esakal | गुड न्यूज... ! ग्रामीण भागातील महिलांसाठी ‘या’ जिल्ह्यांसाठी सरकारकडून ४२ कोटी 
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद)

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत महिलांना स्वरोजगार उपलब्ध होत आहे. ग्रामीण भागातील महिलांना छोट्या उद्योगातून रोजगार निर्माण करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यात केंद्राच ७५ तर राज्याचा २५ टक्के निधी देते. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराची दिशा मिळत आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक महिलांनी सक्षमीकरणाकडे यशस्वी झेप घेतली आहे.

गुड न्यूज... ! ग्रामीण भागातील महिलांसाठी ‘या’ जिल्ह्यांसाठी सरकारकडून ४२ कोटी 

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

पुणे : तळागाळातील कुटुंबाना स्वयंरोजगार मिळावा व दारिद्रय कमी होऊन कुटुंब आर्थिक सक्षम व्हावे म्हणून सरकार विविध योजना राबवते. त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान.  ग्रामीण भागात महिला विशिष्ट उद्दीष्ट घेऊन एकत्र येतात. त्यांना सरकार या अभियानातून बळ देत आहे. यासाठी केंद्र सरकारने २०२०- २१ वर्षासाठी ५७ कोटी ६७ लाख ५३ हजार निधी वितरीत केला आहे. केंद्र आणि राज्याचा मिळून महिलांच्या सक्षमीकरणासाठी या योजनेत सरकारने ३१५ काटी ६० लाखाची तरतुद केली आहे. त्यातील ४१ कोटी ९० लाख वितरीत करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत महिलांना स्वरोजगार उपलब्ध होत आहे. ग्रामीण भागातील महिलांना छोट्या उद्योगातून रोजगार निर्माण करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यात केंद्राच ७५ तर राज्याचा २५ टक्के निधी देते. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराची दिशा मिळत आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक महिलांनी सक्षमीकरणाकडे यशस्वी झेप घेतली आहे. कोरोनाच्या महामारीतही बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्ष्मीकरणासाठी प्रयत्नशील आहेत. बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला एकत्र येऊन मास्क तयार करणे आणि नवनवीन वस्तू तयार करण्याचे काम करत आहे. यामुळे या दिवसातही त्यांना नवी उमेद मिळाली आहे.

स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियानात रुपांतर करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. राज्य देखील ही योजना राबवत आहे. 
या अभियानामार्फत बचत गटातील महिलांनी उद्योग व्यवसायात भरारी घेतली आहे़. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे सकारात्मक पाऊल टाकले जात आहे. विकासाच्या दिशेने भरारी घेण्यासाठी महिलांच्या पंखांमध्ये बळ निर्माण करण्याचा प्रयत्न उमेद करीत आहे. उमेद अभियानाचे संचालन ग्रामविकास विभाग महाराष्ट्र सरकारकडून केले जाते. ग्रामीण महाराष्ट्रातील गरीब कुटुंबाना समृद्ध, आत्मसन्मान आणि सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी उमेद अंतर्गत एकात्मिक प्रयत्न करण्यात येत आहेत. 

यामाध्यमातून स्वयंसहायता गट, बचत गट याद्वारे स्त्रियांचे संघटन करून त्यांच्यातील उद्योजकतेला चालना दिली जात आहे. उमेदच्या माध्यमातून महिलांना बचत करण्याची सवय लागली असून त्यांच्यात स्वयंरोजगारासह बँकेचे व्यवहार करण्याची क्षमता विकसित झाली आहे. अनेक महिला बँकेमार्फत कर्ज घेऊन काम करत आहेत.

अक्कलकोटमधील प्रियदर्शनी बचत गटाच्या अध्यक्ष वनिता तंबाके म्हणाल्या, आम्ही अनेक वर्षांपासून बचत गट चालवत आहोत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियानामुळे तळागाळातील महिलांना त्याचा लाभ मिळाला आहे. अशा गटामुळे महिला सक्षम बनल्या आहेत. कोरोना महामारीत सुद्धा आम्हला नवनवीन कल्पना सुचल्या आहेत. या दिवसात घरगुती वस्तुंना मागणी वाढली आहे. त्या पद्धतीने गटामार्फत तयार केलेल्या वस्तू फूडव्हॅनने प्रत्येक गावात पाठवत आहोत. आणि अनेकांना घरपोच सेवा देत आहोत. सध्या अमेझॉनवर तयार साहित्य पोहच करण्याचे काम सुरु आहे. लवकरच त्याची सुरुवात होईल. 

ही आहेत अभियानाची उद्धिष्टे...

गरीब गरीबीतून बाहेर पडू शकतो. त्यासाठी त्यास आवश्यक सहाय्य दिले पाहिजे. या विश्वासातून दारिद्रय निर्मूलन करण्या‍साठी गरीबांना एकत्र आणून, त्यांच्या सक्षम संस्था उभारणे. गरीब वंचित महिलांचा समावेश स्वंयसहाय्यता गटामध्ये करणे. सदर संस्थामार्फत गरीबांना एकत्रित करून, त्यांच्या संस्थाची क्षमता वृद्धी व कौशल्य वृध्दी‍ करणे, वित्तीय सेवा पुरवणे आणि शाश्वत उपजीविकेची साधने उपलब्ध करुन देऊन त्यांना दारिद्रयाच्या बाहेर येण्यासाठी मदत करणे, हे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियानाचे प्रमुख उदिष्ट आहे.

हा आहे अभियानाचा गाभा... 

ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना समृध्द, आत्मसन्मानाचे व सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी त्यांच्या सर्व समावेशक, लोकशाही तत्वावर आधारित स्वयंचलीत समुदाय संस्थांची निर्मिती करुन त्यांचे अधिकार व हक्क, विविध वित्तीय सेवा तसेच शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त न होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी एक समर्पित व संवेदनशील संस्था निर्माण करणे. यासाठी राज्य, जिल्हा व तालूका स्तरावर उमेद अभियानातील त्रिस्तरीय रचना तयार केली आहे.

अभियानाची वैशिष्टे... 

संवेदनशिल सहाय्य रचना, सर्वसमावेशक सामाजिक सहभाग, दारिद्रय रेषेखालील स्वरोजगारींच्या संस्थांचे उन्नतीकरण, मागणी आधारित पतपुरवठा, प्रशिक्षण व क्षमता बळकटीकरण, फिरता निधी, सर्व समावेशक आर्थिक अंतर्भाव, व्याजदरासाठी अनुदान, मुलभूत सुविधा निर्मिती व विपणन सहाय्य, अन्य योजनांचे एकत्रिकरण व समन्वय

योजनेत हे आहेत जिल्हे व तालुके

राज्य सरकारच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार या योजनेअंतर्गत १० जिल्ह्यांमधील ३६ तालुक्यांकरिता ही योजना (NRLP (Intensive) म्हणून राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यांची नाव        तालुक्याचे नाव 
ठाणे                      तलासरी, जव्हार, शहापूर, पालघर, भिवंडी
रत्नागिरी                रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा
सोलापूर                मोहोळ, सांगोला, माळशिरस, बार्शी
नंदुरबार               अक्कलकुवा, शहादा, धडगाव
उस्मानाबाद           उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा
जालना                  जालना, भोकरदन, घनसावंगी
यवतमाळ              कळंब,घाटंजी, बाभुळगाव, राळेगाव, पांढरकवडा
वर्धा                      देवळी, वर्धा, सेलू
गोंदिया                  सालकेसा, अर्जुनी-मोरगाव, तिरोडा
गडचिरोली             कुरखेडा, धानोरा, एटापल्ली, अहेरी