esakal | व्हॉट्स अ‍ॅपची आयडिया;क्षणात मिळणार जवळच्या लसीकरण केंद्राची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

 Whats App

व्हॉट्स अ‍ॅपची आयडिया;क्षणात मिळणार जवळच्या लसीकरण केंद्राची माहिती

sakal_logo
By
शर्वरी जोशी

देशात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून या लाटेत असंख्य जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. एकीकडे दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. तर, दुसरीकडे या विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. त्यातच १ मे पासून १८ वर्षांवरील तरुणांनादेखील लसीकरण उपलब्ध झालं आहे. त्यामुळे, मोठ्या संख्येने सध्या तरुण त्यांच्या जवळील लसीकरण केंद्रांचा शोध घेत आहे. यामध्येच, MyGo कोरोना हेल्पडेस्कच्या माध्यमातून आता घर बसल्या व्हॉटस् अ‍ॅपवर आपल्याला जवळील लसीकरण केंद्राची माहिती मिळणार आहे.

MyGovIndia ने त्यांच्या ट्विटर हॅंडलवर एक पोस्ट शेअर करत सविस्तर माहिती दिली आहे. आपल्या घराजवळील लसीकरण केंद्राची माहिती हवी असल्यास युजर्सला 9013151515 या क्रमांकावर 'नमस्ते' हा इतकाच मेसेज पाठवावा लागणार आहे. त्यानंतर तुमच्या चॅटबॉक्समध्ये काही क्षणातच कोविड लसीकरण केंद्र व लसीकरणाविषयी सविस्तर माहिती मिळेल. तसंच नमस्ते मेसेज करण्यासोबतच तुम्हाला तुमचा पिनकोडदेखील टाकावा लागेल. विशेष म्हणजे हा हेल्प डेस्क हिंदी व इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. MyGovIndia ने केलेल्या पोस्टमध्ये याविषयी सविस्तर माहिती व पद्धत देण्यात आली आहे.

भारत सरकारने कोरोना विषाणूसंदर्भातील माहिती उपलब्ध होण्यासाठी २०२० मध्ये चॅटबॉटची सुरुवात केली आहे. या हेल्पडेस्कच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीस कोरोना लसीकरण, कोविड सेंटर वा कोरोनाशी संबंधित प्रत्येक माहिती सहज उपलब्ध होते.

दरम्यान, चॅटबॉटसोबतच आरोग्य सेतू अ‍ॅप, कोविड सर्व्हिस पोर्टल किंवा उमंग अ‍ॅप या अ‍ॅपच्या माध्यमातूनही लसीकरणासाठी नोंदी करु शकता.

loading image