esakal | देवराष्ट्रेत शिक्षकांनी साकारले यशवंतरावजींचे छायाचित्र संग्रहालय
sakal

बोलून बातमी शोधा

Yashwantrao Chavan's photo museum set up by teachers in Devrashtra

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे बालपण ज्या आजोळी घडले त्या देवराष्ट्रे गावात त्यांनीच स्थापन केलेल्या शाळेत आता त्यांचे कायमस्वरुपी छायाचित्र संग्रहालय सुरु झाले आहे.

देवराष्ट्रेत शिक्षकांनी साकारले यशवंतरावजींचे छायाचित्र संग्रहालय

sakal_logo
By
स्वप्नील पवार

देवराष्ट्रे (जि. सांगली) ः आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे बालपण ज्या आजोळी घडले त्या देवराष्ट्रे गावात त्यांनीच स्थापन केलेल्या शाळेत आता त्यांचे कायमस्वरुपी छायाचित्र संग्रहालय सुरु झाले आहे. यशवंतरावांचा जीवनपट मांडणारे हे संग्रहालय पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना संकटावर मात करीत पुढे जायचंच हा निर्धार देत आहे.

पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावांनी राज्याच्या कृषी-औद्योगिक विकासाच्या धोरणाचा पाया घातला. महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातील तरुणांना त्यांनी उद्योजक केले. शिक्षणसंस्थाचालक केले. आयुष्यभर सत्तेत असूनही उपभोगशुन्य स्वामी राहिलेल्या चव्हाणसाहेबांनी स्वतःची म्हणून एकच शाळा काढली ती आपल्या आजोळी. ज्या गावाने आपल्याला घडवले त्याच्याप्रती कृतज्ञता म्हणून. 1961 मध्ये स्थापन झालेली ही शाळा मुलांना लढण्याची प्रेरणा देत आहे.

आता ही शाळा यशवंत शिक्षण संस्थेची यशवंतराव हायस्कुल म्हणून ओळखली जाते. साहेबांचा परिसस्पर्ष लाभलेल्या या शाळेतील शिक्षकांनी सतत उपक्रम राबवत साहेबांना नाव सार्थ ठरवले आहे. या हायस्कुलच्या प्रवेशद्वाराजवळील सभागृहात साहेबांचे जीवनचित्रदर्शन घडवणारे संग्रहालय साकारले आहे. साहेबांच्या मातोश्री विठाबाईं वडील वडील बळवंतराव, त्यांच्या भगिणी, बंधू यांच्या आप्तांची छायाचित्रे आहेत.

त्यांच्या राजकीय जीवनपट उभा करणारी ही छायाचित्रे स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या उभारणीचा पटच मांडतात. पार्लमेंटरी सेक्रेटरी ,मुख्यमंत्री, उपपंतप्रधान, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. अशा सुमारे चारशे छायाचित्रांचे हे प्रदर्शन आहे. 

यामागे मुख्याध्यापक के. एच. पवार ,पी .ए. पवार,आर. एस. माळी, शरद शिंदे, अमोल बंडगे, सुरेश शेळकंडे, निलेश केंगले आदी शिक्षकांचे योगदान आहे. हे प्रदर्शन साकारण्यासाठी सुमारे महिनाभर सर्व शिक्षक परिश्रम घेत होते. कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी नुकतेच या प्रदर्शनाचे उद्‌घाटन केले. शिक्षकांनी केलेल्या या कामाबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले. चव्हाणसाहेबांचे सर्वव्यापी कार्याचा महाराष्ट्र ऋणी आहे. इथून मुले "यशवंतराव' होण्याची प्रेरणा घेतील असे गौरवोद्‌गार त्यांनी काढले.

संपादन : युवराज यादव 

loading image