९ हजार जागांच्या मेगा भरतीने सुशिक्षित बेरोजगारांना अच्छे दिन

संतोष विंचू
बुधवार, 28 मार्च 2018

येवला - राज्यातील जिल्हा सत्र न्यायालय अंतर्गत लघुलेखक, कनिष्ठ लिपिक व शिपाई, हमाल या पदांची भरती करण्यात येणार आहे. तब्बल ९ हजार जागांची ही मेगा भरती असल्याने अनेक बेरोजगार युवकांना हक्काची सरकारी नोकरी मिळण्याची संधी मिळणार आहे. गुणवत्ता व विविध निकषानुसार आज (ता.२८) पासून भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने युवक विविध पदव्या धारण करून नोकरीच्या प्रतीक्षेत हात धरून बसलेले असतात. अश्या सुशिक्षित बेरोजगारांना शासनाने अच्छे दिन आणण्याची संधी याद्वारे उपलब्ध करून दिली आहे.

येवला - राज्यातील जिल्हा सत्र न्यायालय अंतर्गत लघुलेखक, कनिष्ठ लिपिक व शिपाई, हमाल या पदांची भरती करण्यात येणार आहे. तब्बल ९ हजार जागांची ही मेगा भरती असल्याने अनेक बेरोजगार युवकांना हक्काची सरकारी नोकरी मिळण्याची संधी मिळणार आहे. गुणवत्ता व विविध निकषानुसार आज (ता.२८) पासून भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने युवक विविध पदव्या धारण करून नोकरीच्या प्रतीक्षेत हात धरून बसलेले असतात. अश्या सुशिक्षित बेरोजगारांना शासनाने अच्छे दिन आणण्याची संधी याद्वारे उपलब्ध करून दिली आहे. मागील काही वर्षात पोलिस वगळता इतर पदासाठी राज्यात एकाच वेळी होत असलेली ही सर्वात मोठी नोकर भरती मानली जात आहे. लिपिक पदांच्या सर्वाधिक जागा असल्याने पदवी, पदव्युत्तर पदवी धारण करणाऱ्या सर्वसामान्य गुणवंत युवकांचे आयुष्याचे यामुळे कल्याण होणार आहे. 

दिव, दमणसह मुंबई व सर्व जिल्हा न्यायालयातील रिक्त जागांसाठी ही भरती एकाचवेळी केली जाणार आहे. लघुलेखकाच्या १ हजार १३ तर कनिष्ठ लिपिकाच्या सर्वाधिक ४ हजार ७३८ व शिपाई, हमालाच्या ३ हजार १७० अश्या ८ हजार ९२१ जागांसाठी ही मेगा भरती आहे. जाहिरातीत जिल्हानिहाय पदसंख्येचा उल्लेख असून सर्वाधिक जागा पुणे व नागपूर न्यायालयात आहे. 

उद्या बुधवारी सकाळ पासून पत्रताधारक उमेदवार https://bhc.gov.in/bhcrecruitment/  या संकेतस्थळाहून अर्ज भरू शकणार आहे. विशेष म्हणजे इतर भरतीसाठी उमेदवारांना चार-पाचशे रुपये शुल्क हमखास भरावे लागतात. परंतु, या भरतीसाठी अर्ज निशुल्क असणार आहे.

अशी आहे पात्रता 
लघुलेखक व कनिष्ठ लिपिक पदासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण, परंतु कोणत्याही शाखेच्या पदवीधारकास किंवा कायद्याच्या पदवीधारकास प्राधान्य, संगणक परीक्षा व मराठी, इंग्रजी टंकलेखन आवश्यक आहे. तर शिपाई पदासाठी सातवी उत्तीर्ण व चांगली शरीरयष्टी ही अट आहे. वयोमर्यादा १८ ते ३८ वर्ष असून राखीव प्रवर्गाला ४३ व अपंगांसाठी ४५ वर्षापर्यंत शिथिल आहे.

गुणवत्ताच ठरवणार नशीब...
या तिन्ही पदांसाठी ऑनलाइन अर्ज भरावे लागणार असून, त्यासाठी उद्यापासून तर १० एप्रिलपर्यंत मुदत आहे.लिपिक पदासाठीची चाळणी परीक्षा ४० गुणांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची होईल तर शिपाई पदासाठी ३० गुणांची परीक्षा होईल. यामध्ये इतिहास, नागरिक शास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य आणि चालू घडामोडींवरील प्रश्नांचा समावेश असणार आहे. तसेच टंकलेखन, क्रियाशीलता, मुलाखत हे घटक देखील निवड प्रक्रियेत समाविष्ट असतील.

असा आहे भरतीचा कार्यक्रम 

  • २८ मार्च : सकाळी आठ वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरु
  • १० एप्रिल : संध्याकाळी साडेपाच वाजता अर्ज भरणे खंडित
  • १६ एप्रिल : पात्र यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे 
  • २१ एप्रिल ते ७ ऑगस्ट या दरम्यान विविध टप्प्यात भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
  • भरतीची सविस्तर नियमावली व कार्यक्रम जाहिरातीत नमूद केलेला आहे.

"नोकरीच्या शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या बेरोजगारांना या न्यायालयीन मेगा नोकर भरतीने चांगली संधी मिळाली आहे. पुन्हा पुन्हा अशी संधी येत नसल्याने गुणवत्ता सिद्ध करून तरुणांनी या संधीचा फायदा घ्यावा''.
दिनेश राऊत, युवक, ममदापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yeola nashik government job opportunities