महाराष्ट्रभर साजरा होणारा काय आहे 'सावित्री उत्सव'?

विनायक होगाडे
Sunday, 3 January 2021

आज महाराष्ट्रभरात ठिकठिकाणी 'सावित्री उत्सव' हा सण साजरा केला जातोय.

पुणे : आज सावित्रीबाई  फुले यांची जयंती. जिने घराचा उंबरठा ओलांडायला बाईला शिकवलं ती देशातील पहिली शिक्षिका... मुलींची पहिली शाळा काढली. त्यासाठी गृहत्यागही केला. नंतर शूद्रांसाठी, अस्पृश्यांसाठीही शाळा काढल्या. रात्रशाळा काढल्या. विधवांना पुनर्विवाहासाठी सहाय्य केलं. बालहत्त्या प्रतिबंधक गृह काढलं. इतकंच काय... विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संपही घडवून आणला. दुष्काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. दारु दुकान सुरु करण्यास विरोध केला. सत्यशोधक समाज स्थापण केला. आणि त्यामार्फत पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरवात केली. इतक्या साऱ्या कामाचा डोंगर उभा करणाऱ्या माय सावित्रीचा आज वाढदिवस... त्यानिमित्ताने आज महाराष्ट्रभरात 'सावित्री उत्सव' साजरा केला जातोय.

सावित्रीबाई फुले निखाऱ्यांवर चालल्या म्हणून आज आपल्याला वाट तरी दिसते आहे.. आता अंतर्बाह्य उजळल्याशिवाय जगण्याला दिशा नाही..नमन. #SavitriBaiPhuleJayanti #सावित्रीउत्सव

Posted by SonaliKulkarni on Saturday, 2 January 2021

महिला व बालविकास मंत्रालयाचा उपक्रम
गेल्या अनेक वर्षांपासून आजच्या दिवशी  महाराष्ट्रभरात ठिकठिकाणी सावित्री उत्सव साजरा करण्यात येतोय. आणि आता त्याला शासनाच्या पाठिंब्याचीही भक्कम साथ मिळाली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याच्या गौरवार्थ आणि भावी पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचा जन्मदिवस महिला व बालविकास विभागाच्यावतीने ‘सावित्री उत्सव’ म्हणून आज महाराष्ट्रभर साजरा करण्यात येत आहे. याबाबतची घोषणा महिला व बालविकास मंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केली होती. यानिमित्ताने राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

काय आहे संकल्पना?

यानुसारच, गेल्या अनेक वर्षांपासून साजरा होणारा हा उत्सव आज 3 जानेवारी रोजी महाराष्ट्रभरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. नवीन वर्षातला पहिला सण असं म्हणत निव्वळ महिला, मुलीचं नव्हे तर पुरुष-बापय देखील या सणात सहभागी होत आहेत. 'सावित्रीच्या लेकी घरोघरी, जोतिबांचा मात्र शोध जारी' असं म्हणत स्त्री-पुरुष समानतेचा पाया रचण्यासाठी हा सण साजरा केला जातोय. 

कसा केला जातो साजरा?
या दिवशी महाराष्ट्रातील अनेक घरासमोर  रांगोळी काढून, आकाशकंदील लावून, उंबऱ्यावर ज्ञानाची पणती लावून, दरवाज्याला फुलांचे तोरण बांधून, घरात खायला काहीतरी गोडधोड करुन  हा दिवस सणा सारखा साजरा करतात आणि जोडीला कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन "सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर" हा अखंड म्हणत तसेच सावित्रीबाई, फातिमाबी यांच्याबद्दलच्या कुठल्याही एका पुस्तकातील एक पान सामुहिकरित्या वाचून साजरा करतात. अनेक स्त्रिया सावित्री बाई जशी कपाळावर आडवी चिरी म्हणजे कुंकू लावायची तशी चिरी लावून ऑफिसला, शाळा कॉलेज मध्ये जात असतात. सेल्फी काढतात, त्याद्वारे सावित्रीबाईंप्रती आपुलकी व्यक्त करतात. सोशल मीडियावर स्त्रीपुरुष समानतेबाबत व्यक्त होऊन सावित्रीबाई आणि जोतिबा फुल्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतात. 

सेलिब्रिटींचाही सहभाग
अनेक सेलिब्रिटी आणि राजकारण्यांनीही या सावित्री उत्सवात सहभाग नोंदवला आहे. यामध्ये मालिकेत सावित्रीबाईंची भुमिका साकारणाऱ्या अश्विनी कासार, पूर्वा नीलिमा सुभाष, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, चिन्मयी सुमित, सोनाली कुलकर्णी, सुप्रिया सुळे अशा अनेक जण हा सण साजरा करत आहेत. 

काय आहे उद्देश?

याबाबत बोलताना राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्या इंद्रायणी पाटील यांनी म्हटलं की, आज सावित्रीच्या लेकी शिकल्या-सवरल्या असल्या, घरातून बाहेर पडल्या असल्या तरीही अजुनही काही लेकी मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडल्या नाहीयेत. महिला 'साक्षर' बनतायत पण 'सुशिक्षित' बनत नाहीयत. त्यांना खऱ्या अर्थाने सुशिक्षित बनवण्याचे काम यातून होईल.

विवेकवाहिनीच्या कार्यकर्त्या विभावरी नकाते यांनी म्हटलं की, आजही सावित्रीच्या लेकी कसल्या कसल्या व्रतात आणि उपासतापासातच गुरफटल्या आहेत. अगदी आजही फ्लॅट मध्ये राहणारी ती वडाची फांदी घेऊन येते. आणि घरात फेऱ्या मारते. आताच्या जगात सत्यवानाच्या 'त्या' सावित्रीपेक्षा 'सत्यशोधका'च्या ह्या सावित्रीच्या अनुकरणाची जास्त गरज आहे म्हणूनच हा सण पुरोगामी महाराष्ट्रात साजरा केला जातोय. 

हा नवा सण महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेची दिशा आणि वाट अधिक वृद्धिंगत करेल, यात शंका नाही. हा सण निव्वळ महिलांचा नाही, तर स्त्री-पुरुष समानतेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक स्त्रीपुरुषाचा आहे. सगळेच जण यात सहभागी होतायत. एकत्र येतात. सावित्री-जोतिबाच्या योगदानाची आठवण काढतात. त्यांच्या वसा आणि वारसा घेऊन त्यांची वाट चालण्याची सकारात्मकता एकमेकांना देतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: what is savitri utsav & why it is celebrated in maharashtra savitribai phule