esakal | जनतेने बाजूला केलेल्यांची नोंद कशाला घ्यायची : शरद पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

माढा मतदारसंघात त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली. त्या ठिकाणी डिपॉझिट जप्त झाले. बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली. त्या ठिकाणीही त्यांचे डिपॉझिट जप्त झाले.

जनतेने बाजूला केलेल्यांची नोंद कशाला घ्यायची : शरद पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : ज्यांना जनतेने बाजूला केले आहे, अशा लोकांची आपण कशाला नोंद घ्यायची, अशी उपहासात्मक टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर केली. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सध्या भरपूर वेळ आहे. त्यामुळे ते काहीही बोलून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा टोला फडणवीस यांना त्यांनी लगावला. 

भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचीच ऑफर होती, असा गौप्यस्फोट करून देवेंद्र फडणवीस यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यावर शरद पवार काय बोलणार, याची उत्सुकता होती. याचबरोबर भाजपचे आमदार पडळकर यांनी पवार यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवरील टीका केली आहे. त्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. आमदार पडळकर यांनी केलेल्या टीकेला स्वतः शरद पवार काय उत्तर देणार? याची उत्सुकता होती. 

शरद पवार आज साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. त्या वेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. श्री. पवार म्हणाले, ""देवेंद्र फडणवीस यांना सध्या भरपूर वेळ आहे. त्यामुळे ते काही ना काही बोलून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत असतात. यापेक्षा यात दुसरे काहीही नाही.'' आमदार पडळकर यांच्याबाबत विचारले असता श्री. पवार म्हणाले, ""माढा मतदारसंघात त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली. त्या ठिकाणी डिपॉझिट जप्त झाले. बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली. त्या ठिकाणीही त्यांचे डिपॉझिट जप्त झाले, तसेच सांगली लोकसभेची निवडणुकीतही त्यांना जनतेने स्वीकारले नाही. ज्यांना जनतेने बाजूला केले आहे, अशा लोकांची आपण कशाला नोंद घ्यायची, अशा शब्दांत आमदार पडळकर यांच्या टीकेकडे श्री. पवार यांनी दुर्लक्ष केले.