कोण म्हणतंय ग्राहकांनी अफवांवर विश्‍वास ठेऊ नये 

संतोष सिरसट 
Thursday, 25 June 2020

महावितरणच्या कार्यालयातील गर्दी टाळावी 
लॉकडाऊन शिथिल झाला असला तरी करोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम आहेच. त्यामुळे महावितरणच्या कार्यालयातील गर्दी टाळावी आणि सुरक्षित रहावे व कोणत्याही अफवांवर किंवा चुकीच्या माहितीवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

सोलापूर ः लॉकडाऊनच्या कालावधीत वीज ग्राहकांकडील मीटर रिडींग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीजबिल देण्यात आले. सध्या मीटर रिडींग घेऊन जून महिन्याचे वीजबिल देण्यात येत आहे. मात्र, या वीजबिलांबाबत सोशल मिडीयावरून चुकीचे मॅसेज पाठवून ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे अशा अफवांवर ग्राहकांनी विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

ग्राहकांनी आपल्या वीज वापराची पडताळणी केली तर त्यांना आपले वीजबिल योग्य व अचूक असल्याचे लक्षात येईल. अनेक ग्राहकांनी स्वतःचे वीजबिल तपासून न बघता केवळ वीजबिलांची रक्कम जास्त दिसते म्हणून आलेले बिल चुकीचे आहे, असा समज करून घेतला आहे. मागील वर्षाच्या उन्हाळ्याचा वीजवापर आणि चालू वर्षातील लॉकडॉऊनमध्ये 24 तास घरात राहून केलेला वीजवापर यांची तुलना केली तर असे दिसून येईल की या वर्षातील एप्रिल, मे व जून महिन्यातील वीजवापर हा मागील वर्षाच्या वीजवापराच्या तुलनेत बरोबर आहे. महावितरण ही खासगी कंपनी नसून सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय वीज कंपनी आहे. त्यामुळे वीजबिलात कुठलीही आकारणी छुप्या स्वरूपात करीत नाही. आकारणी करताना मनमानी करीत नाही. वीज नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या दरानुसारच ग्राहकांना वीजबिल आकारले जाते. ग्राहकांच्या वीजबिलांवर सर्व माहिती छापील स्वरूपात दिली आहे. ग्राहकांनी वीजबिल संपूर्ण वाचले तर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेला मॅसेज केवळ ग्राहकांची दिशाभूल करून ग्राहकांमध्ये रोष पसरविण्यासाठी तयार केलेला आहे असे स्पष्टपणे दिसून येत आहे. 
कोरोनाचा प्रादुर्भाव अजून संपलेला नाही. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. महावितरण कार्यालयात देखील काही ठिकाणी कोरोना बाधित आढळले आहेत. ही संख्या अधिक वाढल्यास ग्राहक सेवेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. नुकतेच निसर्ग चक्रीवादळाचे संकट येऊन गेले. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील बऱ्याच भागातील वीजपुरवठा खंडित झालेला आहे. तेथील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी संपूर्ण राज्यातून अभियंते व तांत्रिक कर्मचारी वर्ग पाठविलेला आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कंपनी सर्वप्रथम वीजपुरवठा सुस्थितीत रहावा यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी घरी बसूनच https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर जाऊन आपले बिल तपासून घ्यावे. काही चूक किंवा शंका आढळली तरच महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who says consumers should not believe rumors