
सोलापूर : कुटुंबातील सगळेजण शेतमजुरी करून उदरनिर्वाह भागवतात. मुलगा शिकून मोठा अधिकारी होईल आणि आपल्या डोक्यावरील कष्टाचे ओझे कमी होईल, या आशेतून रेवणसिध्द यांनी मुलगा मल्लिनाथ याला शिकवले. रात्रंदिवस जिद्द व चिकाटीने अभ्यास करत मल्लिनाथने ‘एमए-बीएड’पर्यंत शिक्षण पूर्ण केले. पण, शिक्षकाची नोकरी मिळाली नसल्याने तो कोतवाल बनला. सर्वकाही सुरळीत चालू असतानाच मंगळवारी (ता. २०) तो २५ हजार रुपयांच्या लाच प्रकरणात मंडलाधिकाऱ्यासोबत पकडला गेला. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांसह कुटुंबातील सर्वांचेच स्वप्न क्षणार्धात धुळीला मिळाले.
नोकरीपूर्वी पोटाला चिमटा घेऊन अधिकारी होण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करतात. लाखो रुपयांच्या पगारीची नोकरी मिळाली, तरीपण वाईट (लाच) मार्गाने पैसा कमवतात, अशी वस्तुस्थिती आहे. आपल्यावरील कारवाईनंतर मुलाबाळांकडे समाज कोणत्या नजरेने पाहील, याचा देखील विचार ते लोक करीत नाहीत, हे विशेष
महसूल व पोलिस लाच घेण्यात अव्वल
‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ अशा घोषणा अनेकदा झाल्या, पण मागील आठ-दहा वर्षांपासून लाच घेण्याचे प्रमाण वाढतच असल्याची स्थिती आहे. महसूल व पोलिस हे विभाग नेहमीच अव्वल राहिले आहेत. पण, अवैधरित्या कमावलेला पैसा आयुष्यात कधीच उपयोगी पडत नाही. उलट त्यातून वाईट नाद लागतात आणि स्वत:ची बदनामी अन् बरबादी होतेच. दुसरीकडे सगळे सहजपणे मिळाल्याने आणि वडिलांनी कमवून ठेवल्याच्या अविर्भावात मुलेही व्यसनाच्या आहारी जातात, ही वस्तुस्थिती आहे. अनेक कुटुंबाची वाताहात त्यामुळे झाली आहे. त्यामुळे मिळतो तेवढ्या पगारात समाधान मानून नोकरी करणे हाच उत्तम पर्याय आहे. जेणेकरून मुलांवरही तसेच संस्कार होतील.
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे...
संत तुकाराम म्हणतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ।। उत्तमची गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ।। म्हणजेच चांगला, पारदर्शक व्यवहारातून प्रामाणिकपणे धन (पैसा) कमवावा. तो खर्च करतानाही सत्कर्माचा अवलंब करावा. जेणेकरून त्यांची प्रगती वाढेल आणि त्याचे जीवन सुखी, समाधानी होईल. दुसरीकडे संत तुकाराम महाराज सांगतात, धन मेळवूनी कोटी । सवें न ये रे लंगोटी ।। आयुष्यात कितीती पैसा कमावला, तरी आयुष्याच्या शेवटी जाताना लंगोटी सुध्दा सोबत येत नाही. पद्मपुराणात अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात. अलक्ष्मी घरात येऊ नये, म्हणून दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा आहे.
साडेतीन वर्षांतील आकडेवारी
सन एकूण प्रकरणे पोलिस महसूल
२०१९ ८९१ १६३ २०७
२०२० ६६३ १५४ १५६
२०२१ ७७३ १७३ १७८
२०२२ ५३६ १२० १२९
एकूण २,७६३ ६१० ६७०
लाच प्रकार वाढल्याची कारणे...
भौतिक सुखाच्या अपेक्षा आणि असंतुष्टपणा वाढला
वरिष्ठ अधिकारी पण लाचखोर असल्याने किंवा त्याचे दुर्लक्ष असल्याने वाढले प्रकार
महसूल, पोलिस, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिकेत लोकांचा वैयक्तिक कामासाठी वावर जास्त
आपल्याशिवाय लोकांना दुसरा पर्यायच नसल्याची लाचखोरांचा समज
कामे लवकर होत नाहीत, अडचणींमुळे लोक देतात लाच
नागरिकांनी ‘इथे’ करावी तक्रार
लाच घेणे जसा गुन्हा आहे, तसाच लाच देणे पण गुन्हाच आहे. त्यामुळे नियमानुसार होणारे काम कोणी जाणीवपूर्वक अडवल्यास त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटा. तिथेही न्याय न मिळाल्यास त्यावर जाता येते. लोकशाहीत अनेक मार्ग उपलब्ध आहेत. शेवटी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात थेट तक्रार करता येते. तसेच १०६४ या टोल फ्री क्रमांकावर पण तक्रारी नोंदवता येतात, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजीव पाटील यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.