
Maharashtra Politics : शरद पवारांचा ‘तो’ सल्ला उद्धव ठाकरे ऐकणार का?
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काल (शुक्रवारी) शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय दिला आहे. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटालाच दिलं. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून शिंदे गटात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी या निर्णयावर टीका केली असून आपण सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
तर निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर राज्यभरातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. अशातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुद्धा यावर आपलं मत व्यक्त केलं असून उद्धव ठाकरे यांना एक सल्ला देखील दिला आहे. निवडणूक आयोगाकडून जो निकाल देण्यात आला आहे त्यावर चर्चा करता येणार नाही. मात्र निवडणूक आयोगाच्या निकालाने ठाकरे गटाला फारसा फरक पडणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
तर शरद पवार यांनी राज ठाकरे यांना सल्ला दिला आहे. 'हा निवडणूक आयोगाचा निकाल आहे, एकदा निकाल लागल्यावर त्यावर चर्चा करता येत नाही. तो स्वीकारायचा आणि नवीन चिन्ह घ्यायचं. त्याचा फार काही परिणाम होत नाही. काँग्रेसमध्ये एकदा इंदिरा गांधी असताना हा वाद निर्माण झाला होता. काँग्रेसचं गाय-वासरू चिन्ह होतं, पण त्यांनी पंजा घेतला, पण त्यामुळे काही फरक पडला नाही. काही दिवस चर्चा होत राहील, असं म्हणत शरद पवार यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय स्वीकारण्याचा सल्ला उद्धव ठाकरे यांना दिला आहे.पण ठाकरे यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांच लक्ष असणार आहे.
उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज (18 फेब्रुवारी) तातडीने पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व आमदार, खासदार आणि नेते उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी एक वाजता मातोश्रीवर ही बैठक होणार आहे.