
Maharashtra Politics: काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत वादावर युवक काँग्रेस नेत्याची महत्त्वाची टिपण्णी
राज्यात काँग्रेस पक्षाची जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला आपणच जबाबदार असल्याचं वक्तव्य माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी केलं आहे. लोकांना जर आपल्यासोबत घ्यायचं असेल तर त्यांच्या कामासाठी युवकांनी आक्रमक भूमिका घ्यायला हवी. त्यासाठी वेळ पडली तर मंत्री गिरीश महाजनांच्या गाडीपुढे आडवे व्हा, वेळ पडली तर भाजपचे कार्यालय फोडा. लाठ्या काठ्या खा, जेलमध्ये जा तरच लोक तुमच्या मागे धावतील अशा प्रकारचा सल्ला कुणाल राऊत यांनी दिलाय.
कुणाल राऊत जळगावमध्ये युवक काँग्रेसच्या संवाद मेळाव्यात बोलत होते. कुणाल राऊत यांनी बोलताना काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गटबाजीवर हल्लाबोल केला आहे. काँगेस पक्षाच्या मागे लोक नाहीत असं चित्र निर्माण झाले आहे. त्याला कारण आपणच आपल्या कामात कमी पडलो आहोत. आपल्या मागे लोक पाहिजे असतील तर आता लोकांच्या कामासाठी आपल्याला आक्रमक भूमिका घेणं गरजेचं असल्याचं कुणाल राऊत म्हणाले आहेत.
तर पुढे बोलताना ते म्हणाले कि, आपल्या-आपल्यात वाद करु नका, लोकांमध्ये जा, लोकांची कामे करा. कामे केली तरच लोक तुमच्या मागे येतील. त्यासाठी लोकांच्या कामाला प्राधान्य द्यायला हवं. रेल्वे गाड्या थांबायच्या असतील तर त्या थांबवा, मंत्री गिरीश महाजन यांची गाडी अडवा, तिच्यासमोर आडवे व्हा. लाठ्या काठ्या अंगावर घ्या, तुमचे हात तुटो, पाय तुटो, जेल जा, वेळ पडलीच तर भाजपचे कार्यालय फोडा, रस्त्यावर उतरुन कामे करा, तर लोक तुम्हाला साथ देतील. तुम्ही हिरो झाल्याशिवाय लोक तुमच्या मागे येणार नाहीत अंसही कुणाला राऊत यावेळी म्हणालेत. राऊत यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
त्याचबरोबर कुणाल राऊत अंतर्गत गटाबाजीवर बोलताना म्हणाले कि, पक्षात अंतर्गत वाद होता कामा नयेत. आपल्या कामात आपणच कमी पडल्याचंही राऊत म्हणालेत. तुम्ही लोकांमध्ये जा, त्यांच्या अडचणी सोडवा लोक आपोआप तुमच्या मागे येतील. आतापर्यंत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी आंदोलने केली आहेत. येणाऱ्या काळातसुद्धा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेणं गरजेचं आहे असं कुणाल राऊत म्हणाले आहेत.