‘SMT’ पुन्हा जोमाने रस्त्यांवर धावेल का? प्रवाशांना सोसावी लागतेय रिक्षावाल्यांची मुजोरी; महापालिकेच्या नवीन प्रस्तावाची उत्सुकता

दहा लाखांवर लोकसंख्या असलेल्या व स्मार्ट सिटी म्हणून गौरविलेल्या सोलापूर शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे ‘तीन-तेरा‘ वाजल्याने हाल होत आहेत. १२५ बसची गरज असलेल्या सोलापुरात तिसऱ्यांदा सादर केलेल्या प्रस्तावात शंभर इलेक्ट्रिकल बस मिळण्याची अपेक्षा आहे.
ST Privatization decision failed electric bus smart city financial issue solapur
ST Privatization decision failed electric bus smart city financial issue solapursakal

सोलापूर : तब्बल दहा लाखांवर लोकसंख्या असलेल्या व स्मार्ट सिटी म्हणून गौरविलेल्या सोलापूर शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे ‘तीन-तेरा‘ वाजल्याने शहरवासीयांचे हाल होत आहेत. १२५ बसची गरज असलेल्या सोलापुरात तिसऱ्यांदा सादर केलेल्या प्रस्तावात शंभर इलेक्ट्रिकल बस मिळण्याची अपेक्षा आहे. या बसमुळे इंधनात बचत होईल, असा दावा आहे. परंतु, ई-बसपेक्षा सीएनजी बसच उपयुक्त असल्याचे सिद्ध झाल्याने त्याचा विचार महापालिकेने केला तर सोयीचे ठरणार आहे.

मध्यंतरी केंद्र शासनाच्या (जेएनयूआरएम) योजनेतून १४५ मंजूर बसपैकी पहिल्या टप्प्‍यात घेतलेल्या शंभरपैकी ९९ नव्या कोऱ्या बस अक्षरशः भंगारात पडून आहेत. तर एक बस जळून खाक झाली आहे. या नव्या कोऱ्या बस सध्या अक्षरशः कंडम झाल्याने सात रस्ता येथील डेपोत पडीक स्थितीत उभ्या आहेत. काही महाभाग त्याचा शौचालय व तत्सम सोयीसाठी वापर करीत असल्याचे विदारक चित्र आहे. सोलापूर शहराची अंतर्गत रचना जाणून न घेता, कोणत्याही चौकातून फिरता न येणाऱ्या या बसमुळे सोलापूरकरांच्या सोयीपेक्षा अडचणीचीच स्थिती झाली होती. या बस खरेदीमध्ये झालेल्या व्यवहाराचीच नेहमीच चर्चा होत असते. या बसचे पुढे काय हा प्रश्‍न अनुत्तरीतच राहिला आहे.

सोलापूर शहरातील प्रदूषण कमी करणे तसेच शहरवासीयांना उत्तम प्रवासी सेवा देण्याची योजना आहे. परंतु, सध्या ९१ मार्गावर चालण्यासाठी अक्षरशः कंडम स्थितीतील २७ बस कार्यरत आहेत. अपुऱ्या बससंख्येमुळे खासगी प्रवासी वाहतुकीकडे जावे लागते. यासाठी सोलापुरात पर्यायी सोय म्हणून केवळ रिक्षाचाच वापर होतो. अनेकवेळा प्रवाशांना रिक्षावाल्यांची मुजोरी सहन करावी लागते. परिवहन सेवा नसल्याने रिक्षांची संख्याही प्रचंड वाढली आहे. या रिक्षावाल्यांमध्ये प्रवासी घेण्यासाठी प्रचंड स्पर्धा असते. प्रवासी दिसला की रिक्षावाले रस्त्यात कुठेही ब्रेक मारत असल्याने अपघातास व नंतर वादास आपसूकच आमंत्रण दिले जाते.

आर्थिक उत्पन्न देणाऱ्या उपक्रमाने टाकली मान

सोलापूर महापालिकेने गेल्या पाच वर्षांत २०१८ व २०१९ अशा दोनवेळा ई-बस मिळण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावाला प्रतिसाद मिळाला नाही. केंद्र शासनाच्या पीएम ई-बस सेवा योजनेच्या निकषात सोलापूर महापालिका बसत असल्याने आता तिसऱ्यांदा नव्याने शंभर बससाठी प्रस्ताव पाठविला आहे. सध्याच्या परिवहन उपक्रमाची स्थिती अत्यंत शोचनीय झाली आहे. ‘शरपंजरी‘ झालेला हा उपक्रम एकेकाळी सोलापूर महापालिकेला आर्थिक मदत करत असल्याचा सुवर्ण अक्षरांनी नोंदलेला इतिहास आहे. अलीकडील काळात मात्र या उपक्रमाने मानच टाकल्याने कर्मचाऱ्यांची स्थिती प्रचंड हलाखीची झाली आहे.

तुलनात्मक तफावत...

ई-बसच्या तुलनेत सीएनजीवर धावणाऱ्या बस वाहतुकीचा प्रवास २० टक्क्यांनी स्वस्त होत असल्याचे पीएमपी (पुणे) बसच्या वाहतुकीतून सिद्ध झाले आहे. ई-बसला एका कि.मी.साठी १०२ रुपये तर सीएनजीला केवळ ८५ रुपये खर्च येतो. विशेष म्हणजे ३३ बसून व १२ उभे अशा ई-बसची किंमत दीड कोटींच्या घरात आहे. तर सीएनजी बस मात्र ५५ लाखात मिळते. चार्जिंगसाठी थांबणे, बॅटरीची व अन्य तांत्रिक बाबींची उपलब्धता यामुळेही अडचणी येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

महापालिकेचा नवा प्रस्ताव...

सोलापूर महापालिकेने २०१८ मध्ये स्मार्ट सिटी योजनेतून ४० कोटी खर्चून ५० ई-बस खरेदीसाठी प्रस्ताव सादर केला. त्यानंतर २०१९ मध्ये अवघड उद्योग व सार्वजनिक उपक्रम विभागाने देशातील ६५ शहरांसाठी आखलेल्या योजनेत सोलापूरसाठी २५ बस मंजूर झाल्या. ७० टक्के अनुदान व ३० टक्के महापालिकेचा वाटा अशी ही योजना होती. परंतु आर्थिक ताळमेळ बसत नसल्याने हा प्रस्ताव बारगळला. गेल्या आठ वर्षात एकही बस खरेदी झालेली नाही. आता नव्याने तिसऱ्यांदा १०० ई-बस खरेदीचा प्रस्ताव पाठविला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com