व्वा रे पठ्ठ्या! सोलापुरात चोरट्यांनी गाडीला दोरी बांधून 'एटीएम' ओढले अन्‌ मशीनच चोरुन नेली; गुगल मॅप वापरून गावागावातील रस्त्यांवर झाले पसार, शेतात सापडली मशीन

विडी घरकुलमधील सग्गम नगरातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाची एटीएमच शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास चोरट्याने पळवून नेली. मशिनमध्ये एक लाख ७९ हजार १०० रुपये होते. मालवाहतूक गाडीत मशिन भरून दहिटणेमार्गे मार्डीच्या दिशेने गेलेले चोरटे बक्षीहिप्परगा येथील शेतात थांबले. तेथे पैसे काढून चोरट्यांनी मशिन शेतात टाकली होती. रविवारी शहर गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाला मशिन सापडली.
ATM
ATMsakal media
Updated on

सोलापूर : विडी घरकुलमधील सग्गम नगरातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाची एटीएमच शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास चोरट्याने पळवून नेली. मशिनमध्ये एक लाख ७९ हजार १०० रुपये होते. मालवाहतूक गाडीत मशिन भरून दहिटणेमार्गे मार्डीच्या दिशेने गेलेले चोरटे बक्षीहिप्परगा येथील शेतात थांबले. तेथे पैसे काढून चोरट्यांनी मशिन शेतात टाकली होती. रविवारी शहर गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाला मशिन सापडली. पोलिसांच्या चार पथकांनी मार्डी ते धाराशिव टोल नाक्यापर्यंतच्या सुमारे १५ गावांच्या रस्त्यांवरील १०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज पडताळले.

‘एसबीआय’च्या एटीएमवर सुरक्षारक्षक नव्हता, मशिनला मजबूत फाउंडेशन नव्हते. याचा फायदा उचलत चोरट्यांनी एटीएमच चोरून नेली. जाताना त्यांनी तेथील सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरून नेला. मशिन चोरीनंतर मुंबईतील स्ट्राँग रूममध्ये अलार्म वाजला. तेथून पोलिसांना कळविण्यात आले आणि सातव्या मिनिटांत पोलिस तेथे पोचले; पण तोपर्यंत चोरटे सोलापूरबाहेर पसार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी तातडीने सगळीकडे माहिती पसरविली, नाकाबंदी केली; मात्र चोरटे सापडले नाहीत. गाडीला मागील बाजूला नंबरप्लेट नव्हता, समोरील बाजूची नंबरप्लेट लाईटच्या फोकसमुळे स्पष्टपणे दिसत नाही. या प्रकरणी किरण संजय लांडगे (रा. स्वातंत्र्य सैनिक नगर, सोलापूर) यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली असून, सहायक पोलिस निरीक्षक भरत चंदनशिव तपास करीत आहेत.

१० किमी अंतरासाठी एक तास, अन्‌...

त्या एटीएममध्ये तीन-चार दिवसांपूर्वी दोन लाख रुपये भरले होते. त्यात सध्या एक लाख ७९ हजार १०० रुपये होते. चोरटे पाच ते सात मिनिटांत मशिन चोरून हैदराबाद रोडवरून विरुद्ध दिशेने गेले. मुळेगाव रोडवर तीन-चार सेकंद थांबून त्यांनी मशिन थोडी आत ढकलल्याचे ‘सीसीटीव्ही’त कैद झाले होते. पोलिसांनी उळे रोड ते बक्षीहिप्परगा परिसरातील ‘सीसीटीव्ही’ पाहिले. या दोन गावांमध्ये १० किलोमीटर अंतर आहे, पण चोरट्यांना तेवढा प्रवास करायला एक तास लागला होता. त्यादृष्टीने गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शंकर धायगुडे यांच्या पथकाने शोध घेतला. त्यावेळी त्यांना बक्षीहिप्परगा परिसरातील शेतात रिकामी मशिन सापडली.

गूगल मॅप वापरून प्रवास

शहरातील एटीएम चोरून २० मिनिटांत शहराबाहेर गेलेले चोरटे मुळेगाव रोडवरून दहिटणेमार्गे मार्डीकडे गेले. तेथूनही त्यांनी मुख्य रस्त्यांऐवजी छोट्या- छोट्या गावांमधील रस्त्यांचा वापर केला. त्यासाठी त्यांनी मोबाईलवरील गूगल मॅपचा वापर केला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला. रविवारी देखील पोलिसांना चोरट्यांबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. आता अशा घटना राज्यात अन्य कोणत्या जिल्ह्यात घडल्या आहेत का, याची माहिती पोलिस घेत आहेत. याशिवाय तांत्रिक माहिती व खबऱ्यांच्या माध्यमातून शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com