narendra dabholkar
narendra dabholkaresakal

कोण होते डॉ. नरेंद्र दाभोलकर? त्यांना 'पृथ्वीमोलाचा माणूस' असं का म्हटलं गेलं?

डॉ. नरेंद्र दाभोलकर कोण होते आणि त्यांनी काय काय केलं, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

विवेकवादी आणि समताधिष्टित समाजनिर्मितीसाठी झटणारे डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची आज १० वा स्मृतीदिन! त्यांचा उभा आयुष्यपट हा अपार करुणेचा, अविरत संघर्षाचा आणि अज्ञानाच्या महासागरातला ज्वलंत दीपस्तंभ आहे. डॉ. दाभोलकर आज आपल्यात नाहीत ही मनाला सलत असलेली बोचणी सतत असताना त्यांनी समजाजीवनात केलेले अफाट कर्तुत्व पाहुन आजही चाट पडायला होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर कोण होते आणि त्यांनी काय काय केलं, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

narendra dabholkar
आर्यन 'मन्नत'वर आल्यानंतर शाहरुख-गौरीने घेतला एक महत्त्वाचा निर्णय

सामाजिक चळवळीत सहभाग

दाभोलकरांचे ज्येष्ठ बंधू डॉ. देवदत्त दाभोलकर यांची प्रेरणा घेऊन 1971 साली समाजवादी युवक दलाच्या स्थापनेपासून खऱ्या अर्थाने नरेंद्र दाभोलकर सामाजिक जीवनात कार्यप्रवण झाले. महाराष्ट्र अंनिस च्या स्थापनेपूर्वी बाबा आढाव यांच्या सोबत 'एक गाव, एक पाणवठा' मोहीम असो, मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ असो वा सामाजिक कृतज्ञता निधीसाठी चालवलेली मोहीम असो,या सगळ्यातच त्यांची आघाडी होती. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विषयाला त्यांनी हात घातला तो बी. प्रेमानंद यांच्यासोबत 1982 साली निघालेल्या लोकविज्ञान मोहिमेतून..!

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची अशी झाली सुरुवात

1987 साली त्यांनी शाम मानव यांच्यासोबत अखिल भारतीय अंनिसच्या कामास सुरुवात केली आणि नंतर 1989 साली वेगळे होऊन त्यांनी मुठभर कार्यकर्त्यांच्या समवेत 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती'ची स्थापना केली. आणि इथून खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या त्यांच्या सामाजिक संघर्षाला सुरुवात झाली. मअंनिसच्या संघटनात्मक वाटचालित अनेक सामाजिक विषयांना टक्कर देताना त्यांच्या पुढाकाराने अनेक मोहिमा राबवल्या गेल्या.

1992 साली मुंबईत 'स्त्रीया आणि अंधश्रद्धा निर्मूलन' परिषद व 'शोध भुताचा,बोध मनाचा' या विषयावरील भव्य यात्रा, 1997 साली 'भानामती प्रबोधन धडक मोहीम', 2003 साली नाशिकच्या सिहंस्थ मेळाव्याला विरोध व इचलकरंजीतील बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद, 2009 साली 'राज्यव्यापी खगोलयात्रा', 2012 साली विवेकवाहीनीतर्फे 'राज्य युवा संकल्प परिषद' आणि अखेरच्या काळातील 2013 मधील 'जातपंचायत विरोधी परिषद' या त्यांच्या काही भव्य आणि समाजात विधायक हस्तक्षेप नोंदवणाऱ्या मोहिमा होत्या.

narendra dabholkar
2020च्या कोरोना काळात दररोज 31 मुलांची आत्महत्या; NCRBचा धक्कादायक अहवाल

बुवाबीजाविरोधातला संघर्ष

डॉ. दाभोलकर असं म्हणायचे की," चमत्कारावर विश्वास ठेवणे आणि ते करणाऱ्या बाबा-बुवाला मान्यता देणे,यातील मुख्य तोटा हा की,अशी माणसे प्रयत्न आणि पुरुषार्थ यावरचा स्वतःचा विश्वास गमावतात,आणि इतरांनीही तो गमवावा असे वातावरण तयार करतात..!" आणि म्हणून या बुवाबाजीच्या जोखडात होरपळून निघालेल्या शोषितांना न्याय आणि श्रद्धेचा बाजार मांडणार्या कुप्रवृत्तीला कायद्याचा धाक बसावा,म्हणून जादूटोना विरोधी कायद्या होण्यासाठीची लढाईही ते नेटाने आणि अविरत लढत होते.

