Winter : राज्यात गुलाबी थंडीची प्रतीक्षा! ‘ऑक्टोबर हिट’नंतर तापमानात होत आहे घट

‘ऑक्टोबर हिट’च्या तीव्रतेनंतर आता तापमानात हळूहळू घट होऊ लागली आहे.
cold in maharashtra
cold in maharashtrasakal

पुणे - ‘ऑक्टोबर हिट’च्या तीव्रतेनंतर आता तापमानात हळूहळू घट होऊ लागली आहे. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने घट होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान १८ अंश सेल्सिअस आणि त्यापेक्षा खाली घसरले आहे.

पहाटेच्यावेळी काहीसा गारठा जाणवू लागला आहे. मात्र तरीही अद्याप गुलाबी थंडीसाठी नागरिकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार असून लवकरच राज्यात थंडीची चाहूल लागण्याची चिन्हे आहेत.

राज्यात बुधवारी (ता.२५) जळगावमध्ये १३.२ अंश सेल्सिअस अशा नीचांकी तापमानाची नोंद झाली. तर सांताक्रुजमध्ये ३६.५ अंश सेल्सिअस असे उच्चांकी तापमान नोंदविले गेले. ऑक्टोबर हीट संपल्यानंतर राज्यात पहाटे काहीसा थंडावा जाणवू लागल्याने नागरिकांना गुलाबी थंडीची ओढ लागली आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील दोन्ही चक्रीवादळ निवळली आहेत. बंगालच्या उपसागरातील ‘हामून’ चक्रीवादळ  बांगलादेशच्या दिशेने सरकले आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत आणि उत्तर केरळमध्ये चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत. दरम्यान, राज्याच्या तापमानात घट होऊ लागली आहे.

कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ, तर कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमानात किंचित घट झाली आहे.

मध्य महाराष्ट्रात जळगाव, सांगली, सोलापूरमध्ये; मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीडमध्ये आणि विदर्भात अकोला, अमरावती, बुलडाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा येथे किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले. तर उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

पुण्यात बुधवारी ३२.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान, तर १८.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुणे आणि परिसरात आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता आहेत, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com