
स्वराज्याचं वैभव असलेल्या दुर्गदुर्गेश्वर रायगडाला उद्ध्वस्त कुणी केलं?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादेत सभा घेतली आणि बऱ्याच मुद्द्यांना हात घातला होता. त्यामध्ये त्यांनी टिळकांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महारांजांची समाधी बांधली असं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन आता आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. टिळकांनी शिवाजी महाराजांची समाधी बांधण्यासाठी निधी गोळा केला पण समाधी बांधलीच नाही असे आरोप होऊ लागलेत. त्यावर टिळकांच्या वंशजांनी स्पष्टीकरण देत टिळकांनी शिवाजी महाराजांची समाधी बांधली असा आमचा दावा नाही असं सांगितलंय. पण ज्या रायगडावर स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांची समाधी आहे तो रायगड स्वराज्यातून इंग्रजाकडे कसा गेला, त्याला कुणी आणि कसं उध्वस्त केलं आपल्याला माहितीये का?
स्वराज्याची राजधानी असलेला रायगड हा अभेद्य किल्ला. स्वराज्याचा कारभार इथूनंच चालायचा. महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे सूत्र पेशव्यांच्या हाती गेले आणि मराठ्यांनी स्वराज्याच्या सीमा अटकेपार नेल्या. त्यानंतर मध्यंतरी काही कारणांमुळे मराठा साम्राज्य लयाला गेलं. इंग्रजांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे स्वराज्यावर इंग्रजांनी युनियन जॅक फडकवला होता. दुसरा बाजीराव पेशव्याकडे तेव्हा स्वराज्याची सूत्रे होती.

Shivaji maharaj
१८१५ पासून इंग्रजांचं वर्चस्व वाढू लागलं होतं. त्यानंतर इंग्रजांनी हळूहळू आपले पाय पसरायला सुरूवात केली आणि स्वराज्यातील किल्ल्याकडे लक्ष वेधले. स्वराज्यातील किल्ले म्हणजे बघताच शत्रूला घाम फोडणारे सह्याद्रीचे कडे आणि स्वराज्याच्या अस्मिता. किल्ले काबीज करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हतीच मुळात पण इंग्रजांनी आपले पाय एवढे पसरवले होते की, बरेच किल्ले इंग्रजांना काहीच न करता मिळाले होते.
रायगड जिंकण्यासाठी आलेल्या इंग्रजांना ही गोष्ट अशक्य वाटतंच होती पण गनिमी कावा करून निर्माण केलेल्या स्वराज्याच्या राजधानीला एकाने फितुरी केली आणि रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला होता. तो फितुर म्हणजे 'पोटल्याचा डोंगर'. त्या रायगडावर झालेल्या हल्ल्याच्या खुणा आजही स्वराज्याची आणि शिवरायांच्या पराक्रमाची आठवण करुन देतात.

British
सन १८१८. तीन वर्षे अगोदरपासूनच रायगडाचा अंत जवळ आल्याचं स्पष्ट जाणवत होतं. मराठ्यांच्या शेवटच्या पेशव्यावरसुद्धा इंग्रजांनी ताबा मिळवला होता. इंग्रजांचा एक अधिकारी कर्नल प्रॉथर याने १८१८ मध्ये कोकणातील किल्ले घेण्याचा निर्धार केला होता. त्यावेळी रायगडावर एक हजार सैन्यांची शिबंदी होती त्यामध्ये अरबी सैन्यांचा भरणा असल्याचा उल्लेख आढळतो. इंग्रजांची एक फौज रायगड घेण्यासाठी महाडकडे निघाली त्या पलटणीवर मेजर हॉल होता. तो २४ एप्रिल १८१८ मध्ये रायगडाच्या पायथ्याला असलेल्या पाचाडजवळ पोहोचला तेव्हा पाचाडला ३०० मराठा सैनिक होते. हॉलने त्या सैन्यावर हल्ला केला, त्या हल्ल्यात २० मराठा सैनिक धारातीर्थी पडले आणि हॉलने पाचाडवर कब्जा केला.
त्याच दिवशी प्रॉथरचे सैन्य महाडला येऊन पोहोचले आणि त्याने महाडवर ताबा मिळवला. त्यानंतर दोन्ही सैन्य एकत्र आले आणि त्यांनी रायगडाला वेढा घातला. पण रायगडाला जिंकण्यासाठी हॉलकडे पुरेसी फौज नसल्याचं त्याला वाटू लागलं आणि इंग्रजांनी अजून एक फौज त्याच्या मदतीसाठी पाठवून दिली. ती फौज ४ मे ला रायगडाच्या पायथ्याला येऊन पोहोचली. पण तोपर्यंत हॉलने खूबलढ्यासमोरच्या मोर्च्यावरुन हल्ला चढवला होता आणि मराठ्यांचे काही मोर्चे उध्वस्त केले होते.