1995 पासून सुरु झालेल्या या कायद्याचा प्रवास विरोधकांच्या खोडकर प्रचाराच्या आणि नाहक विरोधाच्या गर्तेतून मार्ग काढत अखेर 2013 ला दाभोलकरांच्या खूनानंतरच संपला. अखंड 18 वर्ष डॉ.दाभोलकर या विधेयकासाठी आपल्या रक्ताचे पाणी करत होते. पण जणूकाही डॉ. दाभोलकरच एक खमका कायदा म्हणून आता परिवर्तित झाले आहेत. दाभोलकरांनी सर्वच धर्मातील असंख्य भोंदू बुवाबाबांची दुकानदारी बंद पाडली.

नरेंद्र महाराज सारख्या अनेक बुवाशी ते आमने सामने भीडले. चमत्काराचा, अलौकिक शक्ती असल्याचा, भूत दाखवण्याच्या दावा करणाऱ्या बुवांचे त्यांनी सप्रमाण पुराव्यानिशी नामोहरण केले. "चमत्कार करुण दाखवा,आणि 21 लाख मिळवा" हे मअंनिसचे आव्हान आजतागायत कुणीच पेलू शकले नाहीये आणि म्हणूनच गेल्या 30 वर्षात महाराष्ट्रात चमत्काराचा उघड दावा करणारे भोंदू बाबा आता दिसतच नाही.

अंधश्रद्धा निर्मूलनापुरतं मर्यादीत ध्येय नाही

डॉ. दाभोलकर फक्त अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामापुरते मर्यादित नव्हते. त्यांची दृष्टी त्या पलिकडील होती. अंधश्रद्धा निर्मूलनापासून सुरु झालेला संग्राम त्यांना "अंधश्रद्धा निर्मूलन ते वैज्ञानिक दृष्टिकोण, वैज्ञानिक दृष्टिकोण ते धर्मचिकित्सा, धर्मचिकित्सा ते धर्मनिरपेक्षता आणि धर्मनिरपेक्षता ते विवेकवादी समाजनिर्मिती" या मार्गाने पुढे न्यायचा होता.

अर्थातच, ते प्रामाणिकपणे हेही कबूल करायचे की, "मी ज्या कार्यक्षेत्रात आहे तेथे कामाचा विचार दशकांच्या नव्हे तर शतकांच्या कालावधीत करावयास हवा, याची मला जाणीव आहे." पण त्यांच्या लिखाणामधुन त्यांच्या अफाट वैचारिक द्रष्टेपणाची जाण आपल्याला आल्याशिवाय राहत नाही.

'प्रत्येक गोष्टीमागे कार्यकारणभाव असतो आणि तो वैज्ञानिक दृष्टिकोनाने तपासता येतो' ही मानसिकताच मुळात भारतीय समाजात अजुन तितकीशी रुजलेली नाहीये. मुळात जे काम फार पूर्वी व्हायला हवं होतं त्यासाठी म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोणाच्या प्रचार,प्रसारासाठी डॉ. दाभोलकरांना आपलं उभं आयुष्य वेचावं लागलं.अर्थातच हेही काम तितकं सोपं नव्हतं आणि नाहीये.

डॉ. दाभोलकरांच्या म्हणण्याप्रमाणे "धर्म आणि राजकारण यांच्या एकत्र करण्याच्या घातक कृतीला हिंसेची जोड देण्याचा प्रयत्न झाला, तर लोकशाही पण संपुष्टात येते!" आणि म्हणूनच, देशात एका बाजूला सारासार विवेक गहाण ठेऊन कट्टर धर्मांध शक्तीच्या धर्माधिष्टित राष्ट्राच्या संविधानद्रोही कारवाया वाढत चाललेल्या असताना दुसऱ्या बाजूला याविरोधात धर्मनिरपेक्ष, लोकशाही, विवेकवादी देशाच्या उभारणी साठी तयार राहण्याची सुपिक जमीनीची मशागत डॉ.दाभोलकर आपल्या कामातून करत होते.

narendra dabholkar
'ये कौन हैं भाई', नवाब मलिकांनी टि्वट केलेला फोटो कोणाचा?

