विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही थंडीची चाहूल

विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही थंडीची चाहूल

पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडी वाढू लागली आहे. विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही रात्रीचे तापमान घटण्यास सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. १२) सकाळी नागपूर येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली. राज्यात कोरड्या मुख्यत: हवामानाचा अंदाज असून, गारठा कायम राहणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

राज्यात निरभ्र आकाश असल्याने दुपारच्या वेळी उन्हाचा चटका असला, तरी आता कमाल तापमानाही चढ-उतार होत आहेत. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील किमान तापमानात घट झाल्याने गारठा वाढला आहे. उन्हात गेल्यावर अंगाला चटका बसत असताना, सावली असलेल्या ठिकाणी मात्र गारठा जाणवू लागला आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी किमान तापमानात १ ते २ अंशांची घट झाली असून, बऱ्याच ठिकाणी तापमान १३ ते १५ अंशांच्या दरम्यान अाहे.
 
सोमवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.३ (१३.९), जळगाव ३५.० (१२.४), कोल्हापूर ३२.१ (१९.५), महाबळेश्‍वर २७.७ (१५.६), मालेगाव ३४.० (१५.०), नाशिक ३३.३ (१२.२), सांगली ३३.० (१५.४), सातारा ३२.६ (१६.०), सोलापूर ३४.६ (१५.९), सांताक्रूझ ३५.५ (२०.०), अलिबाग ३१.८ (२०.९), रत्नागिरी ३५.४ (२१.३), डहाणू ३४.२ (२१.२), आैरंगाबाद ३३.६ (१३.०), परभणी ३४.५ (१३.९), नांदेड -(१५.०), उस्मानाबाद -(१५.५), अकोला ३४.१ (१४.२), अमरावती ३३.४ (१६.४), बुलडाणा ३२.७ (१५.२), चंद्रपूर ३४.० (१६.२), गोंदिया ३०.८ (१३.०), नागपूर ३२.९ (११.४), वर्धा ३३.१ (१४.०), यवतमाळ ३४.५ (१३.४).

‘गाजा’चा उत्तर तमिळनाडूला सतर्कतेचा इशारा
बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूलगतच्या समुद्रातील ‘गाजा’ चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे. चेन्नईपासून ७३० किलोमीटर, तर श्रीहरिकोटापासून ८२० किलोमीटर अाग्नेय दिशेला असलेल्या प्रणालीचे आज (ता. १३) तीव्र चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येणाऱ्या वादळामुळे उत्तर तमिळनाडू आणि पदुच्चेरी या भागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे ताशी ११० ते १२५ किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहणारे वादळ गुरुवारी (ता. १५) नागपट्टन्नम आणि चेन्नईलगत जमिनीवर येणार आहे. आंध्र प्रदेश, तमिळनाडूच्या पूर्व किनाऱ्यावर समुद्रही खवळणार असून, जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com