

Solapur city Police on Crime
सोलापूर : सोलापूर शहराच्या शांतता, सुरक्षेसाठी सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दिवस-रात्र गस्त, नाकाबंदी, गुडमॉर्निंग पथकांद्वारे गस्त सुरू असल्याचा दावा वरिष्ठ अधिकारी करतात. मात्र, दिवस असो की रात्र, चोरी-घरफोड्या थांबलेल्या नाहीत. मागील पाच महिन्यांत भररस्त्यात हाणामारी, खून, खुनाचा प्रयत्न, एटीएम मशीन चोरी, घरफोडी, सराफाला लुटणे, अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
गुन्हा घडल्यानंतर आरोपी कधी ना कधी सापडतोच, पोलिस त्याला शोधून काढतात. मात्र, गुन्हे रोखण्यासाठी ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. पोलिस ठाण्यांची पथके, गुन्हे प्रकटीकरण पथक, शहर गुन्हे शाखेसह अन्य विभाग कार्यरत असतानाही मागील पाच-साडेपाच महिन्यांत पोलिसांना गुन्हे रोखण्यात अपेक्षित यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. परगावी गेलेल्या लोकांना आपल्या घरात कोणी चोरी तर करणार नाही ना, याची धास्ती राहते. कारण, बंद घरांमध्ये चोरी, घरफोडी ही बाब नेहमीचच बनली आहे.
ठळक घटना...
२ जानेवारी : महापालिका निवडणुकीवेळी आपण बिनविरोध निवडून यावे म्हणून ११ जणांनी मिळून बाळासाहेब सरवदे यांचा खून केला. संशयितांना पोलिसांनी काही तासांत जेरबंद केले, पण दिवसा झालेल्या खुनामुळे परिसरात काही दिवस घबराट होती.
३ मे : सोलापूर शहरातील ७० फूट रोडवरून घरी निघालेल्या सुरेश कृष्णा श्रीराम या तरुणाचा सहा जणांनी भररस्त्यात खून केला. या रस्त्यावर वर्दळ असताना सकाळी नऊच्या सुमारास हा खून झाला होता.
१६ मे : मध्यरात्री दोनच्या सुमारास शहरात शिरलेल्या चोरट्यांनी विडी घरकुल परिसरातील ‘एसबीआय’ बँकेचे एटीएम मशीनच गाडीत घालून चोरून नेले. दोर लावून मशीन ओढून बाहेर काढली आणि गाडीत घालून नेली. पोलिसांना अजूनही या गुन्ह्यातील चोरटे सापडलेले नाहीत.
६ जून : अशोक चौक परिसरातील चिप्पा मार्केट ते पतंजली स्टोअर या रस्त्याने घरी जात असताना रात्री दहाच्या सुमारास सात जणांनी मिळून यासीन इक्बाल बागवान या तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न केला. डोळ्यात चटणी टाकून त्याच्यावर वार करण्यात आले होते.
१० जून : हैदराबादहून साताऱ्याकडे जाणारे कृष्णप्रसाद व्ही हे वृद्ध इसम मध्यरात्री दोनच्या सुमारास सोलापूरच्या एसटी स्थानकावर लघुशंकेसाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा पाठलाग करून तिघांनी २,७०० रुपयांसाठी त्यांचा खून केला.
१३ जून : दुपारी साडेबाराच्या सुमारास ७० फूट रोडवरील शिवकुमार ज्वेलर्स दुकानात शिरून दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून पाच लाखांचे लुटून नेले. विशेष म्हणजे चोरलेल्या दुचाकीवरून ट्रिपल सीट चोरटे सोलापुरात आले होते, दागिने लुटून ते सहजपणे शहराबाहेर पसार झाले.
शहर पोलिसांचा ‘तो’ आदेश पायदळी
शहर पोलिसांनी सार्वजनिक शांतता बिघडविणे, मानवी जीवितास धोका निर्माण होणे व मालमत्तेची हानी होऊ नये, तसेच कोणत्याही प्रकारची दंगल रोखण्यासाठी पाच किंवा अधिक व्यक्तींच्या हालचाली व बेकायदा एकत्र येण्यावर प्रतिबंध घातले आहेत. दुसरीकडे, शारीरिक इजा किंवा हानी पोहोचवू शकतील अशा वस्तू अथवा शस्त्रे विनापरवाना जवळ बाळगण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम ३७ (१) व (२) नुसार हे निर्बंध लागू केले आहेत. मात्र, शहर पोलिसांकडील नोंदीनुसार या आदेशाचे पालन होत नसल्याचे दिसते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.