कबड्डीपटू दाभोलकर

डॉ. दाभोलकर लढाऊ नेते होते. कुशल संघटक होते. विचारवंत होते. द्रष्टे लेखक होते. उत्कृष्ट वक्ते होते! 'क्रोधापेक्षा करुणा आणि उपहासापेक्षा आपुलकी' हाच त्यांच्या संपुर्ण कार्याचा मुलमंत्र होता. 1998 पासून सलग 16 वर्षे ते साने गुरुजींच्या 'साधना' साप्ताहिकाचे संपादक होते.या काळात त्यांनी साधनेला जे वैभव प्राप्त करुण दिले ते वाखानण्याजोगे आहे.

एवढेच काय... डॉ.दाभोलकर यापलीकडे जाऊन उत्कृष्ट कबड्डीपटू होते. त्यांचा खेळ कौशल्यपूर्ण आणि चपळ असा होता. त्यांनी महाविद्यालयीन जीवनात आंतरराष्ट्रीय पातळीवर कबड्डीमध्ये भारताचे नेतृत्व केले होते. 'हनुमान उडी' ही केवळ दाभोलकरांच्यामुळेच कबड्डीमध्ये लोकप्रिय झाली.

व्यसनमुक्तीसाठी झटणारे दाभोलकर

व्यसन मानवाचा मूल्यविवेक नष्ट करतो म्हणून दाभोलकरांनी साताऱ्यात 1989 साली 'परिवर्तन' या व्यसनमुक्ती संस्थेचीही स्थापना केली. आजही ही संस्था समाजात व्यसनमुक्तीचे 'परिवर्तन' घडवून आणत आहे. दाभोलकरांकडे माणूस पारखण्याची कला उपजत होती.आणि 'माणूस बदलतो' या उक्तीवर त्यांची श्रद्धा होती.

"अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही महाराष्ट्रातील संतसमाजसुधारकांचा वारसा कृतीशील करण्यासाठी समाजाच्या सद्सद्विवेकबुद्धीला घातलेली साद आहे, असं दाभोलकर म्हणायचे आणि म्हणूनच,डॉ.दाभोलकरांनी निळू फुले, श्रीराम लागू, सदाशिव अमरापुरकर यांच्यापासून ते उमेश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी या चित्रपटसृष्टितील अनेक कलाकारांना आपल्या चळवळीत सामिल करुण घेतले.

डॉ.दाभोलकरांचा ज्या उद्देशांनी सनातनी प्रवृत्तीनी निर्घृण खून केला त्यातला एकही उद्देश पूर्ण झाला नाही. जगाचा इतिहास हेच सांगतो की मुळात 'व्यक्ती मारून विचार संपतो' ही अंधश्रद्धा जोपासणार्यांनी आजवर विचारांची लढाई विचारांनी न लढता नेहमीच अशा भेकड मार्गाचा अवलंब केला आहे. ब्रूनो,सॉक्रेटीस पासून ते मार्टिन ल्यूथर किंग,म.गांधी आणि त्यानंतर दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी या सर्वांनाच हिंसेने संपवले गेले.

संतपरंपरेतील अनेक संत आणि समाजसुधारकांनाही अशा अतोनात छ्ळाला सामोरे जावे लागले. मुळात या विवेकसूर्यांनी कधीच कोणाला आपला शत्रू मानला नाही. तरीही यांचा खून झाला पण विवेकाच्या वाटेवरून चालणारे लोक हबकले नाहीत. घाबरले नाहीत. ते नेहमीच विवेकाचे वाटसरू राहिले. दाभोलकर या वाटेवरचा एक दीपस्तंभ नक्कीच आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com