'या' कारणामुळे सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी ठाकरेंच्या शपथविधीला जाण्याचे टाळले

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 November 2019

काॅंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व काॅंग्रेस नेते राहूल गांधी हे शपथविधीला हजर राहिले असते, तर इतर राज्यांमध्ये एक वेगळा संदेश गेला असता. यामुळे त्यांनी सांमजस्यपणाची भूमिका घेत ठाकरे यांच्या शपथविधाला जाणे टाळले.

दिल्ली : महाराष्ट्रामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस यांच्या महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. कालच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या समारोहाला देशभरातून दिग्गज नेते उपस्थित होते, मात्र काॅंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी, माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांनी येण्याचे टाळले. हा त्यांचा राजकीय सांमजस्यपणा असल्याची सध्या चर्चा आहे.

दरम्यान, काॅंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व नेते राहूल गांधी या शपथविधीला हजर राहिले असते, तर इतर राज्यांमध्ये एक वेगळा संदेश गेला असता. यामुळे त्यांनी सांमजस्यपणाची भूमिका घेत  शपथविधाला जाणे टाळले. तसेच त्यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना शपथविधी भव्यदिव्य करायचा होता. या कारणास्तव त्यांनी आपले पुत्र आमदार आदित्य ठाकरे यांना सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना निमंत्रण देण्यासाठी पाठविले होते. बुधवारी रात्री आदित्य ठाकरे हे त्यांना निमंत्रण द्यायला देखील गेले होते. या दोघांनीही आदित्य यांचे स्वागत करत निमंत्रण स्वीकारले होते, परंतू त्यांनी शपथविधीली जाणे टाळले. तसेच पत्र पाठवून ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काॅंग्रेस पक्षाची महाराष्ट्रात झालेली आघाडी ही महाराष्ट्रापुरतीच सिमित असावी याबाबत काॅंग्रेस पक्षात एकमत आहे. या सर्व कारणांमुळेच सोनिया गांधी व मनमोहन सिंग यांनी शपथविधीला येण्याचे टाळले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: why sonia gandhi and rahul gandhi did not attend uddhav thackrey oath ceremony