दहावी-बारावीच्या परीक्षा कधी होणार? वर्षा गायकवाड यांनी दिले उत्तर

तेजस वाघमारे
Sunday, 3 January 2021

राज्यातील बारावी आणि दहावी बोर्डाच्या परिक्षा कधी होतील याबाबत विद्यार्थ्यी आणि पालकांमध्ये उत्सुकता आहे

मुंबई, : सीबीएसई मंडळाने दहावी बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यानंतर राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी दहावीची परीक्षा 1 मे रोजी आणि बारावीची परीक्षा 15 एप्रिलनंतर घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली.

कोरोनामुळे यंदा शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन क्लासेस सुरू करण्यात आले आहेत. तर मुंबई आणि परिसर वगळता राज्यातील इतर भागात नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्या तरी विद्यार्थी आणि पालकांचे परीक्षा कधी होणार याकडे लक्ष लागले होते. शिक्षक संघटनांकडूनही परीक्षांबाबत निर्णय घेण्याची मागणी होत होती. अखेर शिक्षण मंत्र्यांनी या प्रश्नांवर पडदा टाकला आहे. दहावीची परीक्षा 1 मे रोजी आणि बारावीची परीक्षा 15 एप्रिलनंतर घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती शिक्षण मंत्र्यांनी दिली.

त्याचप्रमाणे पाचवी ते आठवी पर्यंत शाळा सुरू करण्यासंदर्भात आणखी थोडे दिवसांची वाट बघून याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती घेऊनच शाळा सुरू करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. मुंबई-पुणे व्यतिरिक्त अनेक भागांमध्ये शाळा सुरू झाल्या असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

When will the 10th-12th exams be held Varsha Gaikwads reaction

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When will the 10th-12th exams be held Varsha Gaikwads reaction