

सोलापूर : कोट्यवधी रुपये खर्च करून शांती चौक परिसरात शासकीय तंत्रनिकेतनजवळ महापालिकेने उभारलेल्या अर्बन स्ट्रीट पार्कच्या देखभालीसाठी दोन कर्मचारी नियुक्त केले. मात्र ते कर्मचारी कागदावरच असून प्रत्यक्षात तेथे कोणीही नसते. याचाच फायदा घेऊन चोरट्यांनी ४९०० फूट वायर चोरुन नेली. धक्कादायक म्हणजे खांबावरील वीज बंद असल्याची तक्रार नागरिकाने महापालिकेकडे केल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली आहे.
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमातून सुमारे पावणेदोन कोटी रुपये खर्च करून शांती चौक परिसरात स्ट्रिट पार्क उभारले आहे. मात्र, नियमित देखभाल न झाल्याने काही दिवसांतच त्याची दुरवस्था झाली. आता त्याठिकाणी उभारलेल्या डेकोरेशन पोलला जोडलेली जमिनीखालील वायरच चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या पार्कमध्ये सगळीकडे वीजेचे पोल उभारले होते आणि त्याचे वायरिंग अंडरग्राऊंड (जमिनीखालून) करण्यात आले होते. लाईटिंगमुळे तो परिसर रात्रीच्या वेळी उजळून दिसत होता. मात्र, पाच-सहा दिवसांपासून तेथील लाईट बंद होती. याबद्दल एकाने महापालिकेकडे ऑनलाइन तक्रार केली होती. महापालिकेने तो तक्रारी अर्ज पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागीय कार्यालयाकडे पाठविला.
१६ मे रोजी विभागीय कार्यालयाचे अधिकारी लाईट का बंद आहे, याचा शोध घ्यायला त्याठिकाणी पोचले. सुरवातीला तांत्रिक बिघाड काही झाला आहे का, हे पाहिले. पण, तसे काहीही झालेले नव्हते. एका पोलवरून दुसऱ्या पोलपर्यंत वीजपुरवठा होत नव्हता. त्यावेळी अंडरग्राऊंड वायरच त्याठिकाणी दिसली नाही. सगळीकडील वायर जागेवर नसल्याचे पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. या प्रकरणी महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पूजा देशमाने यांनी जोडभावी पेठ पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिस हवालदार धनाजी बाबर तपास करीत आहेत.
तब्बल ४९०० फूट केबल चोरी
शांती चौक परिसरातील महापालिकेने उभारलेल्या अर्बन स्ट्रिट पार्कमधील डेकोरेशन पोलला जोडलेली तब्बल चार हजार ९०० फूट केबल चोरट्यांनी चोरून नेली आहे. त्या कॉपर केबलची अंदाजे किंमत एक लाख १० हजार रुपये असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
...तर चोरट्याचा शोध कधी लागणार?
शांती चौक सुशोभिकरणासाठी तब्बल साडेचार कोटी रुपये खर्च केले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करता असताना त्या ठिकाणी सीसीटीव्हीची व्यवस्था नाही. यापूर्वी या ठिकाणी बल्ब आणि केबलची चोरी झाली. परंतु मक्तेदाराकडून दुरुस्त करून घेतले. आता दुसऱ्यांदा केबलची चोरी झाली, आता या चोरट्याचा शोध कधी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.