Chhatrapati Shivaji Maharaj
इंग्रजांच्या सैन्याने रायगडाच्या रक्षणार्थ प्रतापगडाहून येणारी मदत थोपवून धरली. पण रायगड सहजासहजी जिंकण इंग्रजांना अवघड वाटू लागलं. त्याला काय करावं समजत नव्हतं. तेवढ्यात त्याचं लक्ष रायगडाच्या समोरंच असलेल्या पोटल्याच्या डोंगरावर गेलं आणि बघता बघता डोंगरावर तोफा चढू लागल्या. पोटल्याचा डोंगरही तसा अवघड पण त्याजागीही इंग्रजांनी चोफा चढवल्या. अभेद्य रायगडावर कब्जा करण्यासाठी पोटल्याच्या डोंगराने फितुरीच केली होती जणू. त्यावेळी रायगडावर बाजीरावाच्या पत्नी वाराणशीबाई होत्या. इंग्रजांनी पोटल्याच्या डोंगरावर तोफा चढवल्यावर वाराणशीबाईंना रायगड सोडण्याचा इशारा दिला. पण त्यांनी रायगड सोडण्यास साफ नकार दिला.

British Attack on Raigad
पोटल्याच्या डोंगरावरुन रायगडावर हल्ला करणं इंग्रजांना सोपं झालं होतं, त्यातून वाराणशीबाईंनी गड सोडण्यास नकार दिला आणि रायगडावर इंग्रजांच्या तोफांचा मारा सुरू झाला. बघता बघता रायगडाचा एक एक बुरूज निखळला जाऊ लागला. मराठ्यांकडून प्रतिकार सुरूच होता. पण इंग्रजांच्या तोफेपुढे मराठ्यांची तटपुंजी युद्धसामग्री तग धरु शकली नाही आणि रायगड धुपत राहिला. स्वराज्याचा लेखाजोखा असलेला दफ्तरखाना जळून खाक झाला होता. ४ मे १८१८ ला सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास इंग्रजांच्या तोफेतून एक गोळा सुटला आणि वाराणशीबाईंचा वाड्याने पेट घेतला. मराठ्यांच्या आणि स्वराज्याच्या पाऊलखुणा हळूहळू मराठ्यांच्याच डोळ्यासमोर धगधगत जळत होत्या.
स्वराज्याचा लेखाजोखा असलेला दफ्तरखाना जळून खाक झाला होता. मराठ्यांना शरणागती पत्कारण्याशिवाय पर्याय नव्हता. मराठ्यांनी वाटाघाटी सुरू केली. तरीही इंग्रजांनी रायगडावरील मारा कमी केला नाही. तीन दिवसांच्या वाटाघाटीनंतर तोफांचा मारा थांबवला गेला. तोपर्यंत रायगडाच्या आणि स्वराज्याचे अवशेष उध्वस्त झाले होते. गडावरील एक घर आणि धान्याचे कोठार तेवढे शिल्लक राहिले बाकी सगळा गड धुपत धुपत जळत होता. फक्त भग्न इमारतींचे अवशेष रायगडावर शिल्लक राहिले होते.

Attack
१० मे १८१८ ला कर्नल प्रॉथर रायगडावर आला. त्याच्या समोरचं मराठा साम्राज्याचे शिलेदार आणि रायगडाशी इमान राखलेल्या मावळ्यांना खाली माना घालून गड सोडावा लागला. त्यानंतर रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि दुसऱ्या बाजीरावांच्या पत्नी वाराणशीबाई तहाच्या अटीनुसार पुण्याला रवाना झाल्या पण स्वराज्याचं वैभव आपल्या हातातून इंग्रजांनी हिसकावून घेतलं होतं.
Web Title: Who Destroyed Shivaji Maharaj Swarajya Capital Raigad Fort
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..