esakal | निवडणूकीपूर्वी जे ठरले आहे ते भाजप का करत नाही ? जयंत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant Patil says Itseems Bjp does not have confidence Top Breaking News in Marathi

निवडणूकीपूर्वी जे ठरले आहे ते भाजप का करत नाही ? जयंत पाटील

sakal_logo
By
सचिन देशमुख

कऱ्हाड ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूकीपूर्वी अनेकदा आमचं ठरलंय असे सांगितले आहे. त्यामुळे आमचं ठरलंय ची डायलॉगबाजी खरी केली तर राज्यात राष्‍ट्रपती राजवट लागू होण्याची गरज नाही, असे मत राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले. दरम्यान, काही आमदारांना अमिषे दाखवायला सुरवात झाली आहे. मात्र कोणत्याही पक्षाचा आमदार फुटला तर अन्य सर्व पक्ष एकत्र येवून त्याला पराभूत करतील असा पुनरूच्चार करून राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटणार नसल्याचा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

जेष्ठ नेते (कै.) यशवंतराव मोहिते यांच्या जन्मशताब्दी कार्यगौरव कार्यक्रमासाठी आमदार पाटील येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्याची जबाबदारी भाजपचीच असल्याचे सांगून ते म्हणाले, भाजपचा नकार आल्यावर पुढचे पर्याय विचारात घेता येतात. राज्यपालांनीही अद्याप भाजपला बोलावलेले दिसत नाही. त्यामुळे भाजप व शिवसेनेचे नेमके काय ठरतंय त्यावर पुढचे अवलंबून आहे.

भाजपने आज दुपारी राज्यपालांशी होणारी भेट लांबणीवर टकाल्याच्या प्रश्‍नावर ते म्हणाले, भाजपला आत्मविश्‍वास नसेल, मुख्यमंत्र्यांना काम असेल अथवा त्यांची तयारी झाली नसेल किंवा शिवसेनेबरोबर बैठक झाली नसेल म्हणून राज्यपालांची दुपारची भेट लांबणीवर टाकल्याचे दिसून येते. शिवसेनेच्या पाठींब्याशिवाय भाजपचे सरकार होवू शकत नाही. झालेच तर ते टिकू शकत नसल्याचेही त्यांना एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले.

आमदारांच्या फोडाफोडीसंदर्भातील प्रश्‍नावर पाटील म्हणाले, काही आमदारांना अमिषे दाखवायला सुरवात झाली आहे. मात्र कोणत्याही पक्षाचा आमदार फुटला तरी अन्य सर्व पक्ष एकत्र येवून त्याला पराभूत करतील. राष्ट्रवादीचा एकही आमदार फोडाफोडीमध्ये असू शकत नाही. फुटाफुटी होती ती अगोदरच झाली आहे. त्यामुळे उत्साहाने निवडून आलेले नवे चेहरे आहेत. लोकांच्या विश्‍वासास पात्र ठरणारे निवडून आलेले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षात बसण्याची त्यांची मानसिकता आहे.

शिवसेनेशी राष्ट्रवादीची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगून ते म्हणाले, जेष्ठ नेते (कै) यशवंतराव मोहिते यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात राजकीय चर्चा होणार नाही. शिवसेना व भाजपने काय करायचे ते त्यांनी करावे आम्ही राज्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या ठिकाणी पाहणी करत आहोत. जेष्‍ठ नेते शरद पवार दुपारी चिपळूण मार्गे कोकणात शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणीसाठी जाणार असून सांगली जिल्ह्यात तासगाव, कवठेमहांकाळला मीही पाहणीसाठी जाणार आहे.

राज्यपालांना आम्ही भेटून यापूर्वीच शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल याचे म्हणणे दिले आहे. राष्ट्रपती राजवट लागून होण्याच्या प्रश्‍नावर ते म्हणाले, राष्‍ट्रपती राजवाट लागू होण्याचे कारण नाही. शिवसनेने सत्तेत समान वाटा मगितला असून भाजपने त्यांना तो दिल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट प्रश्‍नच उदभवत नाही. निवडणूकीपूर्वी जे ठरले आहे ते भाजप का करत नाही ? हेच समजत नाही.

दरम्यान, शिवसेनेने राष्‍ट्रवादीला पाठींबा मागतिलेला नसून राष्ट्रवादीनेही शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत विचारले नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमात इतर पक्षांची चर्चा करणे योग्य नाही. जनतेने कौल भाजप व शिवसेनेला दिला आहे. त्यामुळे दोघांनीही एकत्र येवून सरकार स्थापन करावे. आम्हाला वास्तव माहीती असून विरोधी पक्षात बसण्याची आमची भूमिका मान्य केली आहे.