, खंडपीठाने तक्रार अर्जाच्या अनुषंगाने काय कारवाई केली असा प्रश्न उपस्थित केला असता, सरकारी वकिलांनी शपथपत्र सादर करण्यास वेळ मागून घेतला. दरम्यान, पोलिस आयुक्त आणि मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना शपथपत्राद्वारे ३० ऑगस्टपर्यंत लेखी उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याचिकेत ॲड. अमोल गांधी हे मुळे यांची बाजू मांडत आहेत.

loading image
go to top