
सोलापूर : जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र चार लाख ६१ हजार इतके असून तृणधान्याखालील क्षेत्र तीन लाख ९७ हजार हेक्टर आहे. दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील रब्बीचे क्षेत्र सव्वादोन लाख हेक्टरपर्यंतच आहे. बारामती तालुक्यात ज्वारीसह रब्बी पिकांखालील क्षेत्र अंदाजे ४० हजार हेक्टरपर्यंत असून सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी तीन लाख १८ हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी होते. पुणे जिल्ह्याच्या तुलनेत तृणधान्याचे क्षेत्र सोलापुरात सर्वाधिक असल्यानेच ते केंद्र सोलापूरसाठी मंजूर झाले होते. तरीपण सोलापूरचे श्री अन्न उत्पादकता केंद्र बारामतीला गेलेच कसे, याचे उत्तर सरकारला द्यावे लागणार आहे.
राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने १७ एप्रिल रोजी शासन निर्णय काढण्यात आला. त्याअंतर्गत राज्यात श्री अन्न अभियान राबविले जाणार असून त्यासाठी २०० कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याचे नमूद आहे. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या काळात हे अभियान राबविले जाणार असल्याचे म्हटले आहे. अभियानातून कृषी परिषदा, जिल्हास्तरीय कृषी महोत्सव, मिलेट दौड, पाककला, कृती स्पर्धा, आहारतज्ज्ञांची व्याख्याने असे कार्यक्रम होणे अपेक्षित आहे.
नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पातून ज्या जिल्ह्यात ज्वारी व बाजरी ही पौष्टिक तृणधान्ये घेतली जातात, त्याठिकाणी पिकांचे क्षेत्र, उत्पादकता वाढीसाठी व उत्पादन खर्च कमी करण्यासाठी, हवामान बदल व पावसाचा लहरीपणाचा शेतीवरील परिणामाचा विचार करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन, विशेष कार्यशाळा, हवामान अनुकूल बियाणांच्या वाणांचे उत्पादन, शेतकरी उत्पादक महिला गटांना अर्थसाहाय्य, उत्पादित मालाची साठवण करण्यासाठी गोदाम उभारणीस अर्थसाहाय्य, यासाठी पाच कोटींची तरतूद झाली.
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंर्तगत व मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना व एक जिल्हा एक उत्पादन या आधारावर सोलापूर, ठाणे, नंदुरबार येथे पौष्टिक तृणधान्य आधारित सुक्ष्म अन्न प्रक्रिया प्रकल्पांचा समावेश झाला. लाभार्थींना प्रशिक्षण सुविधांसाठी ५० कोटींची तरतूद करण्यात अपेक्षित आहे.
त्यानंतर मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत तृणधान्य मूल्यसाखळी विकासासाठी विशेष विस्तार कार्यक्रमांचे आयोजन, प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया उद्योग उभारणी, ब्रॅंण्डींग, मार्केटिंग सुविधा देणे, तसेच राष्ट्रीय तृणधान्य संशोधन संस्था हैदराबाद या संस्थेसोबत सामंजस्य करार करून सोलापूर येथे तृणधान्य मूल्यसाखळी विकास प्रकल्पात काम करणाऱ्या शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रशिक्षण देण्यासाठी व त्यांची क्षमता बांधणीसाठी श्री अन्न क्षेत्र उत्कृष्टता केंद्र मंजूर झाले. त्यासाठी ३० कोटींची तरतूद करण्याचे ठरले. तरीपण, केंद्र व राज्य सरकारचे मिळून त्या केंद्रासाठी सात कोटींपर्यंत रक्कम मंजूर असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांसमोर सांगितले होते. त्यामुळे पुन्हा संभ्रम वाढला आहे.
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री, हा निर्णय रद्द व्हायलाच हवा
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी संपूर्ण राज्याचा विचार करणे अपेक्षित आहे. बारामती हा त्यांचा मतदारसंघ आहे, पण दुसऱ्या जिल्ह्याला मिळालेले हिसकावून नेणे योग्य नाही. त्यांनी हा शासन निर्णय तत्काळ मागे घ्यावा आणि माणुसकी दाखवावी.
- सुभाष देशमुख, आमदार
---------------------------------------------------------------
बारामतीला काय नेले आणि आपल्याकडे काय राहिले?
सोलापूरला मंजूर झालेले श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला नेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही दिसून आले. त्यांनी ते केंद्र बारामतीला नेल्याचे स्पष्ट केले आहे. तसा शासन निर्णय देखील झाला असून प्रशासनाने त्यावरील सत्य माहिती देऊन शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करावा.
- प्रा. काकासाहेब कुलकर्णी, प्रदेश प्रवक्ते, काँग्रेस
------------------------------------------------------------------
सोलापूरच्या हक्काचे सोलापूरलाच मिळावे
सोलापूर जिल्ह्यासाठी खास मंजूर झालेले श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला पळविले ही वस्तुस्थिती आहे. तरीपण, उपमुख्यमंत्री अजित पवार हे हा प्रकल्प नेला नसल्याचे खोटे बोलत आहेत. त्यासंदर्भातील शासन निर्णयातून सोलापुरातील केंद्र बारामतीला गेल्याचे स्पष्टपणे नमूद आहे. हा शासन निर्णय तत्काळ रद्द करावा.
- प्रशांत बाबर, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.