मुलांसाठी पहिल्यांदा स्टेअरिंग हातात घेणारी कोल्हापूर-रत्नागिरी घाट माथ्यातली ‘हिरकणी’ Womens Day Special | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Womens Day Special

Womens Day Special: मुलांसाठी पहिल्यांदा स्टेअरिंग हातात घेणारी कोल्हापूर-रत्नागिरी घाट माथ्यातली ‘हिरकणी’

रात्री दोन-अडीजची वेळ. कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील रस्ता. भाज्यांनी भरलेला एक बुलेरो पिकअप अंधारात वाट शोधत हळू हळू जात होता. त्यात एक महिला आणि सोबत नवखा ड्रायव्हर प्रवास करत होते. सभोवतालची झाडी त्यावर चकाकणारे रातकिडे अधिकच भयावह वाटत होते. त्यात नव्यानेच आलेला ड्रायव्हर भर घाटमाथ्यावरून पुढे जायला नाही म्हणाला. त्याला त्या वातावरणाची आणि घाटाची भिती वाटू लागली. समोरचे घाटमार्गातले धुके पाहून ‘मी घाट रस्त्यात कधी गाडी चालवली नाही, असे सांगत त्यांनी गाडी मध्येच सोडत पळ काढला

त्या महिलेने अनेकदा समजावूनही त्याने ऐकले नाही. तिला एकटीला तिथेच टाकून तो पसार झाला. भाजी रत्नागिरीला पोहोचवणे तर गरजेचे होते. त्यामूळे तिने पदर खोचला अन् गाडीचे स्टेअरिंग हातात घेतले. नकुसा मावशी रात्रभर घाबरलेल्या अवस्थेत हळूहळू दरमजल करीत कोकणातला घाट उतरत्या झाल्या. त्या रात्री जीवाची पर्वा न करता ती रत्नागिरी घाटातून वाट काढत राजापूरच्या भाजीमंडईत पोहोचली आणि तिने व्यापाऱ्यांचे, शेतकऱ्यांचे नुकसान होण्यापासून वाचवले.

ती धाडसी महिला होती नकुसा मासाळ अर्थात नकुसा मावशी. सांगलीत राहणाऱ्या नकुसा गेल्या वीस वर्षांपासून नकुसा मावशी स्वतः ड्रायव्हर म्हणून काम करत आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी सांगली, जयसिंगपूर, वाठार, वारणा इथल्या भाजी बाजारातून भाजीपाला खरेदी करणे आणि तो भाजीपाला बोलेरो पिकअप या चारचाकी गाडीतून रत्नागिरी, राजापूर, लांजा या कोकण पट्ट्यात नेऊन विक्री करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे.

नकुसा यांच्या नावाची ही वेगळी कहाणी आहे. नकुसा यांना चार बहिणी आहेत. चार मुलींनंतर पुन्हा मुलगीच झाली म्हणून देवा आता मुलगी देऊ नकोस, अशी प्रार्थना करत पाचव्या मुलीचे नाव नकुसा ठेवण्यात आले. त्यांचं माहेर जत तालुक्‍यातील गुळवंची. आईवडील रोजगाराच्या शोधात सांगलीत आले. पडेल ते काम करीत त्यांचे कुटुंब शिकले. नुकसाताईंना दुसरीतून शाळा सोडावी लागली. त्यांना दोन भाऊ. रावसाहेब आणि संतोष वाघमोडे. त्यांचा ट्रक व्यवसाय. त्यांच्याकडे मामा प्रकाश ट्रक चालक म्हणून काम करायचे. त्या मामांशीच त्यांचा सोळाव्या वर्षीच विवाह लावून देण्यात आला. दिलिप, सविता, उज्वला अशी मुलं संसारवेलीवर फुलली मात्र नियतीच्या आघातामुळे सारेच पोरके झाले.

पती प्रकाश यांच्या निधनानंतर जगण्यासाठी त्यांनी माहेराकडे न जाता स्वतःच स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरु केला. त्यामूळे पदराच असलेल्या दोन मुली आणि एका मुलाचे संगोपन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली.

तूम्हाला हिरकणीची गोष्ट माहितीय ना? त्यातील हिरा गवळण दूध घेऊन रायगडावर जाते अन् उशीर झाल्यानं अडकून बसते. पण, तिच्या तान्ह्या बाळासाठी ती गड उतरून घरी परतते. अगदी तशीच एका रात्री धाडस करण्याचं बळ तिच्या मुलांच्या उज्वल भविष्याकडे पाहूनच मिळाले.

नशिबात आलेल्या संकटांपुढे हतबल न होता त्यांनी जिद्दीने जूना बुलेरो खरेदी केला आणि त्यानेच त्या रत्नागिरीला माल पोहोचवतात. आजही त्या कोल्हापूर रत्नागिरी हायवेला तूम्हाला दिसू शकतात. दोन कामगार आणि मुलाच्या मदतीने त्या आसपासच्या दोन-तीन गावांतील बाजाराच्या ठिकाणी भाजीपाला विक्री करतात. एका फेरीत त्या तीन चार टन भाजीपाल्याची विक्री करतात. कोबी, वांगी, टोमॅटो, गवार, कांडा, घेवडा, पडवळ, दुधी, दोडका, भेंडी, कारली असा सर्वच प्रकारचा भाजीपाला त्या विक्रीस नेतात.

सांगलीतील शामरावनगरमध्ये मावशी राहतात. त्यांनी गावाकडे प्रशस्त बंगला बांधण्याचा घाट घातला आहे. त्या तो नक्की पूर्ण करतील. नकुसा मावशींचे कौतूक महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांच्या कार्यालयातून नकुसा मावशीला फोनही आला. महिंद्राजींना मावशीचे खूप अप्रूप वाटले.

वाहनाच्या स्टेपनी बदलण्यापासून पासिंगपर्यंतची सारी कामे त्या करतात. सांगलीतील शंभर फुटी रस्त्यावरील मौला मेस्त्री यांच्याकडेच त्या गाडीची सारी दुरुस्ती देखभालीची कामे हक्काने करून घेतात. इकडे भाजीपाला विक्री करतानाही त्या गावाकडील सासरची तीन एकर शेतीही गडीमाणसं कामाला लावून करतात. त्यात शाळू बाजरी पिके घेतात त्यातून वर्षाची कुटुंबाची सोय होते. घाटरस्ता असो की हायवे त्यांचे भन्नाट ड्रायव्हिंग पाहून सारे तोंडात बोटे घालतात. या नकुसा आता सर्वांनाच हव्या हव्याशा आहेत नकुसांचे जीवन संघर्षमयी होते.