राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा लागू झाली?

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा लागू झाली?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांसह सापडलेल्या गाडीपासून सुरु झालेलं प्रकरण आता सचिन वाझे, मनसूख हिरेन हत्या, परमबीर सिंग यांचा लेटरबॉम्ब, अनिल देशमुखांच्या वसुलीचा आरोप आणि राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी इथंपर्यंत येऊन पोहचलं आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं आणि रामदास आठवले यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. रामदास आठवले यांनी गुरुवारी यासाठी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपच्या दिग्गज नेत्यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेत राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी राज्यसभा आणि लोकसभेत भाजप खासदारांकडून करण्यात आली. लोकसभेत भाजपचे पुण्यातील खासदार गिरीश बापट, पूनम महाजन यांनी, तर राज्यसभेत प्रकाश जावडेकरांसह इतर भाजप खासदारांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली. तसंच, अपक्ष खासदार नवनीत राणा यांनीही भाजपच्या खासदारांना साथ दिली. राज्यातील विरोधीपक्ष भाजपनं सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर ठपका ठेवत राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. मात्र, राष्ट्रपती राजवटी नेमकी कधी लागते आणि राज्यात आतापर्यंत कितीवेळा राष्ट्रपती राजवट लागली आहे. याबाबत तुम्हाला माहित आहे का? तर जाणून घेऊयात त्याबाबतचं सर्वकाही....

राष्ट्रपती राजवट म्हणजे नेमकं काय?
राज्यातील शासकीय कारभार संविधानानुसार चालणे शक्य नसल्याचा अहवाल राज्यपालांनी राष्ट्रपतींना दिला किंवा राष्ट्रपतींची स्वत:ची तशी खात्री पटली, तरी राष्ट्रपती त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करु शकतात. कलम 356 नुसार, राज्यातील प्रशासन घटनात्मक पद्धतींने चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लागू केली जाण्याची शक्यता असते. कलम 365 नुसार, एखादे राज्य सरकार केंद्राच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करत असल्यासही त्या संबंधित राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करणे शक्य असते. सरकारला बहुमत नसेल, किंवा सरकारनं बहुमत गमावलं असेल, त्यावेळीही राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते.

राष्ट्रपती राजवटीत काय होतं?
राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत संसदेची मान्यता मिळवणे आवश्यक असते. संसदेच्या मंजूरीनंतर सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करता येते. संसदेने पुढील सहा महिन्यांसाठी मान्यता दिल्यास राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवता येऊ शकतो. संसदेची मान्यता मिळत असली, तरीही कोणत्याही राज्यात जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करणे शक्य असते. राष्ट्रपती राजवटीत न्यायालयीन वगळता राज्याची सर्व सत्ता राष्ट्रपतींच्या हाती असते. राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून राज्यपाल राज्याच्या मुख्य सचिवांच्या सहाय्याने शासन चालवतात. राष्ट्रपती राजवटीत काय होतं? राष्ट्रपती स्वतः आदेश देऊन राज्य सरकारच्या सेवेतील कोणत्याही अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास सांगू शकतात. लोकसभेची बैठक नसल्यास राज्याच्या संचित निधीतून पैसा खर्च करण्याचा आदेश राष्ट्रपती त्या कालावधीमध्ये देऊ शकतात. राष्ट्रपती राजवटीतही उच्च न्यायालयाचे अधिकार अबाधित असतात. संबंधित राज्याच्या विधानसभेचे विसर्जन करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो.

राज्यात याआधी कधी लागू झाली होती राष्ट्रपती राजवट?
महाराष्ट्रात पहिल्यांदा 1980 मध्ये तर दुसऱ्यांदा 2014 ला राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते. त्यांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) सरकार बरखास्त करण्यात आले होते. बरखास्तीनंतर विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. त्यावेळी महाराष्ट्रात 17 फेब्रुवारी 1980 ते 9 जून 1980 पर्यंत राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले होते. 

दुसऱ्यांदा 2014 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली तेव्हा काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी 32 दिवसांसाठी म्हणजे 28 सप्टेंबर 2014 ते 31 ऑक्टोबर 2014 या काळात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या निवडणुकांत भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच देवेंद्र फडणवीसांचे नवं सरकार सत्तेवर आलं. 2014 मध्ये निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानं ते सरकार अल्पमतात आलं. पृथ्वीराज चव्हाण यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यापालांच्या शिफारशीवरून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

तिसऱ्यांदा 2019 च्या विधानसभेच्या निवडणूकी नंतर कोणत्याही पक्षाने बहुमत सिद्ध न केल्यामुळे 12 नोव्हेंबर 2019 ते 23 नोव्हेंबर 2019 पर्यंत राष्ट्रपती राजवट लागू झालेली. 23 नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रपती राजवट संपुष्टात आली होती. मात्र, बहुमत सिद्ध न करु शकल्यामुळे हे सरकार अल्पकालावधीतच कोसळलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बहुमत सिद्ध करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com