Crime News : इंस्टाग्रामवरील मैत्री महिला पोलिसही फसली, लग्नाचे आमिष दाखवत बीडच्या तरुणाने केली फसवणूक

Crime News
Crime News

डोंबिवली : सोशल मीडियावर होणाऱ्या ओळखीतून कल्याण पूर्वेतील 30 वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबलची एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवीत शारीरिक शोषण करीत फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात महिलेच्या तक्रारीवरून आकाश घुले (वय 27) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला पोलीस कॉन्स्टेबल कल्याण पूर्वे येथे रहाण्यास आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार इंस्टाग्रामवर 27 वर्षीय आकाश याच्याशी तिची मैत्री झाली होती. त्यानंतर एके दिवशी बहाणा करून तो महिला कॉन्स्टेबलच्या घरी आला. यावेळी त्याने कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून तिला बेशुद्ध केलं आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तू माझ्यासोबत असे का केले असे सदर महिलेने त्याला विचारले असता घाबरू नको मी तुझ्याशी लग्न करणार आहे असे आकाशने तिला सांगितले.

त्यानंतर आरोपी तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून महिला कॉन्स्टेबलशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पण नंतर त्याने महिला कॉन्स्टेबलसोबत खालच्या जातीचे कारण देत लग्न करण्यास नकार दिला. या प्रकरणी महिला कॉन्स्टेबलच्या फिर्यादीवरून 27 वर्षीय आरोपीविरुद्ध कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात कलम 376, 328 आणि अनुसूचित जाती जमाती कलम 3 (2) अ. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला कॉन्स्टेबलने तक्रारीत नेमके काय आरोप केले?

साधारण दीड वर्षापूर्वी इंस्टाग्राम या सोशल मीडियावरून माझी ओळख आकाश जयधर घुले, वय अंदाजे 27 ते 28 वर्षे याच्याबरोबर झाली होती. तेव्हा त्याने मला तो आर्मीमध्ये असल्याचे सांगून सध्या तो बॉम्बे इंजिनीयर ग्रुप, खडकी, पुणे येथे डी.आय प्रशिक्षक म्हणून नियुक्तीस असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आकाश व माझे एकमेकांसोबत फोनवर बोलणे व मेसेज करणे चालू झाले व आमचे प्रेमसंबंध सुरू झाले. त्यांनतर त्याने मला एकदा फोन करून माझी जात कोणती? असं विचारलं. तेव्हा मी त्याला माझी जात सांगितली. त्यानंतर आकाश याने एकदा फोनवर मला तुला प्रत्यक्ष पहायचे आहे व मी तुला कल्याण येथे भेटण्यास येणार आहे, असे बोलून त्यांनतर दिनांक 8/5/2022 रोजी तो मला माझे कल्याण येथील माझ्या रूमवर भेटण्यास आला. त्यानंतर तो माझ्या रूमवर दोन ते तीन दिवस मुक्कामी राहिला होता व त्यानंतर तो त्याचे मुळगावी निघून गेला होता. 

काही दिवसांनी परत तीन ते चार महिन्यांनी आकाश हा माझ्या कल्याण येथील रूमवर येऊन साधारण आठ दिवस माझ्यासोबत कल्याण येथील घरी मुक्कामी राहिला. त्यावेळेस एक दिवशी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास त्याने मला एक थंड पेय प्यायला दिले व काही वेळातच मला गुंगी आल्यासारखे झाले.

त्याचा फायदा घेऊन त्याने माझ्याशी माझ्या इच्छेविरूदध जबरदस्तीने लैंगिक शोषण केले. मी त्याला तू माझे आयुष्य का खराब केलेस? अशी विचारणा केली असता त्याने मला तू घाबरू नकोस मी तुझ्याशीच लग्न करणार आहे, असे सांगितले. मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवत गेले. मी त्याच्या आमिषाला बळी पडत गेले. यावेळी मी नाईलाजाने त्याचे ऐकत असे व तो जे-जे बोलेल ते-ते करत असे. दरम्यान दिनांक 12/05/2023 रोजी मला आकाशचा चुलत भाऊ राजेश घुले याने फोन करून आकाशने मुलगी बघितली आहे व तो आता लग्न करणार असल्याचे सांगितले.

Crime News
आता महाराष्ट्रातल्या मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता! महाराष्ट्र मंदिर महासंघाचा मोठा निर्णय, नागपूरमधून सुरुवात

ही गोष्ट ऐकून मी लगेच आकाशला फोन केला व खात्री केली असता तो बोलला की, असे काही नाही, मला समोरूनच मुलींचे प्रपोजल येत आहेत मी एकही मुलगी बघायला गेलो नाही. पण यावेळी मी थेट त्याच्या मूळगावी त्याला भेटण्यासाठी गेले. मी त्याला त्याच्या आई-वडिलांना भेटायचे आहे, असे बोलले असता त्याने नकार दिला व तो तेथून निघून गेला. त्यानंतर पोलीस कंट्रोलला फोन करून पोलीस मदत मागितली असता, त्याठिकाणी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार आले. त्यानंतर काही वेळातच आकाश व त्याचे वडील जयधर घुले हे देखील हजर झाले. (crime news)

 त्यावेळेस मी आकाशचे वडिलांना सर्व हकीकत सांगितली व मला त्याच्याशी लग्न करायचे आहे असे सांगितले. त्यानंतर आकाशने त्याला हे जमणार नाही, दोघांची जात वेगळी आहे असं सांगितलं. त्यानंतर केज पोलीस ठाण्यात मी व आकाश व त्याचे नातेवाईक असे गेलो असता. तेथील पोलीस निरिक्षक पवार यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले व माझ्यासमोर आकाशला माझ्याशी लग्न करणार की नाही असे विचारले. त्यावेळी त्याने पोलिसांच्या भीतीने त्यांच्यासमोर माझ्याशी लग्न करण्यास होकार दिला.

दरम्यान, त्यानंतर आम्ही आकाशचे वडील व गावातील काही लोक असे आकाशच्या घराच्या बाहेर एकत्र जमलो व आम्ही सर्वजण तेथे बैठकीकरता बसलो. बैठकीमध्ये चर्चा झाल्यांनतर आकाशने मला सांगितले की, माझ्या घरच्यांचा आपल्या लग्नास विरोध आहे. कारण तू खालच्या जातीची आहेस म्हणून मी तुझाशी लग्न करू शकत नाही.

असे आरोप महिला कॉन्स्टेबलने तक्रारीत केले आहेत. तसेच आरोपी तरुणावर कारवाईची मागणी देखील केली आहे. 

Crime News
Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा 'या' महिन्यात पूर्ण होणार; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com